लैंगिकता शिक्षणाचे टप्पे - अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका - सप्टेंबर २०२४

लैंगिकता शिक्षणासंदर्भात अनेक पालकांच्या मनात हा प्रश्न सतत असतो की आपल्या मुलांशी या विषयावर बोलण्याची सुरूवात नेमकी कधी आणि कशी करावी? तर यासाठी आधी एक पक्के लक्षात घ्यावे लागते की लैंगिकता शिक्षण हे एका दमात देवून टाकून मोकळे होण्यासारखे नाही. शाळेतील किंवा कुठल्या शिबिरातील एक दोन सत्रांमधून सुद्धा हे शिक्षण पूर्ण होण्यासारखे नसते. यासाठी सातत्याने बोलत राहून वयानुसार, त्या त्या वयातील गरज व समजेनुसार आवश्यक ती माहिती देणे व संवाद होणे गरजेचे असते. यामध्ये प्रामुख्याने पालकांचा रोल खूप महत्त्वाचा असतो.

अगदी लहान वयापासूनच मुला-मुलींना स्वतःच्या आणि इतरांच्या लैंगिक अवयवांविषयी कुतूहल असते. कारण 'मुलांचे शिश्न' आणि 'मुलींची योनी ' हे अवयव सोडले तर बाकी सर्व अवयव लहानपणी मुलांना सारखेच दिसत असतात; त्यामुळे याच अवयवांविषयी त्यांच्या मनात खास कुतूहल राहणे साहजिक असते. जसे लहान मुलं त्यांना पहिल्यांदाच दिसणारी प्रत्येक गोष्ट चाचपून बघण्याचा, स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असतात, अगदी तसंच याबाबतीतही होत असतं. पण याबाबत पालक व आजूबाजूच्या नातेवाईकांकडून त्यांना मिळणारा प्रतिसाद, वागणूक ही त्यांना खूप गोंधळात टाकणारी असते. मुलांनी अगदी स्वतःच्या शिश्न किंवा योनीला जरी हात लावला तरी पालक त्यांना त्यावरून ओरडत व हातावर फटके देत "छी, गंदा, घाणेरडा, घाणेरडी" असं म्हणत असतात. यातून त्यांना नेमकं कळत नसतं कि 'मी असं काय वेगळं केलं कि त्यामुळे एवढा ओरडा किंवा फटका खावा लागला?' शिवाय याचवेळी हा अवयव म्हणजे 'घाणेरडी जागा' आहे असं त्यांच्या मनात बसत जातं व इथूनच सगळं चुकायला सुरुवात होते.
इथं सगळ्यात पहिलं एक आपण लक्षात घेतलं पाहिजे कि लहान मुलांना जसं पाण्याच्या नळाविषयी 'यातून पाणी कसं येतं?' अशा प्रकारचे कुतूहल असतं; अगदी तसंच आपल्या या शिश्न किंवा योनीच्या जागेतून जेव्हा शू बाहेर पडते, तेव्हा त्यांना त्याविषयी अधिक कुतूहल वाटायला लागते. इथून असं कसं पाणी बाहेर येतं? म्हणून देखील ते अनेकदा शिश्न किंवा योनीला हात लावत असतात. शी करत असताना सुद्धा अनेकदा लहान बाळं त्याकडे वाकून वाकून बघत त्याचे निरीक्षण करत असतात. हेसुद्धा याच कुतुहलातून येत असते. त्यात जेव्हा लहान मुलगा व मुलगी एकमेकांचे शिश्न व योनी पाहतात, तेव्हा आपली शू ची जागा व याची/हिची शू ची जागा वेगळी कशी? याचं त्यांना अजून कुतूहल वाटते. त्यावेळी त्यांना आपल्या शिश्न/योनी सोबतच समोरच्याच्या योनी/शिश्नाला सुद्धा हात लावून बघण्याची जिज्ञासा वाढते. शिवाय आपले शिश्न किंवा योनी घरातील इतर सर्व माणसे बघतात, पण त्यांचे आपल्याला कधीच दाखवत नाहीत हेसुद्धा मुला/मुलींना जाणवत जाते. अगदी आईच्या ज्या स्तनांतून आपण दूध पीत होतो, अचानक तेसुद्धा आपल्यापासून लपवले जाते. शिवाय असे स्तन (माम माम) फक्त आईलाच का आहे? बाबाला का नाही? असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात येत असतात. मग अशा वेळी त्यांना आपल्या आई-वडील किंवा घरातील इतरांचे सुद्धा स्तन, शिश्न/योनी, गुदद्वार पहायचे असते. त्याकरता ते अनेकदा वेगवेगळ्या पद्धतीने आटा-पिटा करतात आणि मग अनेकदा फटके सुद्धा खातात.

खरंतर या सगळ्या जिज्ञासा, कुतूहल हे खूप सहज, नैसर्गिक व मुलांना या जगाची ओळख करून देणारे असते. शिवाय या वयात स्वतःच्या लैंगिक अवयवांना हात लावताना मुलांना आनंद सुद्धा मिळत असतो. पण त्यात लैंगिक भावना अजिबात नसते. याचवेळी जर आपण त्यांना समजेल अशा भाषेत त्यांच्याशी बोललो आणि त्यांना याविषयी अधिक माहिती स्वतःहून दिली तर त्यांना हे समजून घ्यायला अधिक मदत होते. आपण जर त्यांच्या जागेवर जाऊन त्यांच्या मानसिकतेतून विचार केला तर आपल्याला या गोष्टी किती सहज व त्यांच्यासाठी किती महत्वाच्या आहेत हे लक्षात येईल. खरंतर मुलांमध्ये असे कुतूहल जेव्हा जागे होईल तेव्हाच त्यांना या शी, शू च्या जागा, आईच्या दूध येण्याची जागा, त्यांची नावे, त्यांची कामे व मुला-मुलींमध्ये असणारे हे वेगवेगळे अवयव यांविषयी त्यांच्याशी त्यांना समजेल अशा भाषेत बोलत राहायला हवं. कधीकधी मुलांनी स्वतःहून नाही विचारलं तरीही पालकांनी स्वतःहून याविषयी त्यांच्याशी संवाद साधून त्यांना ही माहिती द्यायला हवी. आणि त्यानंतर आपले काही विशिष्ट अवयव आपण झाकून ठेवायचे असतात व इतरांना ते दाखवायचे नसतात आणि इतरांचे पहायचे पण नसतात हेसुध्दा त्यांना समजावून सांगायला हवे. यामुळे एकतर त्यांना मिळालेल्या या माहितीमुळे त्यांच्या मनातील कुतूहल कमी होते व त्यांच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांना मिळत जातात. शिवाय या अवयवांविषयी त्यांच्या मनात तिरस्काराची किंवा घाणेरडी भावना सुद्धा येत नाही आणि आपण याविषयी काही प्रश्न आपल्या मनात आले तर आई-बाबांशी बोलू शकतो हा विश्वास त्यांच्या मनात तयार होतो. पुढे होवू शकणाऱ्या बाल लैंगिक शोषण सारख्या प्रकारांपासून सुद्धा आपण यामुळेच मुलांना वाचवू शकतो. कारण बाल लैंगिक शोषणाचे प्रकार हे अगदी तीन वर्षांपासून ते दहा वर्षांपर्यंतच्या मुलामुलींच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात दिसून येतात. त्यामुळे हे आपण अगदी गांभीर्याने घ्यायला हवे आणि त्यासाठीच लैंगिक अवयवांची माहिती व त्यांची शास्त्रीय नावे मुला मुलींना शिकवली गेली पाहिजेत. पण अर्थातच यासाठी आधी पालकांना स्वतःवर काम करावं लागेल. आपली स्वतःची माहिती व दृष्टिकोन स्पष्ट असेल तरच हे काम निःसंकोचपणे करता येऊ शकते. नाहीतर पुन्हा यातून आपल्याकडूनच मुलांकडे चुकीची माहिती किंवा चुकीचा दृष्टिकोन जाण्याची पण शक्यता आहेच.
लहानपणीच योग्य माहिती न मिळाल्याने व तसे वातावरण घरात किंवा आजूबाजूला नसल्याने या वयात केले गेलेले हे लैंगिक अवयवांविषयीचे कळत नकळत चे चुकीचे संस्कार पुढे आयुष्यभर तसेच राहतात आणि त्यातून मुला/मुलींना पुढे अनेक मानसिक कुचंबना, गोंधळ व गैरसमजांना सामोरे जावे लागते. म्हणूनच मुलांना योग्य वयात योग्य माहिती देण्यासाठी मुलांच्या आधी पालकांचे लैंगिकता शिक्षण होणे खूप गरजेचे आहे. आपल्या लैंगिक अवयवांसंबंधी पालकांना आधी योग्य माहिती व योग्य दृष्टीकोन असेल तरच ते मुलांपर्यंत पोचवू शकतात. पण बहुतांशी पालकांना सुद्धा आपल्या लैंगिक अवयवांसंबंधी व्यवस्थित माहिती नसते. कारण त्यांना सुद्धा कुणी याविषयी कधी शास्त्रशुद्ध पद्धतीने सांगितलेले नसते. अगदी शाळा कॉलेजमध्ये सुद्धा लैंगिकता शिक्षण किंवा लैंगिक अवयव याविषयीची प्रकरणे स्कीप केली जातात. त्यामुळे पालकांसोबतच शिक्षकांचे सुद्धा प्रशिक्षण व्हायला हवे.

लैंगिकता शिक्षणामध्ये मुलांच्या वयोगटानुसार त्यांना काय माहिती द्यायची हे जास्त महत्त्वाचे आहे. यामध्ये वर सांगितल्याप्रमाणे आधी लैंगिक अवयवांविषयी नकारात्मक प्रतिक्रिया न जावू देणे हे मूलभूत आहे. त्यानंतर प्रत्यक्ष संवादाच्या पातळीवर अगदी तीन वर्षांच्या मुलांपासून या संवादाची सुरूवात आपण करू शकतो. या वयात त्यांना शरीराच्या इतर अवयवांसोबतच तितक्याच मोकळेपणाने, मनात कोणताही संकोच न आणता लैंगिक अवयव, त्यांची शास्त्रशुद्ध नावे व त्यांचे कार्य याविषयी सुद्धा सांगायला हवे. यासाठी अनेकदा चित्रांचा वापर केला जातो. त्यामध्ये पूर्ण शरीर दिसेल अशा चित्रांचा वापर करावा. लैंगिक अवयव झाकून ठेवलेली चित्रे वापरू नयेत. याचवेळी लैंगिक अवयवांच्या खाजगीपणा विषयी सुद्धा मुलांना सांगावे. गुड टच, बॅड टच याविषयी माहिती द्यावी.
या वयात मुलांच्या मनात अनेक प्रश्न येतील. ज्यात लैंगिक अवयवांसोबतच मी या जगात कसा आलो? आईच्या पोटात कसा गेलो? यांसारखे मूलभूत प्रश्न सुद्धा असतात. या सर्व प्रश्नांची उत्तरे पालक म्हणून आपण मुलांना समजेल अशा भाषेत देत राहायला हवीत. यात अतिशय महत्त्वाचे म्हणजे मुलांच्या मनातील कोणत्याही प्रश्नाला चुकीचे न समजता किंवा त्यावरून त्यांना ओरडून गप्प न बसवता त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला जमेल तसे, पण बरोबर उत्तर द्यायला हवे. अगदीच त्या वेळी काय उत्तर द्यावे हे सुचत नसेल तर 'मी याचे उत्तर नंतर देते/देतो' असं सांगून नंतर व्यवस्थित माहिती घेवून आठवणीने त्याचे उत्तर द्यावे. मुलांशी खोटे बोलू नये किंवा वेळ मारून न्यायची म्हणून काहीतरी खोटे उत्तर देवू नये. कारण यामुळे मुलांना जेव्हा हे लक्षात येईल तेव्हा त्यांचा तुमच्याबद्दलचा विश्वास कमी होवू शकतो.
यापुढच्या टप्प्यावर साधारण सहा-सात ते दहा-बारा या वयोगटातील मुलामुलींसोबत त्यांच्या आयुष्यात पुढे होणाऱ्या हार्मोनल चेंजेस आणि त्यातून त्यांच्या शरीर आणि मनामध्ये होवू शकणारी उलथापालथ याविषयी सांगायला हवे. त्यातच मासिक पाळी आणि वीर्यमुक्ती या दोन्ही अतिशय महत्त्वाच्या गोष्टी येतात. याविषयी अभ्यासपूर्ण माहिती देवून त्यांची त्यासाठी मानसिक तयारी करून घ्यायला हवी. या काळातील स्वच्छतेविषयी माहिती द्यायला हवी. मुलांच्या मनात या गोष्टींविषयी कोणताही न्यूनगंड, भीती किंवा नकारात्मक भावना येणार नाहीत याची काळजी घेवून या काळात तुम्ही त्यांच्यासोबत आहात आणि काहीही झाले, वाटले तरी ते तुमच्याशी येवून बोलू शकतात हा विश्वास त्यांना देणे गरजेचे आहे.
 यानंतरचा टप्पा हा साधारण किशोरवयीन म्हणजेच टीनेजर्सचा आणि त्यानंतर तारुण्याचा टप्पा. या टप्प्यांमध्ये मुलांना वेगवेगळ्या लैंगिकता, लैंगिक आकर्षण, प्रेम व आकर्षण यातील फरक, प्रत्यक्ष लैंगिक संबंध, गर्भनिरोधके आणि रिलेशनशिप या सर्व मुद्द्यांवर त्यांचे मित्र मैत्रिणी म्हणून बोलायला हवे. मुलांनी किशोरवयात पदार्पण केल्यापासून पालकांनी त्यांचे पालकत्व मित्रत्वात बदलायला सुरू करायला हवे. तरच मुलांसोबत व्यवस्थित रॅपो ठेवता येईल व त्यांच्या या नाजूक टप्प्यात आपल्याला त्यांच्यासोबत राहून त्यांना सावरताही येईल व साथही देता येईल.

- सचिन थिटे (8424041159)
ईमेल - srthite@yahoo.co.in
-------------------------------------------------------------
प्रथम प्रसिद्धी - 
अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका - सप्टेंबर २०२४

(लैंगिकता व लैंगिक संबंधांशी संबंधित वेगवेगळ्या महत्त्वाच्या विषयांवर अधिक माहिती घेण्यासाठी आपले 'अग्गंबाई! अरेच्या!!' हे पुस्तक नक्की वाचा.
पुस्तकांसाठी संपर्क - राजवैभव - 8600810043
सचिन - 8424041159)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध