पर्व 4 - सेक्स वर बोलू काही - भाग 13 (लैंगिक स्वास्थ्य - 3)
अनेक दिवसांपासून (किंवा वर्षांपासून) लैंगिक अस्वस्थतेत जगणारी ती..
(व्हिडिओ लिंक कमेंट मध्ये)
हा एक व्हिडिओ खूप काही सांगून जातो.
अशा कित्येक स्त्रिया आहेत की ज्या अशा पद्धतीने आपल्या लैंगिक इच्छा पूर्ण न होण्याने अस्वस्थ आहेत. पण त्या हे स्पष्ट बोलू सुद्धा शकत नाहीत. काहींनी हलकं बोलायचा प्रयत्न किंवा हिंमत केली तरी त्याबदल्यात त्यांना पुढे जो काही शारीरिक, मानसिक त्रास सहन करावा लागतो, त्यानंतर पुढे याबद्दल चकार शब्दही काढण्याची त्यांची हिंमत होत नाही. काहींच्या घरी किमान हे बोलण्याइतपत परिस्थिती असते, पण बोलूनही ते गांभिर्याने घेतले जात नाही. काहींना असं बोलण्यामुळे हिंसक प्रतिक्रियांना सुद्धा सामोरे जावे लागते. शिवाय अनेकींना यामुळे पुढे कुटुंब आणि समाजात आपली बदनामी होईल याची सुद्धा भीती असते. या सगळ्यामुळे मनातील ही अस्वस्थता बोलून न दाखवण्याकडेच सर्वांचा कल असतो. पण बोललं नाही म्हणून ही अस्वस्थता संपते असं होत नाही. उलट ती आतल्या आत खूप वाढत राहते. त्याचे परिणाम त्या स्त्रीच्या वागण्या बोलण्यावर सुद्धा होतात. सतत अशा अस्वस्थतेत जगणाऱ्या स्त्रिया एका खूप मोठ्या मानसिक तणावात जगत असतात, ज्याबद्दल कुणाशी मोकळेपणाने बोलताही येत नाही. अशा वेळी आपल्या जोडीदाराबद्दलचे प्रेम किंवा ओढ सुद्धा हळूहळू कमी होत जाते आणि त्याऐवजी सुरुवातीला त्याच्याबद्दल सहानुभूती किंवा कीव वाटण्यापासून पुढे चीड येणे दुर्लक्ष करणे, राग, संताप येण्यापासून तर तिरस्कार, द्वेष वाटण्यापर्यंत ही परिस्थिती जावू शकते. अर्थात सर्वांच्याच बाबतीत असं होईलच असं नाही. काही स्त्रिया आपल्या नशिबाला दोष देत हे मान्य करून स्वतःला समजावत आपल्या लैंगिक इच्छांकडे दुर्लक्ष करत जगतात. काही यासाठी देवा-धर्माची, कर्मकांडाची मदत घेतात; तर काही इतर काही कामं, छंद किंवा ग्रुप मध्ये स्वतःला अडकवून ठेवतात. पण ज्यांना हे शक्य होत नाही त्यांची अस्वस्थता मात्र वाढतच राहते. यात पुरुष जोडीदार कसा आहे व आजूबाजूची परिस्थिती कशी आहे यावर सुद्धा बऱ्याच गोष्टी अवलंबून राहतात.
काही ठिकाणी याविषयी दोघे आपापसांत बसून बोलू शकतील अशी परिस्थिती असते सुद्धा. अशा वेळी ती त्याला हे स्पष्ट सांगू शकते की "मला रोज सेक्स हवा आहे" किंवा "दोन दोन महिने मी सेक्ससाठी वाट पाहू शकत नाही." यावर मग त्याने तिची ही गरज लक्षात घेऊन तिला अधिक वेळ देणे आणि दोन सेक्स मधील गॅप कमी करणे हे गरजेचे असते. काही ठिकाणी हे इतक्या सहजपणे होते सुद्धा आणि अशा जोडप्यांचे नाते पुढे तुलनेने अधिक चांगले होते. पण जिथे हे सांगितले जाऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते किंवा काहीतरी कारणे सांगून याबद्दलची आपली असमर्थता दर्शवली जाते तिथे हे प्रॉब्लेम अधिक जास्त वाढतात. अशा वेळी पुरुष जोडीदाराने खरं तर याकडे तितक्याच गांभिर्याने बघण्याची गरज असते. आपल्या स्त्री जोडीदाराची गरज व तिची होणारी अस्वस्थता समजून घेत अशा वेळी तिला जवळ घ्यायला हवे. तिच्याकडे दुर्लक्ष न करता किंवा जाणूनबुजून तिला टाळण्याचा प्रयत्न न करता तिचे बोलणे ऐकून घेत, नेमकी काय अडचण आहे यावर आपण मार्ग काढू असं सांगत तिच्याशी यावर बोलायला हवे. स्त्री जोडीदाराने सुद्धा अशा वेळी फक्त त्याच्याकडून अपेक्षा किंवा त्याच्यावर आरोप करत त्याच्याकडून स्पष्टीकरण किंवा उत्तरं मागण्याचा पवित्रा न घेता आपण दोघे मिळून यावर बोलून उपाय शोधूयात अशा पद्धतीने दोघांची भूमिका हवी. ज्या ज्या अडचणी असतील त्या दोघांनीही आपल्या जोडीदाराशी स्पष्ट बोलाव्यात आणि एकमेकांच्या अडचणी समजून घेत यातून काय मार्ग काढता येईल यावर दोघांनी बोलावं. त्यासाठी आवश्यक असतील ते प्रयत्न करण्याची तयारी दोघांनीही ठेवावी. यातून लैंगिक अस्वस्थता लगेच संपणार नसली किंवा त्यावरील उपाय सुद्धा लगेच निघत नसला तरी किमान दोघांचे नाते मात्र यामुळे अधिक घट्ट होते. याला माझी काळजी आहे आणि त्याला माझी अस्वस्थता कळतेय व तो सुद्धा ती दूर करण्यासाठी प्रयत्न करतोय या भावनेने सुद्धा अनेकदा खूप मोठा आधार व विश्वास वाटत असतो.
त्याच्या पुढच्या टप्प्यावर मग जर दोघांनी एकमेकांशी बोलून प्रश्न सुटला तर उत्तमच; पण यातून प्रश्न सुटत नसेल तर त्याला तसेच सोडून न देता त्यासाठी इतरांची मदत घ्यायला हवी. त्यासाठी अगदीच विश्वासातील कुणी माणसं आपल्या परिचयात असतील, जी यात मदत करू शकतील असं वाटत असेल तर त्यांच्याशी बोलायला हवं. त्यातून प्रश्न सुटला तर उत्तमच. पण कधी कधी समस्या शारीरिक किंवा मानसिक असू शकते. त्याची इच्छाच होत नसेल किंवा इच्छा असूनही लिंगात ताठरता येत नसेल किंवा आलेली ताठरता टिकत नसेल किंवा असेच इतर काही कारण असेल तर त्यासाठी सेक्सॉलॉजिस्टना भेटायला हवे. अनेकदा काही काऊन्सेलिंग किंवा औषधोपचार घेऊन सेक्स विषयीची इच्छा वाढते किंवा वाढवता येऊ शकते. तसेच लिंगाच्या ताठरते संदर्भात सुद्धा अनेक उपाय असतात जे लैंगिक आरोग्यतज्ञ आपल्याला सुचवू शकतात.
यामध्ये एक गोष्ट सर्वप्रथम लक्षात घ्यायला हवी की आपली समस्या कोणत्याही स्वरूपाची असो, त्याबाबत कोणताही न्यूनगंड मनात बाळगू नये. आपल्यातच काहीतरी कमी आहे आणि त्यामुळे आपणच लायक नाही वगैरे असं काहीही समजायची गरज नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात कोणती ना कोणती समस्या ही असतेच. फक्त जी काही समस्या असेल ती सर्वप्रथम मान्य करायला हवी आणि मग त्यावर उपाय शोधायची तयारी ठेवायला हवी. त्यामुळे त्यासंदर्भात ज्यांची कुणाची मदत होऊ शकेल आणि अर्थात तेवढी गुप्तता सुद्धा ठेवली जाईल अशा व्यक्तींकडून/तज्ञांकडून मदत नक्कीच घ्यायला हवी. अशा वेळी स्त्री जोडीदाराने सुद्धा तेवढीच भक्कम साथ, विश्वास आणि वेळ देणे गरजेचे आहे.
एवढे सगळे उपाय करूनही जर समस्या सुटत नसेल किंवा यातील काही उपाय करण्याची तयारी नसेल तर मात्र त्या स्त्री जोडीदाराला आपल्या लैंगिक इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या पसंतीचा इतर कुणी जोडीदार शोधण्याचे स्वातंत्र्य द्यायला हवे. अर्थात असं करणारे सुद्धा अनेकजण आहेतच म्हणा. आणि तेही वरील सर्व उपाय जमत नाहीत म्हणून किंवा स्वतः कमी पडतोय म्हणूनच नव्हे तर अगदी फक्त आपल्या जोडीदाराला समागम वैचित्र्याचा अनुभव घेता यावा म्हणून सुद्धा आपल्या जोडीदाराचे हे स्वातंत्र्य मान्य करणारे अनेक पुरुष आहेत. पण ती परिस्थिती वेगळी आहे, त्याविषयी आपण स्वतंत्र बोलू. सध्या किमान लैंगिक असमाधानी असणाऱ्या स्त्रियांच्या बाबतीतच फक्त बोलुयात. अशा वेळी मग पुरुष जोडीदारांनी आपल्या स्त्री जोडीदारांसाठी हा मार्ग अगदी सन्मानाने खुला करायला हवा. पण यातसुद्धा फक्त "माझ्याच्याने होत नाही. तू तुझं बाहेर बघू शकतेस." एवढं बोलून या प्रकरणातून स्वतःची सुटका करून घेऊनही चालणार नसते. कारण तू बाहेर शोधू शकतेस असं म्हटल्याने बाहेर लगेच अशा पुरुषांची रांग लागलेली असते असं नाही. त्यासाठी योग्य तो पुरुष मिळणे ही पुढे तितकीच किंबहुना कधी कधी अधिक अवघड गोष्ट असते. त्यामुळे असं फक्त बोलून त्यापुढे आपल्या जोडीदाराच्या लैंगिक अस्वस्थतेशी आता आपला काही संबंध नाही अशा आविर्भावात जगूनही चालणार नाही. तिला तसा योग्य जोडीदार मिळेपर्यंत आपण तिच्या या अस्वस्थतेत तिच्या सोबत राहायला हवे व शक्य असेल तर तिच्या लैंगिक इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत राहायला हवे. त्यासाठी प्रत्येक वेळी काय फक्त शिश्न योनी मैथुन किंवा इंटरकोर्स च व्हायला हवा असही नाही. स्त्रीच्या कामपूर्तीचे इतर मार्ग सुद्धा पुरुषांनी समजून घ्यायला हवेत व ते करायला हवेत. ज्यात हस्तमैथुन, मुखमैथुन व फोरप्ले हे अगदी प्रभावी काम करतात. कधी कधी अनेक स्त्रिया एवढ्यावर सुद्धा खूप समाधानी राहू शकतात व त्यांना हवी ती कामपूर्ती सुद्धा यातून मिळू शकते. यासोबत मग कधीतरी होवू शकणारा इंटरकोर्स सुद्धा त्यांना अधिक सुखावून जाऊ शकतो व कदाचित लैंगिक संबंधांसाठी इतर कुणी पुरुष जोडीदार शोधण्याची त्यांना गरजही वाटणार नाही. अर्थात काही स्त्रियांच्याच बाबतीत हे लागू होऊ शकते हे समजून घ्यावे. म्हणून आपल्या स्त्री जोडीदाराने सुद्धा यावरच समाधान मानावे अशी तिच्यावर जबरदस्ती व्हायला नको.
एकूण काय, तर इतर सर्व सुख व आनंदांसारखाच लैंगिक आनंद सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. अन्न, भूक, वस्त्र, निवारा यांसारख्या मूलभूत गरजांइतक्याच लैंगिक गरजा सुद्धा महत्त्वाच्या आहेत आणि शारीरिक आणि मानसिक अस्वस्थते सारखी लैंगिक अस्वस्थता सुद्धा गांभिर्याने घ्यायचीच बाब आहे हे सारं आपण आता तरी ध्यानात घ्यायला हवं आणि आपल्या वैवाहिक जोडीदाराच्या लैंगिक इच्छा, लैंगिक गरजा, लैंगिक आवडी नावडी, लैंगिक सुख व लैंगिक अस्वस्थता या सगळ्यांसाठी सर्वप्रथम आपण स्वतः जागरूक व जबाबदार राहायला हवं.
- सचिन थिटे (8424041159)
(आपल्या या संदर्भातील प्रतिक्रिया, सूचना, मतं, प्रश्न, शंका किंवा अनुभव माझ्या व्हॉट्सॲप वर नक्की शेअर करा.)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा