मुक्त लैंगिकतेच्या दिशेने (पर्व 2- भाग 12) गर्भनिरोधके- कधी, कोणती? योग्य-अयोग्य?- 5

गर्भनिरोधक गोळ्या म्हणजेच ओरल कॉन्ट्रा सेप्टिव्ह पिल्स. गर्भनिरोधकांच्या जगतात आत्तापर्यंतचा सर्वांत खात्रीलायक उपाय. शिवाय अगदी कुणालाही वापरता येणारा. तुमचे लग्न झालेले असो किंवा नसो, बाळ झालेले असो किंवा नसो. अर्थातच या गोळ्या सुद्धा स्त्रियांनाच घ्याव्या लागतात. रोज एक याप्रमाणे महिनाभर म्हणजेच रोजच्या रोज न चुकता या गोळ्या घेतल्या तर गर्भधारणा न होण्याची शंभर टक्के खात्री देणारा हा मार्ग आहे. यामध्ये महिन्याच्या एकवीस दिवस गोळ्या घ्यायच्या आणि सात दिवस गोळ्यांना सुट्टी द्यायची असाही मार्ग असतो. पण अशा धरसोडीच्या मार्गात गोळ्या विसरण्याची शक्यता आणखी जास्त. त्यामुळे अठ्ठावीस दिवस सलग रोज गोळी घ्यायची सवय लावून घेणे कधीही चांगले. यामध्ये एकवीस गोळ्या या औषधी व उरलेल्या सात गोळ्या टॉनिकच्याच असतात; पण त्यामुळे सातत्य राहते व विसरण्याची शक्यता कमी होते. त्यातही अनेक सोयी आहेत म्हणा. म्हणजे समजा एखादा दिवस चुकून विसरलीच गोळी, तर दुसऱ्या दिवशी जेव्हा लक्षात येईल तेव्हा लगेच ती घ्यायची व पुढची गोळी तिच्या रेग्युलर वेळेवरच घ्यायची. पुढची गोळी घेतानाच कालची गोळी विसरली होती हे लक्षात आले तर दोन्ही गोळ्या एकाच वेळी घ्यायच्या. शिवाय त्या गोळ्यांच्या पाकिटावर इंग्रजी मध्ये दिलेल्या वारांवर सुद्धा लक्ष ठेवायचे. म्हणजे समजा सोमवारी गोळी सुरू केली, तर त्याच क्रमाने त्या त्या वाराचीच गोळी ओळीने घेत जायचे. म्हणजे 'मी काल गोळी घेतली होती कि नाही?' असे जर वाटले तर लगेच तो वार तपासता येतो. आहे कि नाही सोपं?दोनपेक्षा जास्त गोळ्या विसरल्या तर मात्र लगेच डॉक्टरांना संपर्क करायचा. आणि या गोळ्या जरी स्त्रियांना घ्याव्या लागत असल्या तरी तिच्या पुरुष जोडीदारानेही जबाबदारीने तिला या गोळ्यांची आठवण करून द्यायला हवी. डॉ. शंतनू अभ्यंकर गंमतीने म्हणतात- 'बायकोला गोळ्या घालायची जबाबदारी नवऱ्याची'(दोघे विवाहित जोडीदार नसतील तर अर्थात तिच्या जोडीदाराची). त्यातही पुन्हा दोघात स्मरणशक्ती कुणाची जास्त चांगली? त्यावरही हे अवलंबून आहे म्हणा. नाहीतर स्वतःच्याच गोष्टी लक्षात राहायची ज्यांची बोंब आहे त्यांना दुसऱ्यांचे काय लक्षात राहणार? आणि त्यांच्याबद्दल तक्रार तरी कशी करणार? मात्र दोघांचाही जर विसरायचा प्रॉब्लेम असेल तर सरळ रात्री झोपेच्या वेळेवर अलार्म लावून ठेवायचा. म्हणजे काम आणखी सोपं. दोघांनीही लावून ठेवला तर आणखीच सोपं. बाहेर कुठे जरी गेलेले असले तरी गोळीचे पाकीट सोबतच ठेवायचे. विसरलेच तर जवळच्या कुठल्याही मेडिकल मधून लगेच घ्यायचे. पण गोळी काहीही झालं तरी टाळायची नाही. कारण गोळीचा इफेक्ट हा एकत्रित फॉर्म्युल्यावर आधारित असतो. म्हणजे महिनाभर सलग गोळ्या घेतल्याचा एकत्रित परिणाम म्हणून गर्भ राहत नाही. 'आज सेक्स ला सुट्टी आहे म्हणून गोळ्यांना पण सुट्टी देऊयात' असा प्रकार इथं चालत नाही. शिवाय पहिल्यांदा गोळ्या घेताना एक लक्षात ठेवावं लागतं कि- आजपासून सुरू केलेल्या गोळ्यांचा परिणाम हा महिन्याभरानंतर सुरू होणार असतो. म्हणजे पहिल्या महिनाभरात त्यांचा इफेक्ट नसतो. त्यामुळे तेवढा काळ कंडोम किंवा इतर पर्याय वापरूनच सेक्स करावा. नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी हे जास्त महत्वाचं आहे. महिन्याभरानंतर मात्र बिनधास्त कोणताही 'टाईमप्लिज' न घेता कामाला लागू शकता. 
या गोळ्यांचे काही साईड इफेक्टस सुद्धा आहेत व अनेक गैरसमज सुद्धा आहेत. अर्थातच गैरसमज हे साईड इफेक्टपेक्षा जास्त पटींनी पसरणारे असल्याने त्यांचेच प्रमाण जास्त आहे. आपण शरीरात घातलेल्या कोणत्याही केमिकलचा (औषधांचा) शरीरावर काही न काही इफेक्ट होतच असतो. तो इफेक्ट काय आणि कितपत आहे ते पाहणं महत्वाचं असतं. या गोळ्यांमुळे काही स्त्रियांचे वजन वाढू शकते, कुणाचे स्तन दुखू शकतात, कुणाचे डोके दुखू शकते, कधी कुणाचे मूड्स बदलू शकतात किंवा कुणाला यातलं काहीच होऊ शकत नाही. पण अर्थातच आता नव्याने आलेल्या लो डोस पिल्स मुळे यातले अनेक इफेक्टस कमी झालेत. उलट याचे अनेक चांगले साईड इफेक्टस जाणवायला लागलेत. जसे कि अनेकींना या गोळ्यांमुळे पाळीच्या वेळी त्रास कमी होतो, रक्तस्त्राव कमी होतो, ओटीपोटात दुखणं कमी होतं. गर्भाशयाच्या अस्तराच्या कॅन्सर ची शक्यता कमी होते, काहींना पीसीओडी च्या त्रासाचे प्रमाण कमी होते. पण याविषयी पसरवला जाणारा सर्वात मोठा गैरसमज म्हणजे या गोळ्या घेतल्या तर पुढे गर्भधारणा होत नाही किंवा झाली तर गर्भाला त्रास होतो. हे साफ चूक आहे. गोळ्या घ्यायचे बंद केले कि लगेच काही दिवसांत पाळी येते व गर्भधारणा सुद्धा होऊ शकते व गर्भावर याचा काहीही परिणाम होत नाही. अगदी प्रेग्नंट असताना या गोळ्या घेतल्या तरीही गर्भावर त्याचा काहीही परिणाम होत नाही. शिवाय गोळी घेतल्यावर होणाऱ्या काही किरकोळ साईड इफेक्टचा विचार करताना गोळी न घेतल्याने राहिलेल्या अनपेक्षित गर्भधारणेचा त्रास किती पटींनी जास्त असू शकतो? याचाही विचार करायला हवा.
गर्भनिरोधक म्हणून गोळ्यांचा पर्याय सर्वोत्तम असला तरी लैंगिक संबंधांतून होणाऱ्या लैंगिक आजारांपासून या गोळ्या संरक्षण देत नाहीत. त्यामुळे एकापेक्षा जास्त जोडीदारासोबत संबंध ठेवताना पुरुषाने कंडोमचा सुद्धा वापर करणे जास्त योग्य. खात्रीचे जोडीदार व लैंगिक अवयवांची स्वच्छता असेल तरच कंडोम शिवाय लैंगिक संबंध ठेवावेत. सध्या गर्भधारणा नको असणाऱ्या स्त्रियांनी किंवा 'हवंय कि नकोय' यावर अजून दोघांचे एकमत झालेले नसेल अशा वेळी स्त्रियांनी नियमित या गोळ्यांचा वापर करणे जास्त योग्य.

- सचिन (8424041159)
ईमेल: srthite@yahoo.co.in

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध