पर्व 3 - 'सेक्स'वर बोलू काही - भाग 16 (परहस्तमैथुन म्हणजे काय? & हस्तमैथुन करताना घ्यायची काळजी)
हस्तमैथुनाविषयी आपण आत्तापर्यंत बरंच समजून घेतलं आहे. त्याविषयीचे गैरसमज व हस्तमैथुनाचे फायदे सुद्धा आपण पाहिले. यातीलच एक प्रकार म्हणजे परहस्तमैथुन. याविषयी सुद्धा जाणून घेऊ व परहस्तमैथुन किंवा हस्तमैथुन करताना काय काळजी घ्यायला हवी तेही समजून घेऊ. हस्तमैथुन म्हणजे - स्वतःच्या हाताने आपल्या लैंगिक अवयवांना स्पर्श करून उत्तेजित करणे व त्यातून कामपूर्ती मिळवणे- हे आपण याआधी व्यवस्थित समजून घेतले आहे. तसेच परहस्तमैथुन म्हणजे दुसऱ्याच्या हाताने आपल्या लैंगिक अवयवांना स्पर्श करवून घेऊन लैंगिक आनंद मिळवणे किंवा आपल्या हाताने दुसऱ्याच्या लैंगिक अवयवांना स्पर्श करून त्यांना लैंगिक आनंद मिळवून देणे होय. भिन्नलिंगी आकर्षण असणाऱ्या जोडप्यांमध्ये स्त्रीने पुरूषाच्या शिश्नाला हात लावणे, शिश्नदंडावरून हात फिरवणे, हलक्या हाताने शिश्नमुंडावरील त्वचा मागे पुढे करणे व पुरूषाने स्त्रीच्या शिश्निकेला व योनिपटलांना स्पर्श करणे, त्यांना हलक्या हाताने चोळणे, मर्दन करणे हे खूपच रोमांचक अनुभव देणारे असते. समलिंगी पुरूष व समलिंगी स्त्रिया सुद्धा आपल्या आवडत्या जोडीदारासोबत अशा प्रकारे रोमांचक अनुभव घेऊ शकतात. ...