सर्वांगीण लैंगिकता शिक्षण
आपल्या समाजात, आपल्यासहित अनेक तरुण, प्रौढ, एवढेच काय अगदी साठी उलटलेल्या व्यक्तींना सुद्धा जीवनात कधीतरी वाटलेले असते की, आपल्याला योग्य वयात लैंगिकतेचे पुरेसे योग्य ज्ञान असते तर जीवनाचा आनंद अधिक निकोप आणि विशुद्धतेने उपभोगता आला असता. लैंगिकतेच्या अज्ञानामुळे अनेकांच्या आयुष्यात समस्या निर्माण झालेल्या दिसतात, काहींच्या जीवनात तर यामुळे वादळे निर्माण झालेली असतात. यावरून जीवनातून कधीच विलग न करता येणाऱ्या या विषयाची शास्त्रीयदृष्ट्या माहिती करून घेणे ही एक अतिशय महत्त्वाची गरज असल्याचे स्पष्ट होते.
लैंगिकता शिक्षण हा व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठीच्या अभ्यासक्रमामधील एक महत्त्वाचा घटक आहे. याचा उद्देश कोणत्याही व्यक्तीला त्याच्या लैंगिक आरोग्यासंबंधी निकोप नि सम्यक ज्ञान देणे, तसेच पुढील आयुष्यात लैंगिकतेसंदर्भात कोणतेही निर्णय अधिक माहितीपूर्ण आणि निरोगी पद्धतीने घेण्यासाठी आवश्यक असणारे सर्वांगीण ज्ञान, कौशल्ये आणि वृत्तीने सुसज्ज करणे आहे. बदलत्या काळानुसार समाज म्हणून आपण सगळेच सातत्याने विकसित होत असतांना आपल्या संपूर्ण आरोग्याच्या समस्यांचे स्वरूप बदलते आहे, त्याबरोबर लैंगिकतेच्या व लैंगिक आरोग्याच्या समस्यांचे स्वरूप देखील बदलते आहे. लैंगिकतेचे परीघ आणि त्याविषयीची सामाजिक समज विस्तारत असतांनाच काही समस्या सुद्धा निर्माण होत आहेत. म्हणूनच सर्वांगीण लैंगिकता शिक्षणाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे.
लहानपणापासूनच मुला-मुलींच्या मनात अनेक गोष्टींविषयी कुतूहल असते. त्यातील इतर गोष्टींविषयी असणाऱ्या कुतूहलाचे पालक, शिक्षक आणि आजूबाजूच्या समाजाकडून सुद्धा कौतुक होत असते, त्याविषयी या सर्वांकडून त्यांना अधिक माहिती सुद्धा मिळते; पण लैंगिक प्रश्नांसंबंधी मात्र कुणाकडूनच काही माहिती मिळत नाही. त्याविषयीच्या कुतूहलाचे कौतुक तर सोडाच, पण स्वागत सुद्धा होत नाही. उलट त्या विषयीची नकारात्मक प्रतिक्रियाच खूपदा त्यांच्या अनुभवाला येते. नेमके त्याच वेळी प्रसारमाध्यमांतून मात्र त्यांच्या मनातील या कुतूहलाला आणि त्याविषयीच्या भावनांना अधिकचे व कधी कधी अयोग्य प्रकारे खत-पाणी घातले जाते. अशा वेळी हे मनातील प्रश्न, कुतूहल तसेच राहतात, तर कधी त्यातील गुंतागुंती वाढत जातात. मग पुढे जाऊन मित्र-मैत्रिणी, समवयस्कांकडून, वेगवेगळ्या ठिकाणी वाचलेल्या अथवा ऐकलेल्या प्रणयकथा, चित्रपट, पॉर्न क्लिप्स अशा ज्या ज्या माध्यमांतून त्यांना शक्य होईल त्या त्या माध्यमांतून ते माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. यातून बऱ्याचदा चुकीचीच माहिती मिळण्याची शक्यता जास्त असते. या वयात मिळालेली ही चुकीची माहिती व त्यातून तयार झालेल्या चुकीच्या धारणा पुढे आयुष्यभर कायम राहू शकतात. चुकीची माहिती आणि चुकीच्या धारणांमधून भयगंड, न्यूनगंड एवढेच नव्हे तर विकृती सुद्धा निर्माण होऊ शकतात. कधी या विकृती सामाजिक समस्या सुद्धा बनतात. यासाठीच योग्य त्या वयातच मुला-मुलींना लैंगिकता शिक्षण देणे खूप गरजेचे असते.
