लैंगिकता शिक्षणाचे टप्पे - अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका - सप्टेंबर २०२४
लैंगिकता शिक्षणासंदर्भात अनेक पालकांच्या मनात हा प्रश्न सतत असतो की आपल्या मुलांशी या विषयावर बोलण्याची सुरूवात नेमकी कधी आणि कशी करावी? तर यासाठी आधी एक पक्के लक्षात घ्यावे लागते की लैंगिकता शिक्षण हे एका दमात देवून टाकून मोकळे होण्यासारखे नाही. शाळेतील किंवा कुठल्या शिबिरातील एक दोन सत्रांमधून सुद्धा हे शिक्षण पूर्ण होण्यासारखे नसते. यासाठी सातत्याने बोलत राहून वयानुसार, त्या त्या वयातील गरज व समजेनुसार आवश्यक ती माहिती देणे व संवाद होणे गरजेचे असते. यामध्ये प्रामुख्याने पालकांचा रोल खूप महत्त्वाचा असतो. अगदी लहान वयापासूनच मुला-मुलींना स्वतःच्या आणि इतरांच्या लैंगिक अवयवांविषयी कुतूहल असते. कारण 'मुलांचे शिश्न' आणि 'मुलींची योनी ' हे अवयव सोडले तर बाकी सर्व अवयव लहानपणी मुलांना सारखेच दिसत असतात; त्यामुळे याच अवयवांविषयी त्यांच्या मनात खास कुतूहल राहणे साहजिक असते. जसे लहान मुलं त्यांना पहिल्यांदाच दिसणारी प्रत्येक गोष्ट चाचपून बघण्याचा, स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असतात, अगदी तसंच याबाबतीतही होत असतं. पण याबाबत पालक व आजूबाजूच्या नातेवाईकांकडून त्यांना मिळणारा प्रति...