शेअरिंग केअरिंग - 38 (गाठीभेटी - पुणे)

( फेसबुक वर 25 नोव्हेंबर 2024)
मागच्या आठवड्यात तीन दिवस पुण्यात होतो. अनेक गाठीभेटी झाल्या. मंगला सामंत, मिलिंद जोशी, डॉ. कुमार सप्तर्षी, अन्वर राजन आणि युक्रांद मधील मित्र सचिन, अभि आणि आतिक भाई या सर्वांनाच खूप मोठ्या गॅप नंतर पुन्हा भेटणे झाले. अनेक विचारांची, भावनांची आणि आठवणींची उजळणी झाली. खूप फ्रेश वाटलं. रिचार्ज झाल्यासारखं वाटलं. काही आठवणींमध्ये खरंच एक वेगळीच ऊर्जा असते. ती ऊर्जा आम्ही अनुभवली.

मार्च महिन्यात आम्ही काढलेल्या लैंगिकता विषयक अभ्यास दौऱ्यानंतर आज जवळपास आठ नऊ महिन्यांनी मंगला ताईंची भेट झाली. मंगला ताईंसोबतची चर्चा ही नेहमीच आम्हाला विचारांच्या एका पुढच्या टप्प्यावर घेवून जाणारी ठरली आहे. याही वेळी त्यांचे नुकतेच नव्याने प्रकाशित झालेले पुस्तक 'तंतोतंत' मध्ये त्यांनी स्त्री-पुरुष संबंध, लैंगिकता, विवाहसंस्था या सर्व विषयांवर लिहिलेल्या भन्नाट लेखांवर खूप अंगांनी चर्चा झाली. यात 'पुरुषांचे सबलीकरण, व्हिजिटिंग मॅरेज, विवाहित स्त्री पुरुषांची मैत्री, विवाहाचे ना हरकत प्रमाणपत्र' यांसारख्या अनेक लेख आणि त्यातील संकल्पनांवर व एकूणच समाजातील लैंगिकते संदर्भातील सद्यस्थिती आणि लैंगिकता शिक्षण अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. डॉ. शंतनु अभ्यंकर यांची यावेळी खूपदा आठवण निघाली. आमच्या पुढच्या भेटी ठरलेल्या असल्या कारणाने ही कधी संपूच नये असे वाटणारी चर्चा आम्हाला नाईलाजाने थांबवावी लागली, पण खूप काही वैचारिक खत पाणी देणारी ही भेट ठरली.
नंतर मिलिंद जोशी सरांची भेट घेतली. आपल्या माणसाचे आपलेपण अनुभवले. आपल्या अग्गंबाई! अरेच्या!! या पुस्तकाला देखणं कव्हर देवून त्याचे सौंदर्य वाढवणारे मिलिंद सर. त्यावेळी आमच्यात तयार झालेला भावनिक बंध त्यानंतर आज जवळपास दोन वर्षांनी भेटून सुद्धा अगदी तसाच उलट अधिक जवळ नेणारा वाटला. त्यात ते वडूज चे आहेत आणि निशाची आणि त्यांची प्राथमिक शाळा एकच असल्याचे समजल्यावर तर हे नाते अधिकच जवळचे झाले. माझ्यासाठी आधीपासूनच आवर्जून निवडून बाजूला काढून ठेवलेले समाजस्वास्थ्य चे अंक मिलिंद सरांनी मला दिले. हा माझ्यासाठी अतिशय अनमोल ठेवा आहे आणि त्यांनी इतक्या विश्वासाने मला तो दिला याचा एक वेगळाच आनंद आहे. शिवाय झरा आणि राही यांना सुद्धा त्यांनी प्रेमळ भुतांच्या गोष्टींची पुस्तकं भेट दिली. त्याच रात्री या दोघींनी त्यातल्या गोष्टी आमच्याकडून वाचून सुद्धा घेतल्या.

या सगळ्यात सोबत असणारे विनोद, गौरी आणि राही या तिघांशी एक वेगळीच गट्टी जमली. खूप दिवसांनी आपल्या विचारांची नाळ जुळणारे कुणीतरी भेटल्याची तीव्र जाणीव झाली. आणि अशा वेळी एक अंतर्गत ओढ आपल्याला एकमेकांकडे खेचते, तसे आम्ही आमचे इतर महत्वाचे प्लॅन बाजूला ठेवून एकमेकांकडे खेचले गेलो. मग रात्रभर सहजीवन, नातं, मानसिक स्वास्थ्य, अल्बर्ट एलिस आणि त्याची REBT यांसारख्या अनेक मुद्द्यांवर रात्रभर आमची चर्चा रंगली. तेही अपुरे की काय, असे वाटून सकाळी उठल्यापासून पुन्हा गप्पा सुरू. ही रात्र आणि हा दिवस कधी संपूच नये असे आम्हाला वाटत होते. कित्येक विषयांवर कित्येक तास बोलून सुद्धा अजून खूप बोलावेसे वाटत होते. आमच्यासाठी कित्येक दिवसांनंतर वैचारिक भरणपोषण करणारा तो दिवस आणि ती रात्र होती. तरीही अनेक मुद्द्यांवर अजून खूप बोलायचं राहून गेलंय. पुन्हा आवर्जून ठरवून लवकर एकमेकांना भेटावं आणि राहिलेला गप्पांचा कोटा पूर्ण करावा असं वाटतंय. झरा आणि राही यांनी सुद्धा यादरम्यान ड्रॉइंग, गोष्टी, गप्पा, खेळ, खेळणी असं बरंच काय काय एन्जॉय केलं.

त्यानंतर युवक क्रांती दलातील जुने साथी अतिकभाई, अभिजित, सचिन यांना भेटून अनेक जुन्या आठवणी जाग्या झाल्या. अभि ने मला गांधी भवन फिरवून तिथे केलेल्या अनेक लेटेस्ट घडामोडी व बदल सांगितले आणि दाखवले. गांधी भवन मध्ये गांधी म्युझियम सुरू करणार असल्याचे त्याच्याकडून कळले. मग डॉ. कुमार सप्तर्षी यांच्याशी काही काळ संवाद झाला. त्यांच्या अतिशय व्यस्त शेड्युल मधून सुद्धा त्यांनी आमच्याशी गप्पा मारण्यासाठी वेळ काढला. मग युक्रांद, अंनिस, डॉ. दाभोलकर आणि इतर अनेक विषयांवर आमच्या गप्पा झाल्या. त्यांची काही पुस्तकं घेवून आणि सत्याग्रही मासिकाची वर्गणी भरून आम्ही तिथून निघालो.

हा पूर्ण पुणे भेटीगाठींचा दौरा आमच्यासाठी वैचारिक व भावनिक पातळीवर सुद्धा आम्हाला खूप पुढे घेवून जाणारा होता. आयुष्यातील अविस्मरणीय अशा व आयुष्य समृद्ध करणाऱ्या काही अतिशय दुर्मिळ अशा दिवसांतील हा एक दिवस होता असे वाटते. मनातील आठवणींच्या एका कप्प्यात हा दिवस कायमचा जिवंत राहील. 
या दरम्यान झालेल्या अनेक वैचारिक चर्चांचा अमूल्य ठेवा मात्र कसा कुठे जपून ठेवावा हा अतिशय गहन प्रश्न आहे. फोटोंमध्ये साठवून ठेवता येणाऱ्या या भेटींच्या आठवणींसारखेच वैचारिक गप्पांना सुद्धा कुठेतरी असे साठवून ठेवता आले असते तर किती बरे झाले असते ना!!!
- सचिन थिटे (8424041159)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध