शेअरिंग केअरिंग - 37 (आळस)
(फेसबुक वर 6 जुलै 2024)
आपला आळस नेहमीच आपल्याला अधिक चांगला माणूस बनण्यापासून आणि अधिक चांगलं व आरोग्यदायी आयुष्य जगण्यापासून दूर नेत असतो. आपल्या आयुष्यातील अनारोग्याच्या अनेक समस्या, बौद्धिक, वैचारिक, सामाजिक कामातील, अभ्यासातील किंवा करिअर, व्यवसाय, नोकरी यातील, तसेच नात्यांतील अनेक समस्यांच्या मागे फक्त आपला आळस हे एकच कारण अनेकदा असते. या आळसावर नियंत्रण आणण्यात आपण जितके यशस्वी होतो, तितके आपण अधिक चांगले आणि आरोग्यदायी आयुष्य जगण्याकडे वाटचाल करत असतो. विशेष म्हणजे हे काही कुणापासून लपलेले नसते. जितका आळस जास्त, तितक्या आयुष्यातील संधी कमी आणि जितका आळस कमी, तितकी आपल्याला चांगलं, आरोग्यदायी आयुष्य जगण्याची संधी जास्त. हे कटू सत्य अगदी सर्वांनाच चांगलं माहिती असतं, पण तरीही आपण यावर मात करू शकत नाही ही खरी ट्रॅजेडी आहे. आळस छाती ठोकून रोज आपल्याला खुले आव्हान देत असतो आणि आपण रोज त्याच्यासमोर चितपट होत असतो. इतका हा समोरासमोर होणारा आपल्या भविष्याचा सामना आपण उघड्या किंवा बंद डोळ्यांनी रोज हरत असतो किंवा आपल्यालाच हरताना हताशपणे बघत असतो.
तात्पर्य हेच की -
*उठा, आपल्या आळसावर मात करा आणि व्यायाम, वाचन, चांगले सकारात्मक कृती कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रम यात कृतिशील व्हा, आपल्या जिवलागांशी संवाद वाढवा, आपण निश्चित केलेले आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नशील व्हा आणि आपले आयुष्य चांगले व आरोग्यदायी जगा.*
- सचिन थिटे (8424041159)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा