शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)
सर्वच लहान मुलं ही चुकांतूनच शिकत शिकत मोठी होत असतात. आज मोठे असणारेही अशाच पद्धतीने मोठे झाले आहेत आणि उद्याचेही असेच मोठे होणार आहेत. अशा वेळी त्यांच्याकडून होणाऱ्या चुकांच्या वेळी आजूबाजूचे मोठे त्यांच्याशी कसे वागतात? यावरून या लहानांचे भावविश्व आणि पुढील व्यक्तिमत्त्वातील अनेक गोष्टी घडत असतात.
एकतर लहान मुलांसोबत राहताना, वागताना मोठ्यांनी अनेक गोष्टी आधी स्वतः समजून लक्षात घेऊन वागणे गरजेचे असते. मुलांसाठी हे जग पूर्णपणे नवीन आहे आणि आपल्यासाठी अगदी क्षुल्लक असणारी गोष्ट सुद्धा किंवा अगदीच गंभीर असणारी गोष्ट सुद्धा त्यांच्यासाठी मात्र नवीन असल्याने त्यांना या दोन्हीही गोष्टी सारख्याच असतात हे लक्षात घ्यायला हवे.
मुलांच्या अनेक कृती किंवा बोलण्यांमध्ये त्यांचे आपल्याला माहिती असणारे अर्थ त्यांना अनेकदा माहिती पण नसतात किंवा त्यांचे महत्त्व किंवा गांभीर्य त्यांना माहिती नसते. अगदी निरागसपणे कुठेतरी ऐकलेले शब्द ते त्यांच्या त्यांच्या समजेनुसार कुठे कुठे वापरत असतात.
हे जर आधी पालकांनी किंवा आजुबाजूच्या सर्वच मोठ्यांनी नीट समजून घेतले तर त्यांना आपल्या या लहान मुलांशी अशा प्रसंगी कसे बोलावे आणि वागावे किंवा किमान कसे बोलू नये आणि वागू नये याचे काही प्रमाणात भान येऊ शकते.
- सचिन (8424041159)
#parenting #पालकत्व #sachinthite #सचिन
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा