पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 5 - कन्सेंट आणि कमिटमेंट - 2)
कन्सेंट आणि कमिटमेंट यातील फरक आपण मागच्या लेखात सविस्तर पाहिला. आता आपण या दोन्ही गोष्टींचा सेक्स संदर्भात विचार करूयात. सेक्स करताना कन्सेंट घ्यायला हवी की नको? असं विचारलं तर एकमताने सर्वांचं उत्तर 'घ्यायला हवी' असंच येईल. पण तरीही प्रत्यक्षात अशी कन्सेंट सगळीकडे घेताना आपल्याला दिसते का? तर याचे उत्तर 'नाही' असेच येते. आपली विवाहसंस्था तर लग्नानंतर पुरुषाला स्त्री जोडीदारासोबत सेक्स करण्याचा मुक्त परवाना च बहाल करत असते. त्यात तिला विचारण्याचा किंवा तिची परवानगी (कन्सेंट) घेण्याचा प्रश्नच येत नाही. अशी कन्सेंट न घेता, इच्छा नसताना, जबरदस्तीने लादले जाणारे लैंगिक संबंध हे बलात्कार च असतात, मग ते वैवाहिक जोडीदाराकडून का झालेले असेनात. असे अनेक विवाहांतर्गत बलात्कार आपल्याकडे राजरोस घडत असतात. विवाह झालेला नसताना जर विना परवानगी कोणी असा सेक्स लादला तर त्याच्यावर लगेच बलात्काराचा गुन्हा दाखल होतो (तो व्हायलाही हवाच); पण हाच अनैच्छिक, विना परवानगी (विना कन्सेंट) केलेला सेक्स फक्त 'विवाह झालाय' आणि 'नवऱ्यानेच केलाय' या नावाखाली मात्र त्याला समाजमान्यता मिळते. हे समाज म्हणून आपण अजूनही किती मागास आहोत याचेच उदाहरण आहे.
आपण वैवाहिक नात्यात असू किंवा नसू; दोन्हीही स्थितीत सेक्स करताना समोरच्याची कन्सेंट विचारात घेणे गरजेचे असतेच असते हे आधी पक्कं करून घ्यायला हवं. त्यानंतर यापुढचा प्रश्न असा आहे की आता दोघेही एकमेकांशी वैवाहिक नात्यात नाहीत आणि तरी त्यांना एकमेकांशी सेक्स करायचा आहे. तर अशा वेळी काय?
इथं तिला तो आवडतोय आणि त्यालाही ती आवडतेय. दोघांना एकमेकांबद्दल ओढ आहे. या ओढीतूनच पुढे ते दोघे सेक्स रिलेशन मध्ये येतात. यामध्ये दोघांची इच्छा तर आहे, पण कमिटमेंट चे काय? यातील एकाला हे नातं फक्त सेक्स रिलेशन पुरतं मर्यादित ठेवावं वाटत असेल आणि दुसऱ्याला मात्र हे सेक्स रिलेशन च्या पुढे जावून भावनिक नातं वाटत असेल तर काय?
सुरुवातीला दोघेही एकमेकांना याबाबत काहीच स्पष्ट बोलत नाहीत आणि पुढे जावून मात्र मग यातून गुंते सुरू होतात. समोरच्याकडून परस्पर काही अपेक्षा ठेवल्या जातात, त्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात असा अट्टाहास धरला जातो. आणि त्या पूर्ण नाही झाल्या की त्यावरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू होवून हे नाते दोघांपैकी एकाला किंवा कधी दोघांनाही अडचणीत आणणारे ठरते.
आता यात वेगवेगळी परिस्थिती असू शकते. कधी हे दोघेही अविवाहित असू शकतात. कधी त्यांच्यापैकी एकजण विवाहीत असू शकतो/शकते, तर कधी दोघेही विवाहीत असू शकतात. यात पण कधी त्यांचा जोडीदार सध्या आयुष्यात त्यांच्या सोबत असू शकतो, तर कधी सोबत नसू शकतो. कधी त्यांना जोडीदाराकडून तक्रारी असू शकतात, तर कधी त्या नसूही शकतात. जोडीदार सोबत नसण्याची कारणे कधी तो/ती जिवंतच नाहीत म्हणून, कधी घटस्फोट झाला आहे म्हणून तर कधी ते सोबत राहत नाहीत म्हणून असं काहीही असू शकतं.
या प्रत्येक परिस्थिती मध्ये मनातील भावना आणि नवीन नात्याच्या गरजा वेगवेगळ्या असू शकतात. अशा वेळी या नवीन सेक्स रिलेशन बद्दल सुद्धा वेगवेगळ्या भावना व अपेक्षा असू शकतात. इथे इच्छा व कन्सेंट दोघांचीही असू शकते, पण कमिटमेंट ची भावना मात्र दोघांमध्ये सुद्धा असेलच असं नाही किंवा असली तरी ती सारखी असेलच असं नाही.
म्हणूनच इथे - सेक्स करताना कन्सेंट जास्त महत्त्वाची की कमिटमेंट? - हा प्रश्न जास्त महत्त्वाचा ठरतो. म्हणजे जसं नात्यात कमिटमेंट असली तरी सेक्स करताना प्रत्येक वेळी एकमेकांची कन्सेंट पाहूनच सेक्स करायला हवा आणि तसं न करणं हे अयोग्य असेल असं आपण म्हणतो. तसं दोघांची कन्सेंट असताना पण पुढील नात्याची, भावनिकतेची किंवा अपेक्षित साथ देण्याची कमिटमेंट नसताना सेक्स करणे योग्य की अयोग्य? हा प्रश्न आहे. इथे हेसुद्धा मान्यच आहे की बहुतेकांना कमिटमेंट आणि कन्सेंट या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या वाटत असणार. आणि अर्थातच जिथे कमिटमेंट आणि कन्सेंट सोबत लैंगिक इच्छा आणि आनंद या गोष्टींची सांगड जुळत आहे, ते नातं भारीच असणार आहे; पण जिथे या गोष्टी जुळत नाहीत तिथे पुढचे मुद्दे येतात.
इथे सुद्धा प्रत्येकाचे संदर्भ, प्रत्येकाच्या गरजा व कारणे वेगवेगळे असल्या कारणाने प्रत्येकाची याबाबतची भूमिका वेगवेगळी असू शकते हे देखील मान्य आहे. पण एकमेकांसोबत कमिटमेंट नसताना सुद्धा एकमेकांच्या कन्सेंट ने दोघेजण सेक्स करू शकतात आणि तो एन्जॉय सुद्धा करू शकतात हे मात्र नक्की. एकवेळ नात्यातील कमिटमेंट असूनसुद्धा कन्सेंट शिवाय केलेला सेक्स हा जबरदस्तीचा असल्याने त्रासदायक ठरू शकतो; पण त्याच वेळी दोघांनी ठरवून कोणत्याही भावनिक गुंत्यात न अडकता त्यावेळचा क्षण एकमेकांसोबत शेअर करणे हे जास्त आनंददायी वाटू शकते. समजून उमजून आपल्याशी पूरक असणाऱ्या व आपल्या आवडीच्या जोडीदारासोबत एकमेकांवर कोणत्याही अपेक्षांचे ओझे न टाकता आपल्याला सेक्स रिलेशन एन्जॉय करता येवू शकते. अपेक्षांचे किंवा कमिटमेंट चे ओझे हे अनेकदा अशा आनंदावर विरजण टाकणारे असू शकते.
आता अर्थात यात पुन्हा प्रत्येकाच्या स्वभावानुसार वेगवेगळ्या भावना व भूमिका असू शकतात. अनेकांना कमिटमेंट ही आयुष्यात इतकी जास्त महत्त्वाची वाटू शकते की ज्यासाठी ते एकवेळ विना कन्सेंट सेक्स सुद्धा सहन करतील, पण ती व्यक्ती कायम सोबत असावी असं म्हणतील. आजूबाजूला शोध घेतल्यास अशीच उदाहरणे आपल्याला जास्त दिसतील. त्यांना सुद्धा लगेच चूक म्हणता येत नाही. कारण त्याची सुद्धा अनेक कारणे आहेत. ज्यात परंपरा, संस्कार, समाज, सुरक्षा, स्थैर्य, शाश्वती, मुलं, त्यांचं भविष्य अशी अनेक कारणं असतात. ती अनेकदा अपरिहार्य असतात आणि गरजेची सुद्धा असतात. हे सगळं जपत जपत आपल्याला आपला लैंगिक आनंद घेता आला तर अधिक चांगलं असणार आहे.
कमिटमेंट चे किंवा इतर न पेलू शकणाऱ्या कोणत्या अपेक्षांचे ओझे एकमेकांवर न ठेवता आपल्या आवडीच्या जोडीदारासोबत दोघांच्या म्युचुअल कन्सेंट ने आनंदाने सेक्स रिलेशन मध्ये राहता आले तर अधिक चांगले. आधी व्यवस्थित बोलून आणि दोघांनीही समंजसपणे असं ठरवून हे नक्कीच करता येवू शकते.
अर्थात कन्सेंट या प्राथमिक मुद्द्यानंतर कमिटमेंट हा फक्त एक महत्त्वाचा मुद्दा इथे आपण पाहिलाय. याशिवाय इतर अजून अनेक मुद्दे आहेत जे सेक्स रिलेशन ठेवताना विचारात घेणे महत्त्वाचे असतात. ते आपण पुढे पाहणारच आहोत.
- सचिन (8424041159)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा