पर्व 3 - 'सेक्स'वर बोलू काही'- भाग 1- प्रस्तावना व आवाहन
त्यांचं दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. कुटुंबीयांचा विरोध पत्करून त्यांनी लग्न केलं. लग्नानंतर महिन्याभरातच लक्षात आलं कि तो लैंगिक संबंध करण्यास असमर्थ आहे. ती बेडवर सोबत झोपली तरी त्याला घाम फुटतो. आज लग्नाला पंधरा वर्षे झाली. एकदाही सेक्सचा अनुभव घेता न आलेली 'ती' प्रचंड अस्वस्थ आहे. त्या दोघांचे लग्न झाले. लग्नानंतर थोड्याच दिवसांत तिला सेक्स मध्ये अजिबात इंटरेस्ट नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. 'हे करायलाच हवं का?' असा तिचा प्रश्न. तीन-चार वर्षे वाट पाहून शेवटी घटस्फोटाचा निर्णय घ्यावा लागला. त्यांच्या लग्नानंतर महिनाभरातच त्याच्या लक्षात आले कि हिच्या सेक्स च्या डिमांड खूपच आहेत आणि आपण त्या पूर्ण नाही करू शकत. तिच्या मते हा सेक्स करण्यात खूपच कमी पडतो, नावाला सेक्स करायचा म्हणून करतो. शेवटी वर्षभरातच घटस्फोट झाला. त्याच्या मते सेक्स फक्त मुलं होण्यासाठीच करायचा असतो. 'आत्ताच मुलं होऊ द्यायची नाहीत' असं ठरवलंय म्हणल्यावर सेक्स करायची गरज काय? तिच्या हट्टाखातर अखेरीस एकदा चिडून सेक्स करतो, काहीही निरोधके वापरत नाहीत, कोणतीही काळजी घेत नाहीत आणि गर्भ राहतो...