मुक्त लैंगिकतेच्या दिशेने (पर्व 2- भाग 13) संदर्भ पुस्तक: पाळी मिळी गुपचिळी

गर्भनिरोधके हे स्त्रियांना अनैच्छिक असणाऱ्या गर्भारपणापासून वाचवणारे वरदानच ठरत आहेत. या गर्भनिरोधकांचे वेगवेगळे प्रकार व ते वापरायच्या पद्धती आपण मागच्या काही लेखांत थोडक्यात पाहिल्या. याविषयी अधिक सविस्तर माहिती मिळवण्यासाठी डॉ. विठ्ठल प्रभू यांचे 'निरामय कामजीवन' व डॉ. शंतनू अभ्यंकर यांचे 'पाळी मिळी गुपचिळी' हे पुस्तक नक्की वाचायला हवे. 'निरामय कामजीवन' विषयी आपण याआधी एका सविस्तर पोस्टमध्ये वाचलेच आहे. 'पाळी मिळी..' वाचण्याचे सुद्धा अनेक फायदे, कारणे व गरज आहे. या पुस्तकात स्त्रियांच्या मासिक पाळी संदर्भातील समस्यांवर तर बोललं गेलंच आहे; पण त्याच सोबत प्रेग्नंसी, गर्भनिरोधके, गर्भपात, डिलिव्हरी, सिझरिंग, गरोदरपणातील अंधश्रद्धा, सव्यंग अपत्ये जन्माला येणे यांसारख्या इतर अनेक महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर व डॉक्टरांच्या नेहमीच्या सोप्या आणि खुमासदार भाषाशैली मध्ये लिहिलेले आहे.
पाळीविषयी असणाऱ्या अंधश्रद्धांपासून सुरू झालेलं हे पुस्तक अगदी स्त्रीची पाळी जाईपर्यंतच्या म्हणजे मेनोपॉज पर्यंतच्या स्त्री-आरोग्याबाबत आपल्याला माहिती देऊन जाते. मग यामध्ये सुरुवातीच्या कोवळ्या वयातील प्रेमाच्या भावना (डॉक्टरांच्या भाषेत 'पपी लव्ह') असतील किंवा अनेक मुली व स्त्रियांच्या बाबत असणारे पीसीओडी सारखे आजार असतील, त्याचबरोबर गरोदरपणातील अंधश्रद्धा, गैरसमजुती, अनेक शंका-कुशंका यांच्यावर माहिती देत देत स्त्रियांचे कामजीवन, प्रेग्नंसी मधील सेक्स, सेक्स करताना वापरायची गर्भनिरोधके व ते फेल गेले तर करायचे उपाय इथपासून तर नॉर्मल डिलिव्हरी, सिझरिंग, गर्भपात या सगळ्या विषयांवरही डॉक्टरांनी खूप छान माहिती दिली आहे. शिवाय फक्त स्त्रियांच्याच आरोग्याबाबत बोलून हे पुस्तक थांबत नाही तर पुरुषांच्या आरोग्यातील काही गोष्टींवरही यात प्रकाश टाकलेला आहे. पुरूषांची नसबंदी, पुरुषांना येणारे वंध्यत्व याविषयी सुद्धा माहिती दिली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहांच्या बिकट अवस्थेमुळे स्त्रियांची होणारी कुचंबना सुद्धा 'राईट टू पी' मधून डॉक्टर मांडतात. लघवीचे वारंवार होणारे इन्फेक्शन व लघवीवर नियंत्रण मिळवण्यासाठीचे खास व्यायाम, तसेच स्त्रियांच्या ओटीपोटातील दुखणं, गर्भपिशवीचे आजार अशा अनेक विषयांच्या संदर्भाने अतिशय खुमासदार पद्धतीने मांडणी केलेली आहे. 'डोंबलाचे गर्भसंस्कार' मधून गर्भसंस्कार वर्ग चालवणाऱ्यांचे दुकान बंद करणारे लिखाणही यात आहे आणि त्याचवेळी पुरुष नसबंदी विषयी माहिती देण्यासाठी चक्क कीर्तन रूपातून सादर केलेली माहिती आपल्याला थक्क केल्याशिवाय राहात नाही.

त्यामुळेच गर्भनिरोधकांविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तर हे पुस्तक वाचायला हवेच; पण मासिक पाळी, गरोदरपण, बाळांचा जन्म, मृत्यू व व्यंग, गर्भपात व स्त्री आरोग्याशी संबंधित इतर गोष्टी आणि असं बरंच काही महत्वाचं जाणून घेण्यासाठी सुद्धा हे पुस्तक नक्की वाचायलाच हवे.

डॉक्टरांच्या लिखाणाच्या शैली मुळे हे सर्व लेख शास्त्रीय, वैद्यकीय माहिती देणारे असले तरी ते वाचायला किंवा समजायला अजिबात जड वाटत नाहीत. अगदी आपण गप्पा मारतो अशा पद्धतीने या पुस्तकाचे लिखाण असल्याने वाचताना उत्साह पण राहतो आणि विशेष महत्वाचं म्हणजे जे वाचतोय ते सगळं समजतं सुद्धा.

हे पुस्तक आपल्या घरात नेहमी असावे व घरातील स्त्री-पुरुष दोघांनीही वाचायला हवे असे आहे. आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना भेट म्हणून देण्यासाठी सुद्धा हे पुस्तक खूप छान आहे. नवीन लग्न झालेल्या किंवा कुणासोबत लैंगिक संबंधात असणाऱ्या किंवा बाळाचा प्लॅन करत असणाऱ्या किंवा आत्ता गरोदर असणाऱ्या किंवा आता मुलं होऊन कुटुंबनियोजनाचा विचार करत असणाऱ्या अशा सर्वांसाठी हे पुस्तक महत्वाचे आहे.

हे पुस्तक ऑनलाइन सुद्धा उपलब्ध आहे.
या पुस्तकासाठी लिंक:- https://www.amazon.in/dp/B07FVP1JG2/ref=cm_sw_r_apa_i_B1BH22V00G65ZCASME2P
डॉ. शंतनू अभ्यंकर नावाने युट्युब चॅनेल व ब्लॉग सुद्धा आहे. त्यावरही या सर्व व लैंगिकतेविषयक इतर अनेक मुद्द्यांवर अभ्यासपूर्ण माहिती दिलेली आहे. तिथे सुद्धा नक्कीच भेट द्यायला हवी.

- सचिन (8424041159)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध