पर्व 3 - 'सेक्स'वर बोलू काही'- भाग 1- प्रस्तावना व आवाहन

त्यांचं दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. कुटुंबीयांचा विरोध पत्करून त्यांनी लग्न केलं. लग्नानंतर महिन्याभरातच लक्षात आलं कि तो लैंगिक संबंध करण्यास असमर्थ आहे. ती बेडवर सोबत झोपली तरी त्याला घाम फुटतो. आज लग्नाला पंधरा वर्षे झाली. एकदाही सेक्सचा अनुभव घेता न आलेली 'ती' प्रचंड अस्वस्थ आहे.

त्या दोघांचे लग्न झाले. लग्नानंतर थोड्याच दिवसांत तिला सेक्स मध्ये अजिबात इंटरेस्ट नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. 'हे करायलाच हवं का?' असा तिचा प्रश्न. तीन-चार वर्षे वाट पाहून शेवटी घटस्फोटाचा निर्णय घ्यावा लागला.

त्यांच्या लग्नानंतर महिनाभरातच त्याच्या लक्षात आले कि हिच्या सेक्स च्या डिमांड खूपच आहेत आणि आपण त्या पूर्ण नाही करू शकत. तिच्या मते हा सेक्स करण्यात खूपच कमी पडतो, नावाला सेक्स करायचा म्हणून करतो. शेवटी वर्षभरातच घटस्फोट झाला.

त्याच्या मते सेक्स फक्त मुलं होण्यासाठीच करायचा असतो. 'आत्ताच मुलं होऊ द्यायची नाहीत' असं ठरवलंय म्हणल्यावर सेक्स करायची गरज काय? तिच्या हट्टाखातर अखेरीस एकदा चिडून सेक्स करतो, काहीही निरोधके वापरत नाहीत, कोणतीही काळजी घेत नाहीत आणि गर्भ राहतो. 'आता गर्भ राहिलाय ना. मग आता सेक्सची काय गरज?' असा परत त्याचा प्रश्न. वर्षभरात घटस्पोट होतो.

तिच्या मते तो सेक्स करण्यात कमी पडतोय. त्याच्या मते त्यांच्या सेक्समधून एकदा तिला चुकून गर्भ सुद्धा राहिला होता. मग मी कमी पडतोय असं कसं असेल? वर्षाच्या आतच घटस्फोट.

या फक्त उदाहरणादाखल दिलेल्या काही केसेस आहेत. अशा असंख्य केसेस आपल्या आजूबाजूला आहेत. यातल्या किंवा अशा प्रकारच्या केसेस अनेकांना आपल्या भवताली दिसतील, कुणाला आपली स्वतःचीच स्टोरी असल्यासारखे जाणवेल.

सेक्स या विषयावर विचारच न करता लग्न करून बसलेले हे अनेकजण. कुणी प्रेम विवाह तर कुणी पसंतीविवाह केलेले. लैंगिक  अतृप्तीची उदाहरणे दोन्हीही विवाह पद्धतीत सारखीच. याचे कारण सुद्धा सारखेच- 'लैंगिक संबंध' या विषयावर बोलण्याची गरजच न वाटणे. 
हे काय बोलायचं असतं का? लग्न झालं कि होतं सगळं आपोआप. आमची नाही झाली का लग्न? आम्हाला काय कोण सांगायला आलं होतं का? आमच्यावेळी तर एकमेकांची तोंडं बघायची सुद्धा सोय नव्हती. तरी झालीच ना आम्हाला पोऱ्ह? असं सांगणारे महानुभवी नातेवाईक आणि अशा गोष्टी कशा बोलायच्या आधीच? या संभ्रमात असणारी लग्नाळू मुलं-मुली. यामुळेच हा विषय दुर्लक्षितच राहतो आणि मग लग्नानंतर जेव्हा हे कळतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो.

यामध्ये कधी दोघांपैकी कुणात तरी लैंगिक संबंधांच्या बाबतीत कमतरता असते, तर कधी भिती, टॅबू व गैरसमज जास्त असतात. कधी दोघांच्या सेक्स संदर्भातील इच्छा कमी जास्त प्रमाणात असतात. कधी कुणाला वेळ हवा असतो. तर कधी कुणाला 'वेगळं' काहीतरी हवं असतं. कधी दोघांच्या सेक्स संदर्भातील कल्पनांमध्ये फरक असतो. अशा अनेक व्हरायटी यामध्ये असतात. यातले फक्त दोघांची लैंगिकताच एकमेकांपेक्षा वेगळे असल्याचे लग्नानंतर जाणवल्याची उदाहरणे सोडली तर इतर जवळपास सर्वच उदाहरणात अनेक उपाय आपल्या हातात असतात कि ज्याने आपण एकमेकांना लैंगिक सुख मिळवून देऊ शकतो व एकमेकांसोबत पुढे छान आयुष्य जगू शकतो. पण खूपच कमी वेळा म्हणजे अगदी अपवादात्मकच कुणी आपल्याला असे उपाय वापरून एकमेकांना लैंगिक सुख देताना दिसतात.
याचं महत्वाचं कारण म्हणजे- लैंगिक संबंधांविषयी स्पष्ट न बोलणे. आधी आईवडिलांनी मुलांशी याविषयी बोलायला हवं होतं ते बोललं गेलं नाही. पुढे शाळा-कॉलेजमध्ये शिक्षकांकडून अधिकृत माहिती मिळायला हवी होती, ती मिळाली नाही. मित्र-मैत्रिणींनी चावट गप्पा, नॉनव्हेज जोक्स व इतरांचे रंगवून सांगितलेले किस्से सोडून कधी गांभिर्याने याविषयी अभ्यासपूर्वक चर्चा करायला हवी होती, ती केली नाही. लग्न ठरवताना किंवा प्रेमात असताना किमान आपण दोघांनी तरी सेक्स या विषयावर अभ्यासपूर्वक बोलायला हवं होतं तेही बोललो नाही आणि शेवटी लग्नानंतर तरी एकमेकांशी या विषयावर व्यवस्थित बोलत राहायला पाहिजे होतं तेही केलं नाही. या कोणत्याच टप्प्यावर लैंगिक संबंध/सेक्स वर स्पष्ट बोललंच गेलं नाही. या बोललंच न गेल्याने वाढत गेलेल्या किंवा वाढत जाणाऱ्या समस्यांवर किमान आता तरी बोलायला लागूयात, यासाठीच ही लैंगिक संबंधांविषयी लेखमाला लिहीत आहे. लेखमालेच्या *'सेक्स'वर बोलू काही'* या तिसऱ्या पर्वाला सुरुवात करताना 'किमान आता तरी आपण सेक्स विषयी बोलायला लागूयात' असं आवाहन सर्वांना करत आहे.

- सचिन (8424041159)

(आपल्या प्रतिक्रिया किंवा काही शेअरिंग करायचे असेल तर वरील व्हाट्सअप्प नंबर वर किंवा srthite@yahoo.co.in या ईमेल वर करू शकता.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध