पर्व 4 - सेक्स वर बोलू काही - भाग 11 (लैंगिक स्वास्थ्य)

लैंगिक संबंधांबाबतचे असमाधान हे फक्त लैंगिक बाबीपर्यंतच मर्यादित न राहता त्यातून व्यक्तीच्या मानसिक व शारीरिक स्वास्थ्यावर सुद्धा परिणाम होतो व त्यातूनच पुढे कौटुंबिक व सामाजिक स्वास्थ्य सुद्धा बिघडते. म्हणूनच लैंगिक स्वास्थ्य हे मानसिक, शारीरिक, कौटुंबिक, वैवाहिक व सामाजिक स्वास्थ्यासाठी अतिशय महत्त्वाचे असते.
प्रत्येकाचे लैंगिक समाधान, लैंगिक इच्छा व लैंगिक संबंधांबाबतच्या आवडी नावडी वेगवेगळ्या असू शकतात. तसेच कामेच्छा सुद्धा वेगवेगळ्या असू शकतात. यांमध्ये जास्त तफावत असणारे स्त्री पुरुष जर एकमेकांचे वैवाहिक जोडीदार असतील तर त्यांतील किमान एकाला किंवा कधी कधी दोघांनाही लैंगिक कुचंबना, असमाधान व अस्वास्थ्याला तोंड द्यावे लागते. अनेकदा या गोष्टीकडे जोडीदाराकडून दुर्लक्षच केले जाते. पण यातून तयार होणारी लैंगिक अस्वस्थता पुढे हळूहळू नात्यातील स्वास्थ्य सुद्धा हिरावून घेते. म्हणूनच आपल्या जोडीदाराच्या लैंगिक अस्वास्थ्याकडे दुर्लक्ष न करता ते दूर करण्याकरता प्रत्येक वैवाहिक जोडीदाराने प्रयत्नशील असायला हवे.
त्यासाठी आपल्या जोडीदाराशी इतर गोष्टींप्रमाणेच लैंगिक संबंध व एकमेकांच्या लैंगिक इच्छा आणि समाधानाबाबत सुद्धा संवाद असणे गरजेचे आहे. आपल्या जोडीदाराच्या लैंगिक इच्छा, आवडी नावडी माहिती करून घेणे गरजेचे आहे. त्यातील जे आणि जितके शक्य असेल तितके आपण स्वतः पुढाकार घेऊन सुद्धा कधी कधी करायला हवे. आपल्याला काय हवंय ते सुद्धा सांगायला हवं. हा संवाद साधण्याची प्रत्येकाची पद्धत स्थळ, काळ, स्वभाव, परिस्थिती यांनुसार वेगवेगळी असू शकेल. कधी तो अबोल संवादही असू शकेल. पण संवादाशिवाय पर्याय नाही.
एकदा आपल्या जोडीदाराची लैंगिक इच्छा आणि आवड नावड लक्षात आल्यानंतर आपल्या शक्यतेप्रमाणे ते जपण्याचा व त्यांना लैंगिक आनंद देण्याचा प्रयत्न आपण एक चांगला जोडीदार म्हणून करायलाच हवा.
अनेक नात्यांत जोडीदारांमध्ये इतर गोष्टींवरून काही वाद, मतभेद, नाराजी असली तरी त्यांचे एकमेकांसोबतचे लैंगिक संबंध खूप चांगले असल्याने त्यांचे नाते खूप चांगले असलेले दिसते. इतर गोष्टींमधील मतभेद, नाराजी हळूहळू कमी होत राहते. पण त्या काळात एकमेकांना सोबत घट्ट ठेवण्याचे काम लैंगिक संबंध करतात. याउलट काही ठिकाणी इतर गोष्टी चांगल्या असूनही लैंगिक संबंध नियमित नसणे व एकमेकांच्या लैंगिक इच्छा आणि आनंदाकडे दुर्लक्ष करणारे जोडीदार हळूहळू एकमेकांपासून मनातून दुरावताना दिसतात. मग अशा वेळी नाते तांत्रिक बनून जाते आणि नात्यातील तणाव वाढत जातात. जेव्हा एखादे नाते तुटण्याची वरवर पाहता काहीच ठोस कारणे दिसत नाहीत, तेव्हा बऱ्याचदा लैंगिक असमाधान हेच यातील कारण असते.
शिवाय आपण जाणीवपूर्वक आपल्या जोडीदाराच्या लैंगिक गरजांकडे दुर्लक्ष करणार आणि जोडीदाराकडून मात्र आपल्या इतर अपेक्षा पूर्ण करण्याची किंवा आपल्याशी तितक्याच प्रेमाने, आदराने आणि सन्मानाने वागण्याची इच्छा ठेवणार हेही नक्कीच न्याय्य नसेल हेही लक्षात घ्यायलाच हवे.

- सचिन (8424041159)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध