सर्वांगीण लैंगिकता शिक्षण
आपल्या समाजात, आपल्यासहित अनेक तरुण, प्रौढ, एवढेच काय अगदी साठी उलटलेल्या व्यक्तींना सुद्धा जीवनात कधीतरी वाटलेले असते की, आपल्याला योग्य वयात लैंगिकतेचे पुरेसे योग्य ज्ञान असते तर जीवनाचा आनंद अधिक निकोप आणि विशुद्धतेने उपभोगता आला असता. लैंगिकतेच्या अज्ञानामुळे अनेकांच्या आयुष्यात समस्या निर्माण झालेल्या दिसतात, काहींच्या जीवनात तर यामुळे वादळे निर्माण झालेली असतात. यावरून जीवनातून कधीच विलग न करता येणाऱ्या या विषयाची शास्त्रीयदृष्ट्या माहिती करून घेणे ही एक अतिशय महत्त्वाची गरज असल्याचे स्पष्ट होते. लैंगिकता शिक्षण हा व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठीच्या अभ्यासक्रमामधील एक महत्त्वाचा घटक आहे. याचा उद्देश कोणत्याही व्यक्तीला त्याच्या लैंगिक आरोग्यासंबंधी निकोप नि सम्यक ज्ञान देणे, तसेच पुढील आयुष्यात लैंगिकतेसंदर्भात कोणतेही निर्णय अधिक माहितीपूर्ण आणि निरोगी पद्धतीने घेण्यासाठी आवश्यक असणारे सर्वांगीण ज्ञान, कौशल्ये आणि वृत्तीने सुसज्ज करणे आहे. बदलत्या काळानुसार समाज म्हणून आपण सगळेच सातत्याने विकसित होत असतांना आपल्या संपूर्ण आरोग्याच्या समस्यांचे स्वरूप बदलते आहे, त्या...