पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 5 - कन्सेंट आणि कमिटमेंट - 2)
कन्सेंट आणि कमिटमेंट यातील फरक आपण मागच्या लेखात सविस्तर पाहिला. आता आपण या दोन्ही गोष्टींचा सेक्स संदर्भात विचार करूयात. सेक्स करताना कन्सेंट घ्यायला हवी की नको? असं विचारलं तर एकमताने सर्वांचं उत्तर 'घ्यायला हवी' असंच येईल. पण तरीही प्रत्यक्षात अशी कन्सेंट सगळीकडे घेताना आपल्याला दिसते का? तर याचे उत्तर 'नाही' असेच येते. आपली विवाहसंस्था तर लग्नानंतर पुरुषाला स्त्री जोडीदारासोबत सेक्स करण्याचा मुक्त परवाना च बहाल करत असते. त्यात तिला विचारण्याचा किंवा तिची परवानगी (कन्सेंट) घेण्याचा प्रश्नच येत नाही. अशी कन्सेंट न घेता, इच्छा नसताना, जबरदस्तीने लादले जाणारे लैंगिक संबंध हे बलात्कार च असतात, मग ते वैवाहिक जोडीदाराकडून का झालेले असेनात. असे अनेक विवाहांतर्गत बलात्कार आपल्याकडे राजरोस घडत असतात. विवाह झालेला नसताना जर विना परवानगी कोणी असा सेक्स लादला तर त्याच्यावर लगेच बलात्काराचा गुन्हा दाखल होतो (तो व्हायलाही हवाच); पण हाच अनैच्छिक, विना परवानगी (विना कन्सेंट) केलेला सेक्स फक्त 'विवाह झालाय' आणि 'नवऱ्यानेच केलाय' या नावाखाली मात्र त्याला समाजमान्यता मि...