लैंगिकता शिक्षण अधिकाधिक विद्यार्थी, मुलेमुली आणि समाजातील सर्व घटकांपर्यंत पोचवण्यासाठी पालक, शिक्षक आणि आजूबाजूचा समाज व समाजातील कृतिशील गट यांचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे. पण प्रत्यक्षात परिस्थिती पाहता हेच घटक लैंगिकता शिक्षणाच्या मार्गातील मुख्य अडथळा बनलेले दिसतात. याचे कारण म्हणजे पालक, शिक्षक व एकूणच समाजाचा लैंगिकता शिक्षणाकडे पाहण्याचा चुकीचा दृष्टीकोन. लैंगिकता शिक्षण म्हणजे केवळ 'लैंगिक संबंधाची क्रिया, त्याविषयीचे शिक्षण' असेच अनेकांना वाटते. मुळात लैंगिकता व लैंगिक संबंध या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे आधी लक्षात घ्यायला हवे. लैंगिक संबंधांविषयी माहिती हा लैंगिकता शिक्षणातील एक महत्वाचा मुद्दा असू शकतो, जो त्या त्या वयातील गरजेनुसार मुलांना समजेल अशा भाषेत सांगितला जायला हवा. पण लैंगिकता शिक्षण हे फक्त तेवढ्यापुरतेच मर्यादित नसून त्यापेक्षा खूप अधिक व्यापक स्वरूपाचे आहे. लैंगिकता म्हणजे लिंगविषयक मानसिकता. स्त्री, पुरुष किंवा इतर लैंगिकतेच्या व्यक्तींचे लिंगविषयक विचार, भावना आणि वर्तन म्हणजे लैंगिकता होय. ही लैंगिकता प्रत्येकाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत सोबत असते. लैंगिकतेविषयीचे आपले विचार आणि त्यातून येणारा आचार यातून आपली लैंगिकता घडत असते आणि आपली लैंगिकता आपल्या व्यक्तिमत्वाचा एक अविभाज्य भाग असते. जगातील प्रत्येक व्यक्तीने आयुष्याच्या एका टप्प्यावर लैंगिकतेविषयीचे कुतूहल, शंका, समस्या यांचा अनुभव घेतलेला असतो आणि त्यांना त्यांचे समाधान, उपाय मिळविण्यात अडचणी आल्याचा देखील अनुभव असतो. तरीही व्यक्ती मोठ्या झाल्यावर पौगंडावस्थेतील व्यक्तींना लैंगिकतेविषयी शास्त्रशुद्ध ज्ञान मिळावे यासाठी उत्सुक का नसतात, हा मोठा प्रश्न आहे. लैंगिकतेविषयी योग्य त्या वयात योग्य ती माहिती मुलां-मुलींपर्यंत पोचवण्यासाठी लैंगिकता शिक्षणाची गरज आहे.
लैंगिकता शिक्षणाची सुरुवात अगदी बाळ जन्माला आल्यापासून किंवा त्याच्याही आधीच घरातील माणसांच्या मनात व घरातील वातावरणात होत असते. मुलगा जन्माला यावा की मुलगी? याविषयी त्या त्या घरातील प्रत्येक माणसाच्या मनात काहीतरी विचार असतात, ज्यांचा परिणाम त्या बाळाच्या जन्मापासून त्याच्यावर वा तिच्यावर होत असतो. मग लहानपणापासून मुलगा/मुलगी म्हणून मिळणारी वागणूक, आई-वडील व नातेवाईक यांच्याकडून मिळणारे प्रेम, त्यांचे स्पर्श, कपडे, खेळ, खेळणी यांसारख्या अनेक गोष्टींतून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे बाळाची लैंगिकता घडत असते. पुढच्या टप्प्यावर त्यांच्या मनात येणारे प्रश्न, त्यांच्या व इतरांच्या लैंगिक अवयवांविषयीचे कुतूहल, ते जाणून घेण्याची इच्छा व त्यावर त्यांना मिळणारा प्रतिसाद यातून त्यांचे विचार तयार होत जातात.
वयात येताना शरीरात होणारे बदल हे अनेकदा मुला-मुलींना अनपेक्षित व गोंधळात टाकणारे असतात. मुलांच्या व मुलींच्या शरीराची बदलत जाणारी ठेवण, शरीरातील हार्मोन्सच्या अंतःस्त्रावामुळे त्यांच्या मनात निर्माण होणाऱ्या आकर्षण, राग, लोभ, मान, अपमान अशा भावना व त्यावेळी त्यांना मिळणारे आजूबाजूचे वातावरण यातून त्यांचे व्यक्तिमत्व घडत असते.
या वयात एखाद्याबद्दल वाटणाऱ्या आकर्षणाच्या भावनेला प्रेम समजून त्यातून चुकीचा जोडीदार निवडीची शक्यता किंवा मनात येणाऱ्या लैंगिक आकर्षणाच्या भावनेतून किंवा कुतूहलापोटी लैंगिक संबंध घडण्याची, त्यातून फसवणूक होऊ शकण्याची, कमी वयात मातृत्व किंवा इतर अनारोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता अधिक असते. अशा वेळी पालकांचा मुलांसोबत असणारा रॅपो (सुसंवाद), परस्पर विश्वास अधिक महत्त्वाचा असतो. पालक आणि मुलांच्या योग्य वेळीच झालेल्या लैंगिकता शिक्षणामुळे या धोक्यांपासून वाचणे व अशी परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळणे अशा दोन्ही गोष्टी साध्य होवू शकतात. अचानक आलेल्या मासिक पाळीविषयी आधी काही माहिती मिळालेली नसेल किंवा चुकीची माहिती असेल तर त्यातून मुलींचा होणारा गोंधळ, भिती व मासिक पाळीविषयी चुकीच्या प्रथा-परंपरा, गैरसमज व अंधश्रद्धा आजूबाजूला असतील तर पाळीविषयी मनात नकारात्मक भावना तयार होऊन त्या पुढे आयुष्यभर त्रासदायक ठरू शकतात. तसेच मुलांच्या बाबतीत अचानक लिंगात येणारी ताठरता व त्यातून कधी कळत-नकळतपणे, कधी अचानक झोपेत झालेली वीर्यमुक्ती (यासाठी सर्रास वापरला जाणारा 'स्वप्नदोष' हा शब्द चुकीचा असल्याने त्याला पर्यायी शब्द सुचवला आहे. हाच शब्द समाजात रूढ करणे अधिक योग्य राहील असे वाटते.) या बाबी मुलांना आधी त्याविषयी माहिती नसेल तर त्यांना गोंधळात टाकणारी व मनात संकोच, भिती आणणारीच असू शकते. वयात येणाऱ्या मुला-मुलींना या सर्व गोष्टींविषयी पालक, शिक्षक यांच्याकडून योग्य माहिती न मिळाल्याने चुकीच्या व्यक्तींकडून चुकीची माहिती मिळण्याची शक्यताच जास्त असते.
अनेकदा लहान मुला-मुलींना फसवून त्यांचे लैंगिक शोषण करण्याचे प्रकार सुद्धा घडतात. अशा वेळी मुला-मुलींना त्यांच्या लैंगिक अवयवांविषयी व त्यांच्या गुप्ततेविषयी आधीच योग्य माहिती दिलेली असेल तर हे प्रकार टाळता येऊ शकतात. अशा वेळी काय करायचे हे मुलांना आधीच शिकवून ठेवता येऊ शकते. लैंगिकता शिक्षणातून हे धडे मुलांना देता येऊ शकतात. आपल्या आजूबाजूला स्त्री व पुरुष यांच्यासोबतच इतर वेगवेगळ्या लैंगिकता असणाऱ्या व्यक्ती सुद्धा राहतात. या वेगवेगळ्या लैंगिकता मुलांना (व आपल्याला सुद्धा) माहिती आणि मान्य असायला हव्यात आणि त्यांना तितक्याच सन्मानाने वागवता यायला हवे. त्यांना आपल्याकडून त्यांच्या लैंगिकतेवरून काही त्रास दिला जाणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. त्यासाठी या सर्व गोष्टींची माहिती मुला-मुलींना योग्य त्या वयातच द्यायला हवी.
सध्या मोबाईलच्या सहज उपलब्धतेमुळे मुले लवकरच इंटरनेटच्या जगात सफर करायला लागतात. अशा वेळी इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या पॉर्न साईट्स मुलांच्या आयुष्यात खूप कमी वयापासूनच येण्याची शक्यता असते. अशा वयात पॉर्न किंवा ब्ल्यू फिल्म यांच्या माध्यमातून दाखवल्या जाणाऱ्या लैंगिक संबंधांबाबतच्या चुकीच्या गोष्टी मुलांच्या मनात बिंबवल्या जाऊ शकतात. त्याचे पुढे आयुष्यभर चुकीचे परिणाम होऊ शकतात. यासाठी आधीच पॉर्न मधल्या चांगल्या-वाईट गोष्टी, त्यातले वास्तव याविषयी मुलांशी त्यांना समजेल अशा भाषेत संवाद केले गेले, तर पुढे अशा गैरसमज व चुकीच्या परिणामांपासून त्यांना वाचवता येऊ शकते. एका ठराविक वयात मुला-मुलींच्या मनात लैंगिक अवयव, लैंगिक भावना, लैंगिकता व लैंगिक संबंध यासंबंधी जे विचार पेरले जातात ते पुढचे अनेक वर्षे कायम राहतात. यासाठीच त्यांना या वयात योग्य माहिती योग्य पद्धतीने पोचवण्यासाठी लैंगिकता शिक्षणाची अत्यंत गरज आहे. शिवाय मुला-मुलींसोबतच किंवा शक्यतो त्यांच्याही आधी पालक व शिक्षक यांचे लैंगिकता शिक्षण पूर्ण व्हायला हवे. जेणेकरून मुलांमध्ये व एकूण समाजामध्ये लैंगिकता शिक्षणाचे महत्त्व व त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलू शकेल.
एकूणच, लैंगिकता शिक्षण हा व्यक्तीला निरोगी, निकोप, विशुद्ध आणि आनंदी जीवन जगण्यासाठी सक्षम करण्यात उपयोगी असा एक आवश्यक घटक आहे. योग्य माहिती, सुरक्षित पद्धती, योग्य भाषेतील संवाद, निरोगी नातेसंबंध आणि लैंगिकतेविषयी असणाऱ्या विविधतेचा आदर करायला शिकवणारे सर्वांगीण लैंगिकता शिक्षण हे पुढील पिढीला अधिक जबाबदार निवडी करण्याचे आणि अधिक जबाबदार लैंगिक वर्तन करण्याचे सामर्थ्य देवू शकते. देशातील आणि राज्यातील धोरणकर्ते, पालक, शिक्षक आणि समाज यांच्या एकत्रित प्रयत्नांतून साध्य होवू शकणारे व्यापक आणि सर्वांगीण लैंगिकता शिक्षण हे सार्वजनिक आरोग्य आणि लोककल्याणाचा आधारस्तंभ बनू शकते.
(लेखक 'अग्गंबाई! अरेच्या!!' या लैंगिकतेविषयक पुस्तकाचे लेखक आणि महाराष्ट्र अंनिसचे राज्य सरचिटणीस आहेत.)
प्रथम प्रसिद्धी:
अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका
जुलै 2024
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा