शेअरिंग-केअरिंग - 27 - आयेशाच्या आत्महत्येच्या निमित्ताने

आयेशा गेली. जाताना सर्वांना चटका लावून गेली. तिचा आतून प्रचंड दुःखी असूनही वरवर इतका गोड, हसरा दिसणारा चेहरा सर्वांच्या काळजात चर्र करून गेला. इतकी हसतमुख मुलगी आत्महत्या कशी करू शकते? असा प्रश्न सर्वांना पडला. मग या व्हिडिओ नंतर तिच्या घरच्यांसोबत झालेले तिचे मोबाईलवरचे बोलणे ऐकले. त्यात हीच हसणारी मुलगी किती खचून गेलेली जाणवतेय. ज्याच्यावर प्रेम केलं, त्याच माणसाने धोका दिला याचं दुःख तिला इतकं असह्य झालं होतं कि आता एकही क्षण जगण्याची तिची इच्छा राहिली नव्हती. यात तिच्या जोडीदाराने तिला व तिच्या कुटुंबियांना हुंड्यासाठी छळल्याचे जाणवते; पण आयेशाचे दुःख ते दिसत नाहीये, तर 'त्या तिच्या जोडीदाराला तिच्यापासून मुक्ती हवीय' हे तिचे सर्वांत मोठे दुःख आहे. 'मी ज्याच्यावर जीवापाड प्रेम केले, त्यालाच जर आता मी नको असेल तर माझा जगून काय उपयोग?' अशा भावनेतून ती दुःखी झालीय आणि एवढ्या मोठ्या निर्णयापर्यंत पोचलीय.

आयेशा बद्दल खूप वाईट वाटलंच. पण त्याचवेळी मनात प्रश्न आला कि- अशा किती मुली व मुलं सुद्धा या आयेशाच्या मनःस्थितीतून जात असतात. तत्क्षणी अनेक चेहरे व अनेक बातम्या समोर आल्या. प्रेमातील किंवा लग्नातील नैराश्यातून आत्महत्या, हत्या व हल्ले अशा अनेक घटना डोळ्यासमोर उभ्या राहिल्या.
का होतं हे असं? प्रेमासारख्या सुंदर भावनेचा असा अंत किंवा इतका उद्विग्न कडेलोट का होतो? प्रेम व लग्न या विषयावर गेले काही वर्षे जमेल तितकं काम करतोय. जास्तीतजास्त मुलं-मुली व पालकांपर्यंत पोचायचा प्रयत्न करतोय. प्रत्यक्ष संवादशाळा घेतोय, ऑनलाइन प्रशिक्षण घेतोय, शाळा-कॉलेज सगळं जमेल तेवढं पिंजून काढतोय. पण तरी आम्ही अपुरेच पडतोय याची खंत खोलवर जाणवत राहतेय. प्रेम पोचवायला, प्रेम व लग्न या आयुष्यातील अतिशय महत्त्वाच्या व नाजूक भावना असणाऱ्या नात्यांबद्दल आधी पुरेपूर समजून उमजून घेऊन मग या नात्यांचा आनंद घ्यायला सांगायला, हे रुजवायला आम्ही अजूनही कमी पडतोय. 
प्रत्यक्ष व ऑनलाइन संवाद साधून झाले. प्रत्यक्ष फोनवरून अनेकांशी संवाद साधणे झाले. काही लेख ही लिहून झाले. याद्वारे अनेकांच्या कोंदल्या भावनांना मोकळी वाट करून देऊ शकलो हे मान्य असले तरी ते अति अल्प असल्याची जाणीव आजूबाजूला घडणाऱ्या अनेक घटनांतून सतत होत राहतेय.
आता वाटतंय- प्रत्यक्ष व ऑनलाइन संवादाबरोबरच मैत्री, प्रेम, लग्न, नाती व भावना या विषयांवर जमेल तसं,जमेल तितकं जास्तीतजास्त लिखाण करून हा विषय पोचवायला हवा.

माझ्या शक्यतेप्रमाणे हे करण्याचा मी आता पुरेपूर प्रयत्न करणारच आहे. जर एखाद्या चांगल्या सार्वजनिक माध्यमाची साथ मिळाली तर या विषयाला अधिक जास्त लोकांपर्यंत पोचवता येईल असं वाटतंय.

बघुया. प्रयत्न करत राहुयात.
*प्रेम करूयातच; पण त्याआधी प्रेम समजून घेऊयात व समजून सांगायचा प्रयत्नही करूयात.*

- सचिन (8424041159)
इमेल: srthite@yahoo.co.in

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध