पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 4 - कन्सेंट आणि कमिटमेंट)

कन्सेंट आणि कमिटमेंट या दोन्हीही गोष्टी नात्यातील अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या गोष्टी आहेत. दोन्हींचा वापर करण्याच्या जागा वेगवेगळ्या असल्या तरी त्या त्या ठिकाणचे त्यांचे महत्त्व कायम असते. अर्थात आपल्याकडे अनेकदा प्रेमाच्या किंवा एखाद्या नात्याच्या हक्कातून एकमेकांना गृहीत धरण्यामुळे या गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते. नात्यातील अशी अनेक उदाहरणे सांगता येतील जिथे कन्सेंट किंवा कमिटमेंट आवश्यक असूनही विचारात घेतले जात नाहीत. 
आधी आपण या दोन्ही शब्दांचा अर्थ व्यवस्थित समजून घेवू. आपल्या अनेक मित्र - मैत्रिणींना कन्सेंट आणि कमिटमेंट यातला नेमका अर्थ लक्षात येत नसल्याचे त्यांनी प्रांजळपणे कळवल्याने त्याबाबत जरा सोप्या भाषेत आणि जरा जास्त सविस्तर लिहिण्याचा प्रयत्न करत आहे.

कन्सेंट म्हणजे परवानगी आणि कमिटमेंट म्हणजे वचन किंवा निष्ठा. कन्सेंट ही तात्कालिक असते, तर कमिटमेंट ही दीर्घकाळासाठी असते. आपल्याला एखादी गोष्ट करण्यासाठी आपण समोरच्याची परवानगी मागतो आणि तो किंवा ती परवानगी देतात किंवा नाकारतात. तिथेच हा विषय संपतो. त्याची जबाबदारी सुद्धा तेवढ्यापुरतीच, कमी वेळेचीच असते. कमिटमेंट मात्र दीर्घकाळासाठी एखादी गोष्ट करण्याचे दिलेले वचन किंवा एखाद्यासोबत दीर्घकाळ असणारी निष्ठा असते. त्याची जबाबदारी ही जास्त काळासाठी असते. ती लगेच संपत नाही. आपल्याला सतत आपण केलेल्या कमिटमेंट ची आठवण ठेवावी लागते. काहीही झाले तरी ती मोडता कामा नये यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहतो. कन्सेंट म्हणजेच परवानगी हा बऱ्याचदा कायदेशीर विषय असतो. परवानगी घेतली किंवा घेतली नाही यावरून कायदेशीर की बेकायदेशीर असा खटला चालू शकतो. बेकायदेशीर सिद्ध झाले तर तिथे शिक्षाही होवू शकते. म्हणजेच कन्सेंट ला कायद्याचा आधार, धाक आणि भीती असं सगळं आहे. त्या अर्थाने त्याला खूप महत्त्व आहे.
कमिटमेंट म्हणजेच वचन किंवा जबाबदारी. याला तसा पाहिला तर कायद्याचा आधार नसतो. ही कायदेशीर बाब नसून भावनिक बाब असते. आपण एखाद्या गोष्टीसाठी कुणासोबत तरी कमिटेड आहोत ही बाब आपल्याला आपल्या जबाबदारीची जाणीव करून देत असते. तशीच ती आपल्यासाठी तेवढीच आनंदाची, समाधानाची बाब सुद्धा असते. म्हणजे आपल्या आयुष्यात असं कुणीतरी आहे, ज्याच्यावर आपण इतका विश्वास टाकू शकतो ही भावनाच आपल्यासाठी अतिशय सुखावणारी असते. म्हणजेच कायदेशीर बाब नसली, तरी कमिटमेंट ही मोठ्या कालावधीसाठी आणि तितकीच महत्त्वाची असते. कमिटमेंट ला नैतिक, भावनिक वजन असते. एखाद्याला आपल्या आयुष्यात स्वतःपेक्षा जास्त महत्त्व देणे हेसुद्धा अनेकदा कमिटमेंट मध्ये असते. म्हणूनच बऱ्याचदा कमिटमेंट ही एखाद्याच्या जगण्याचा आधार सुद्धा असते आणि ती जेव्हा तोडली जाते, तेव्हा जगण्यातला अर्थ च संपला असं त्यांना वाटत असतं. 
कन्सेंट मात्र तात्कालिक असली तरी कायदेशीर बाब आहे. अर्थातच नैतिकदृष्ट्या सुद्धा कन्सेंट ला महत्त्व असतेच, पण त्यापेक्षा कायद्याचा धाक यात जास्तच असतो.

आता या दोन्ही गोष्टींचा आपल्या नात्यावर होणारा परिणाम सुद्धा वेगवेगळा आहे आणि यांचे नात्यातील स्थान व महत्त्व सुद्धा वेगवेगळे आहे. कमिटेड नात्यात जबाबदारी सोबत अधिकार आणि अपेक्षा सुद्धा येत असतात. आपल्या जोडीदाराला अधिकाराने काही गोष्टी सांगणे, मागणे असते. कधी काळजीने जोडीदारासाठी काही गोष्टी करणे असते. कमिटमेंट ही फक्त जबाबदारी नाही, तर काळजी, प्रेम, विश्वास, शाश्वती, हक्क, हट्ट, लाड करणे आणि समोरच्याने करावे अशी अपेक्षा ठेवणे असं बरंच काही यात असतं. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे काहीही झालं तरी माझा जोडीदार कायम माझ्या सोबत आहे ही खात्री इथे असते. शिवाय कमिटमेंट मध्ये दोघांच्या एकमेकांकडून ज्या काही अपेक्षा असतात, या अपेक्षा कधी दोघांनी एकमेकांशी बोलून ठरवलेल्या असतात तर कधी न बोलताच परस्पर आपापल्या मनात ठरवलेल्या असतात. कधी यामध्ये समोरच्याच्या क्षमता विचारात घेतलेल्या असतात, तर कधी नसतात. अशा अनेक बोललेल्या किंवा अबोल असणाऱ्या अपेक्षा पूर्ण करण्याची एक जबाबदारी सुद्धा कमिटेड नात्यात असते. त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर त्यातून नात्यात दुरावा सुद्धा येत जातो. कमिटमेंट मध्ये प्रेम, काळजी, अपेक्षा, जबाबदारी या सगळ्यांत अनेकदा अनेक ठिकाणी आपला जोडीदार ही स्वतंत्र व्यक्ती आहे आणि कधी कधी किंवा अनेकदा सुद्धा काही गोष्टी करताना किंवा ठरवताना आपल्या जोडीदाराची सुद्धा परवानगी (कन्सेंट) घेणे गरजेचे असते, हे आपण विसरत असतो. एकदा नात्यात कमिटेड असलो तर मग कशाला हवीय परवानगी वगैरे सोपस्कार? असंही अनेकांना वाटत असतं. यामुळे नातं बिघडण्याची शक्यता व भिती असते.
खरंतर यासाठी सुद्धा कन्सेंट चं महत्त्व समजून घेणं आधी गरजेचं असतं.

कन्सेंट आणि कमिटमेंट यांचे व्यवहारात सुद्धा वेगवेगळे संदर्भ आणि उपयोग आहेत. पण आपण इथे फक्त नात्यांसंदर्भात च बोलत आहोत. एकूण आपल्या हे लक्षात आले असेल की नात्यांमध्ये दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असल्या तरी दोन्हींमध्ये बेसिक असणारा फरक म्हणजे कमिटमेंट मध्ये असणाऱ्या अपेक्षा, जबाबदारी कन्सेंट मध्ये नसतात. कन्सेंट तात्कालिक असते.

आता आपण या दोन्ही गोष्टींचे सेक्स रिलेशन मध्ये असणारे महत्त्व यावर बोलणार आहोत.
एकमेकांशी Sexual relationship ठेवताना काय जास्त महत्त्वाचे असते? Consent कि Committment? हा आपला मुख्य मुद्दा आहे. यावर आपण पुढच्या स्वतंत्र लेखात बोलुयात.

- सचिन (8424041159)

(तोपर्यंत तुम्हाला काय वाटतं याविषयी, हे तुम्ही जरूर कळवा. अनेकांनी मागेच छोट्या पोस्टवर आपले मत व्यक्त केले आहेच. तरी अजूनही काही वेगळे मत असेल किंवा पुन्हा आपले मत विस्तृत व्यक्त करायचे असेल तरीही आपले मत जरूर कळवा.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध