पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)
मुक्त लैंगिकतेचा पुरस्कार करताना किंवा याविषयी काहीही मत बनवण्याआधी आपल्याला मुक्त लैंगिकता म्हणजे नेमके काय? हे समजून घ्यायला हवे. फक्त लैंगिकता हा शब्द आल्यामुळे काहींच्या मनात त्याच्या मुक्तपणाविषयी नकारात्मक भावना येवू शकतात किंवा काहींना हे आपल्यासाठी मोकळे रान असल्यासारखे वाटू शकते. यासाठीच याच्या सर्व बाजू आधी समजून घेऊन मगच आपले मत बनवायला हवे.
मुक्त लैंगिकतेचा विचार करताना सर्वप्रथम आपल्याला हे समजून घ्यावे लागते की समाजात वेगवेगळ्या प्रकारच्या लैंगिकतेचे व्यक्ती असतात. ज्यामध्ये भिन्नलिंगी, समलिंगी, उभयलिंगी, ट्रान्सजेंडर, असेक्शुअल व यांसारखे इतर अनेक प्रकार असतात. यातल्या काही प्रकारांविषयी आपल्या आधीच्या लेखांत व 'अग्गंबाई अरेच्चा' या पुस्तकात लिहिलेले आहेच आणि अजूनही पुढे सुद्धा शक्य तेवढ्या प्रकारांविषयी आपण बोलणारच आहोत. तर अशा सर्व प्रकारच्या लैंगिकता आपल्याला आधी किमान माहिती असायला हव्यात आणि मग त्या मान्य सुद्धा असायला हव्यात. या वेगवेगळ्या लैंगिकतेच्या व्यक्तींना आपण वेगळ्या नजरेने न पाहता किंवा यांच्याविषयी मनात कोणतेही नकारात्मक भाव न ठेवता त्यांनाही मोकळेपणाने स्वीकारायला हवं. त्याच्या पुढे जावून या वेगवेगळ्या लैंगिकतेच्या व्यक्तींची लैंगिक संबंधाची पद्धत सुद्धा वेगवेगळी असू शकते. जसे की शिश्न-योनी मैथुन, मुखमैथुन, गुदमैथुन, हस्तमैथुन. आपल्या 'अग्गंबाई अरेच्चा' या पुस्तकात या प्रकारांविषयी बऱ्यापैकी सविस्तर लिहिलेले आहे. अजूनही पुढच्या लेखांत कधी संदर्भ येतील तसे त्याविषयी सविस्तर बोलूच. तर हे सर्व प्रकारचे किंवा यातील कोणत्याही प्रकारचे लैंगिक संबंध जर स्वेच्छेने व परस्पर संमतीने होत असतील तर ते नॉर्मल असतात हे आपल्याला मान्य असायला हवे. अशा ठिकाणी कुणीच विरोध करण्याचा किंवा हरकत घेण्याचा काहीच संबंध येत नाही. तसेच प्रत्येक व्यक्तीच्या, मग ती कोणत्याही लैंगिकतेची असो, तिच्या लैंगिक इच्छा, अनिच्छा, लैंगिक आनंद व आवडी-नावडी वेगवेगळ्या असू शकतात. त्यांचे प्रमाण किंवा तीव्रता सुद्धा कमी जास्त असू शकते. ती एखाद्याला चुकीची वाटू शकते. कुणाला एखाद्याची लैंगिक इच्छा कमी, तर कुणाला ती जास्त वाटू शकते. कुणी एखादा सेक्स बाबतीत खूपच उत्साही किंवा आग्रही असू शकतो, तर कुणी अजिबातच उत्साही नसू शकतो. कुणाला सेक्स मध्ये वेगवेगळे प्रयोग किंवा आसने करायला आवडू शकतं, तर कुणाला ते नाही आवडू शकत. या सर्व गोष्टी लक्षात घेवून आपल्याला प्रत्येकाच्या या भावनांचा, इच्छांचा व अनिच्छांचा आदर करता यायला हवा.
त्याचबरोबर कोणत्याही लैंगिकतेची व्यक्ती स्वेच्छेने व परस्पर संमतीने स्वतःच्या किंवा इतर कोणत्याही लैंगिकतेच्या व्यक्तींशी लैंगिक संबंध ठेवू शकते हे आपल्याला मान्य असायला हवे. शिवाय असे लैंगिक संबंध एकावेळी एकापेक्षा जास्त व्यक्तींसोबत सुद्धा असू शकतात, ठेवू शकतात. लैंगिक इच्छा एकाच पार्टनर कडून पूर्ण होवू शकेलच असं नाही आणि ती होवू शकणार नाही असंही नाही. त्यामुळे एकदा एक पार्टनर निवडला म्हणजे इतर कुणाच बाबत लैंगिक इच्छा मनात येत नाही असे होत नाही. तसेच अनेकदा आपण स्वेच्छेने किंवा इतरांच्या मर्जीने निवडलेला पार्टनर याच्या सोबत सेक्सची इच्छा होईलच किंवा झालीच तरी ती कायमस्वरूपी टिकून राहीलच असंही नाही. त्यामुळे एकदा निवडलेल्या पार्टनर सोबतच आयुष्यभर सेक्स करत राहण्याची सक्ती ही अतिशय अन्यायकारक असते आणि त्यातून लैंगिक आनंद हा कधीच हरवलेला असतो हे आपल्याला लक्षात घ्यावे लागते. शिवाय समोरच्या जोडीदाराची इच्छा नसताना त्याच्यावर किंवा तिच्यावर सेक्स साठी केली गेलेली सक्ती हा एक प्रकारचा लैंगिक बलात्कारच आहे. आणि आपल्या सध्याच्या विवाहसंस्थेत तरी एकाच जोडीदारासोबत सेक्स करण्याचे बंधन घातल्याने असे लैंगिक बलात्कार राजरोस घडत आहेत. म्हणूनच मुक्त लैंगिकतेचा पुरस्कार करताना आपल्याला अशा समाजमान्य बलात्कारांच्या विरोधात सुद्धा ठामपणे उभे राहायला हवे.
प्रत्येक स्त्री पुरुषास आणि सर्व प्रकारच्या लैंगिकतेच्या व्यक्तीस कुणावर जबरदस्ती न करता, स्वेच्छेने व परस्पर संमतीने त्यांना हवा तसा, हवा तेवढा लैंगिक आनंद घेण्याचा अधिकार आहे हे मान्य करणे हा खऱ्या अर्थाने मुक्त लैंगिकतेचा पाया आहे.
शेवटी मुक्त लैंगिकतेची एकूणच एका वाक्यात व्याख्या करायची झालीच तर ती अशी करता येईल - *समाजात वेगवेगळ्या प्रकारच्या लैंगिकता असतात, त्यांच्या लैंगिक इच्छा-अनिच्छा, लैंगिक आनंद व लैंगिक आवडी-नावडी वेगवेगळ्या असू शकतात आणि कोणत्याही लैंगिकतेच्या व्यक्ती कोणत्याही लैंगिकतेच्या एक किंवा अनेक व्यक्तींशी स्वेच्छेने व परस्पर संमतीने कोणत्याही प्रकारचे लैंगिक संबंध ठेवू शकतात व ते नाकारू ही शकतात हे मान्य असणे म्हणजे मुक्त लैंगिकता होय.*
- सचिन (8424041159)
(आपली मते, सूचना, अभिप्राय, अनुभव वरील नंबर वर व्हॉट्सॲप करून नक्की कळवा.)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा