शेअरिंग-केअरिंग- 26- मुक्त लैंगिकतेच्या दिशेने (पर्व 2 - भाग 11) गर्भनिरोधके- कधी, कोणती? योग्य-अयोग्य?- 4
गर्भनिरोधकांमध्ये पुढचा पर्याय येतो तो म्हणजे 'कॉपर टी'. हे संततिनियमन किंवा कुटुंबनियोजनासाठी उत्तम गर्भनिरोधक आहे. प्रामुख्याने दोन संतती मधील अंतर वाढवण्यासाठी म्हणजेच 'गॅप घेण्या'साठीच कॉपर टी चा वापर केला जातो. स्त्रियांच्या योनीमार्गातून एक टी आकाराची छोटी प्लॅस्टिक (जिच्या दांडीला तांबे गुंडाळलेले असल्याने तिला तांबी असेही म्हणतात) आत सरकवली जाते. दांडीला गुंडाळलेल्या तांब्याच्या तारेमुळे पुरुषाच्या वीर्यातून येणारे शुक्राणू कमजोर होतात व स्त्रीबीजाचे फलन होत नाही. ही कॉपर टी बसवण्यासाठी ऑपरेशन वगैरे करायची गरज नसते. अगदी पाच-दहा मिनिटांत विना टाके, विना भूल ही कॉपर टी योनीमार्गातून गर्भाशयामध्ये सरकवली जाते व तिला जोडलेला एक धागा गर्भपिशवीच्या बाहेर योनीमार्गात सोडला जातो. जेणेकरून पुढे जेव्हा कधी कॉपर टी काढायची वेळ येईल, तेव्हा त्या धाग्याला पकडून ती काढता येऊ शकते. त्या धाग्याचा स्त्रीला काहीही त्रास होत नाही किंवा लैंगिक संबंध करतानाही त्याची अडचण जाणवत नाही. कॉपर टी बसवल्यावर सुरुवातीला काही दिवस त्या स्त्रीच्या पोटात दुखू शकतं व पाळीच्या वेळी जास्त रक्तस्त्राव होऊ शकतो. काही काळाने हे कमी होते. तोपर्यंत रक्तस्त्राव थांबवण्यासाठी व पोटदुखीसाठी डॉक्टरांना भेटून औषधे घ्यावी लागतात. पुढे ठराविक काळाने (एक महिना, तीन महिने, एक वर्ष) डॉक्टरांना भेटावे लागते. एकदा बसवलेली कॉपर टी तीन वर्षांपर्यंत पण काम करू शकते. कॉपर टी मध्ये काही नवीन प्रकार पण आलेले आहेत, त्याविषयी डॉक्टरांशी आधी चर्चा करून मगच सोयीस्कर प्रकार निवडावा.
कॉपर टी चा यशाचा रेट 99% आहे. शिवाय संबंधांच्या वेळी मध्येच कुणाला 'टाईम प्लिज..' म्हणावं लागत नाही किंवा काही स्ट्रेस घ्यायचीही गरज नसते. मनसोक्त आनंद घेता येतो. त्यामुळे हा अगदी कंडोमपेक्षाही जास्त खात्रीचा व आनंदाचा गर्भनिरोधाचा मार्ग असू शकतो (कंडोममुळे संसर्ग व लैंगिक आजारांपासून होणारे संरक्षण मात्र इथे नसते). असे असले तरी याच्या अनेक मर्यादा सुद्धा आहेत. म्हणजे कॉपर टी चा पर्याय डॉक्टर नेहमी पहिले बाळ झाल्यानंतरच सुचवतात; कारण कॉपर टी बसवताना योनीमार्ग व गर्भाशयाचे तोंड दोन्हीही थोडे रुंद असण्याची गरज असते. पहिल्या गर्भारपणात ते बऱ्यापैकी रूंद झालेले असतात आणि म्हणून कॉपर टी सहज बसवता येऊ शकते. पण गर्भारपणाच्या आधीच हा मार्ग वापरण्याची सोय नाही. शिवाय या प्रकारात अनेकदा स्त्रियांना जास्त संकोच सुद्धा वाटतो.
'फक्त पहिली डिलिव्हरी झालेल्याच स्त्रिया' अशा अटी-शर्ती वर आधारलेला हा उपाय म्हणूनच अगदी कमीच स्त्रियांच्या उपयोगाचा ठरतो. दोन बाळांमध्ये अंतर ठेवू इच्छिणाऱ्यानी मात्र या पर्यायाचा विचार करायला हरकत नाही. अर्थात त्यातही ज्यांना कंडोम वापरायचा नाहीये किंवा तो कमी भरवशाचा असल्याने भिती वाटते किंवा नवरोबा कंडोम साठी तयारच नाहीये अशा प्रकारची कोणतीही कारणे व गर्भनिरोधक गोळ्या रोजच्या रोज घ्यायचे लक्षातच राहणार नाही अशी स्वतःविषयीच ठाम खात्री आहे, त्यांनी प्रामुख्याने या मार्गाचा विचार करायला हवा.
मुक्त लैंगिकतेचा विचार करणाऱ्यांसाठी हा मार्ग कायमस्वरूपी फारसा सोयीचा नाही. स्त्रीला पहिले मूल झालेले असेल तरच कॉपर टी बसवून मर्यादित कालावधीत मुक्त लैंगिकतेचा अनुभव घेता येऊ शकतो. अर्थात एका कॉपर टी ची कालावधी संपली तरी ती बदलून दुसरी कॉपर टी पुन्हा लगेच बसवता येते व असं आयुष्यभर (म्हणजे जोपर्यंत गर्भधारणा होण्याची शक्यता आहे तोपर्यंत) करता येऊ शकते. असे केल्यास मग शेवटपर्यंत मुक्त लैंगिक संबंध ठेवता येणे शक्य आहे.
मात्र पहिले मूल झालेले नसताना - मग त्या स्त्रिया विवाहित असोत वा अविवाहित, त्यांचे लैंगिक संबंध आलेले असोत वा नाहीत - हा पर्याय वापरता येत नाही.
कॉपर टी व कंडोम यांच्या पेक्षा जास्त सोयीचा व जास्त खात्रीशीर आणि सक्सेस रेट जास्त असणारा असा अजून काही पर्याय आहे का?
यावर आपण पुढच्या लेखात सविस्तर बोलूच.
- सचिन (8424041159)
इमेल: srthite@yahoo.co.in
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा