शेअरिंग केअरिंग - भाग 40 (पालकत्व - 2 - मुलांच्या चुका)
मुलांनी केलेल्या चुकांकडे आपण कसे पाहतो? यावेळी आपण काय करतो?
मला माझ्या लहानपणीचा एक प्रसंग आठवतो. आमच्या शेजारी राहणारे आमचे एक जवळचे स्नेही आमच्याकडे सहज गप्पा मारण्यासाठी आलेले होते. सोबत त्यांचा साधारण बारा तेरा वर्षांचा छोटा मुलगा पण होता. आम्ही सगळे घराच्या बाहेरच ओट्यावर गप्पा मारत बसलेलो होतो. अचानक त्यांना आठवले की त्यांना दुकानातून साखर आणायची होती. त्यांनी आपल्या मुलाच्या हातात पैसे दिले आणि बाजूलाच असणाऱ्या दुकानातून त्याला साखर आणायला सांगितली. मुलगा पळत गेला आणि साखर घेऊन लगेच पळत येऊ लागला. पण पळताना त्याच्या हातातून साखरेची पिशवी निसटून खाली पडली आणि पिशवी फुटल्यामुळे सगळी साखर मातीत गेली. हा प्रसंग अगदी आमच्या पुढे डोळ्यासमोर घडला. हे पाहून त्याच्यासोबत आम्ही मुलं सुद्धा घाबरलो होतो. कारण आमच्या स्वानुभवानुसार या चुकीसाठी आता त्याला किमान काही फटके तर खावेच लागतील हे आम्हाला माहिती होतं. तो मुलगा खाली मान घालून त्या साखरेकडे बघत उभा होता. आम्ही त्याच्या वडिलांकडे बघत होतो. ते आता किती आणि कसे रागावतील याचाच विचार आम्ही करत होतो. पण त्यांचा चेहरा मात्र अगदी शांत होता. त्यांनी शांतपणे आपल्या मुलाला जवळ बोलावले. मुलगा घाबरतच जवळ आला. आता फटका बसणार असं आम्हाला वाटत असतानाच त्यांनी मात्र खिशातून अजून पैसे काढले आणि मुलाच्या हातात देत म्हणाले, "जा परत आणि परत घेऊन ये साखर. यावेळी जपून आण." आम्ही सगळे हे पाहून अवाक झालो. माझ्या आई- वडिलांनी त्यांना विचारले, "अहो परत कशाला पाठवता त्याला? त्याने परत पाडली मग?" त्यावर ते म्हणाले, "तर मग परत पाठवू आणायला. यातूनच तर तो शिकेल. आणि मला माहितीय की यावेळी तो नाही पाडणार." आम्हाला त्या दिवशी ते एकदम हिरोच वाटले आणि हा प्रसंग आयुष्यभरासाठी माझ्या मनावर कोरला गेला.
प्रत्येक वेळी आपल्या मुलांकडून होणाऱ्या चुकांबद्दल त्यांना शिक्षा देणे गरजेचे आणि योग्य नसते; तर त्या चुकीची त्यांना जाणीव होणे, त्या चुकांतून त्यांनी काही शिकणे आणि पुन्हा तशी चूक होऊ न देणे हे जास्त महत्त्वाचे असते. शिवाय अशा वेळी मुलांच्या मनात आपल्या पालकांविषयी अधिक आदर, प्रेम आणि विश्वासाची भावना तयार होत असते.
अनेकदा मुलांकडून चूक झाली की सर्वांत पहिले त्यांना त्याची काहीतरी शिक्षा मिळायलाच हवी असा अनेक पालकांचा आग्रह असतो. ही शिक्षाच त्यांना पुन्हा अशी चूक करण्यापासून थांबवते आणि त्या चुकीचे गांभीर्य सुद्धा त्यांना त्यामुळे कळते, असे यामागे कारण सांगितले जाते. पण हा ॲप्रोच मुलांच्या आपल्या चुकांतून शिकण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेलाच बऱ्याचदा बाधा आणतो. मुलांकडून झालेली एखादी चूक त्यांना जवळ घेऊन प्रेमाने समजावून सांगून शक्य असेल तर पुन्हा ती गोष्ट करण्याची संधी देऊन ती यावेळी अधिक चांगली कशी करता येईल यासाठीची माहिती व मदत त्यांना केली, तर यातून मुलं ती गोष्ट तर चांगली करतातच; पण यामुळे मुलांचा पुढील आयुष्यात त्यांच्याकडून होणाऱ्या चुकांकडे पाहण्याचा किंवा चुकांबद्दल विचार करण्याचा सुद्धा ॲप्रोच सुधारतो. 'चूक होईल' या विचाराने घाबरून थांबायचं नसतं आणि हाती येणारी संधी सोडायची नसते; उलट चुका झाल्याच तर त्यांतून शिकत, त्या दुरुस्त करत करत पुढे जायचं असतं हा एक सकारात्मक दृष्टीकोन मुलांच्या मनात तयार होत जातो, जो त्यांना आयुष्यात प्रत्येक ठिकाणी खूप कामी येतो.
आपणही आपल्या मुलांसोबत कसे वागतोय? चूक झालीच, तर शिक्षा करतोय की जवळ घेऊन समजावून सांगतोय? आपले मार्गदर्शन आणि मदत देत पुन्हा एकदा संधी देतोय की फटके देत/रागवत/तुम्ही कसे योग्यच नाहीत हे त्यांना सांगून त्यांची पुढची संधीच बंद करतोय? नक्की विचार करूयात.
आपण आपल्या मुलांशी जे आणि जसे वागतोय, त्यातून आपल्या मुलांच्या मनात आपल्याविषयी प्रेम आणि जवळीक अधिक वाढतेय आणि स्वतःकडे व आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन तयार होतोय की याच्या अगदी उलट होतंय? नक्की विचार करूयात. इतर कुणाला नाही, पण किमान स्वतःला तरी याचे प्रामाणिक उत्तर देऊयात. सतत शिक्षेचा बडगा न उगारता प्रेम आणि विश्वासाचा हात पुढे करत आपल्या मुलांचे मित्र व विश्वासू बनुयात.
- सचिन (8424041159)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा