पर्व 4 - सेक्स वर बोलू काही - भाग 12 (लैंगिक स्वास्थ्य - 2)
कधी कधी परिस्थिती अशी असू शकते की आपली इच्छा असूनही जोडीदाराला लैंगिक आनंद देणे शक्य होत नाही. याची कारणे अनेक असू शकतात. कधी ती शारीरिक किंवा मानसिक असू शकतात; तर कधी दिवसभराचा ताण, रोजच्या कामाचे स्वरूप, दगदग, रोजचा थकवणारा प्रवास, घरातील कामं किंवा जबाबदाऱ्यांतून येणारा थकवा, काही आजारपण यातील किंवा यापेक्षाही वेगळी काही कारणे असू शकतात. त्या कारणांचा शोध घ्यायला हवा. त्यावर उपाय काढण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. उपाय दोघांनी आपापसांत बोलून निघणारे असतील तर ते काढायला हवेत. समस्या मानसिक असेल तर समुपदेशकांना भेटायला हवे. समस्या शारीरिक किंवा लैंगिक अवयवा विषयी काही असेल किंवा सेक्सची इच्छाच होत नसेल तर सेक्सोलॉजिस्टना भेटून त्यांची मदत घ्यायला हवी. पण यातील काहीच न करता फक्त समस्येला कुरवाळत बसणे व आपल्या किंवा जोडीदाराच्या लैंगिक अस्वास्थ्याकडे दुर्लक्ष करणे हे चुकीचे आहे. यातून हळूहळू मनातून एकमेकांबद्दल दुरावा तयार होऊन त्याचे पडसाद दैनंदिन जीवनातील इतर गोष्टींवर पडू शकतात. चांगले चाललेले वैवाहिक आयुष्य यातून हळूहळू बिघडू शकते.
अर्थात आजही अनेकजण - सेक्स हा काय एवढा महत्त्वाचा घटक आहे का? उगाच त्याला एवढं महत्त्व का द्यायचं? - असं म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणारे किंवा सेक्स विषयी बोलणाऱ्याची थट्टा उडवणारे आहेत. 'सेक्सच्या एवढं अधीन जायची गरज नाही' त्यापेक्षा इतर गोष्टींवर लक्ष द्या असं सांगणारे सुद्धा खूप आहेत. पण प्रत्यक्षात लैंगिक अस्वस्थ असणाऱ्या व्यक्तीला समजून घेणारे कमीच आहेत. कारण एकूणच लैंगिक स्वास्थ्याचे महत्त्व व लैंगिक अस्वास्थ्यातून येणारे मानसिक ताण यांविषयी समाजात अजून जाणिवाच तयार झालेल्या नाहीत की काय? असं वाटण्यासारखी परिस्थिती आहे. त्यासाठी सातत्याने याविषयीचे प्रबोधन होत राहणे गरजेचे आहे. ज्याविषयी आपल्याकडे आजही फार लक्ष दिले जात नाही ही फार मोठी सामाजिक शोकांतिका आहे. अर्थात ही परिस्थिती बदलणे ही इतकी सहजासहजी होणारी गोष्ट नसून त्यासाठी अजून अनेक वर्षे सातत्याने प्रयत्न होणे गरजेचे आहे.
सामाजिक पातळीवरील हे काम एकीकडे होत राहील; पण सध्या किमान वैयक्तिक जीवनात आपापल्या पातळीवर आपण काही गोष्टी नक्कीच करू शकतो. तसेच आपल्या जवळच्या वर्तुळात देखील याविषयी अधिक चर्चा घडवून आणू शकतो.
- सचिन (8424041159)
------------------------------------------------
(आपले सुद्धा याविषयीचे मत, प्रतिक्रिया, अनुभव, सूचना, शंका, प्रश्न तुम्ही मला व्हॉट्सॲप वर नक्की पाठवा.)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा