नाती जपताना - भाग २

समोरच्याच्या फार महत्त्वाच्या नसणाऱ्या तक्रारी व चुका यांच्याबाबत 'मान्य करणे (acceptance)' आणि 'दुर्लक्ष करणे (ignorance)' हे दोन उपाय प्रभावी ठरू शकतात हे आपण मागच्या लेखात पाहिले.
थोडा बारकाईने विचार केला तर आपल्या हेसुद्धा लक्षात येईल की आपल्या सर्वांत जास्त तक्रारी या आपल्या जवळच्या माणसांबद्दल असतात. कधी कधी याच साध्या क्षुल्लक चुका इतर कुणाकडून होताना दिसल्या तर आपण त्या सहज दुर्लक्षित करतो; पण त्याच आपल्या जवळच्या व्यक्तीकडून झाल्या तर मात्र आपण त्याबाबत लगेच तक्रारी सुरू करतो. इतरांच्या बाबत व्यक्त होताना आपण अनेकदा त्यांना आवडेल का? त्यांना वाईट वाटेल का? याचा विचार करत असतो, पण तेवढा विचार आपल्या जवळच्या व्यक्तीबाबत व्यक्त होताना कधी करत नाही. आणि म्हणूनच आपल्या जास्त तक्रारी व भांडणे ही जवळच्या व्यक्तीसोबत होतात. कारण तिथे आपण एकमेकांचे मन जपण्याचा तेवढा गांभिर्याने विचार करत नाही. खरंतर एकवेळ हेच अगदी उलट असलं तरी चालू शकणार असते. म्हणजे दूरच्या व्यक्तीसोबत तक्रारी किंवा भांडणे झाली तरी त्याने आपल्या दैनंदिन आयुष्यात फार काही नुकसान होणारे नसते; याउलट जवळच्या व्यक्तीबाबत झाले तर मात्र आपले दैनंदिन आयुष्य तणावाचे बनत असते.
त्यामुळे ज्या व्यक्तींसोबत आपण जास्त काळ राहत असतो, त्या व्यक्तींसोबत व्यक्त होताना आपल्याला अधिक काळजीपूर्वक व्यक्त होणे गरजेचे असते. अर्थात ते अवघड असते हे मान्यच आहे. कारण बाहेरची व्यक्ती कधीतरी भेटणार असते किंवा तिच्याशी आपला तसा फार काही संबंध नसतो, म्हणून आपण तिच्या गोष्टींकडे सहज दुर्लक्ष करू शकतो. याउलट जवळच्या व्यक्तीसोबत कायम राहणार असल्याने आणि ही व्यक्ती आपली वाटत असल्याने या गोष्टी तिने सुधाराव्यात किंवा असे वागू नये असे आपल्याला वाटणे स्वाभाविक असते. पण अशा वेळी आपल्याला काही गोष्टींचा विचार करायला हवा -
1. सर्वांत प्रथम तर आपल्याला हे मान्य करणं गरजेचं आहे की कोणतीही व्यक्ती कधी कधी किंवा अनेकदा कितीही सामान्य/साधी चूक सुद्धा करूच शकते. (त्यामुळे 'तो/ती अशी चूक करूच कशी शकतो/शकते?' अशा पद्धतीने एखाद्या चुकीकडे बघण्याची गरज नाही.)
2. आपली व्यक्त होण्याची किंवा समोरच्याला चूक दाखवून देण्याची पद्धत योग्य असायला हवी. यातून समोरच्याबद्दल आपल्याला वाटणारी काळजी/आपुलकी जाणवायला हवी. ना की त्रागा, राग, संताप.
3. चूक दाखवून देताना समोरच्याचा अनादर होणार नाही याची काळजी घ्यायला हवी.
4. ती चूक किंवा सवय दुरुस्त करण्यामध्ये आपण तिच्या सोबत आहोत असं तिला जाणवायला हवं.
5. समोरच्याला लगेच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून त्याच्याबाबत तक्रारी किंवा प्रश्न सुरू न करता शांतपणे सोबत बसून त्या गोष्टीबाबत बोलायला हवे.
6. समोरच्याला त्याची चूक जाणवलीय असं वाटत असेल तर पुन्हा पुन्हा त्याला त्याबाबत टोचू नये.
7. अगदीच साध्या साध्या चुकांबाबत वारंवार टोकत राहू नये. स्वभावातील काही गोष्टी या न बदलणाऱ्या किंवा बदलायला खूप वेळ घेणाऱ्या असतात. त्यामुळे त्यांच्याबाबत वारंवार टोकून उपयोग कमी व नुकसानच अधिक होत असते.
8. आपण सांगितलेली एखादी गोष्ट समोरच्याने ऐकलीच पाहिजे किंवा मान्य केलीच पाहिजे असा अट्टाहास करू नये. जवळची व्यक्ती या नात्याने आपल्याला समोरच्याला एखादा चांगला सल्ला द्यावासा वाटणे यात काही चूक नाही; पण तो सल्ला समोरच्या व्यक्तीने ऐकायलाच हवा असा हट्ट धरू नये. सल्ला देवून त्याची अंमलबजावणी त्याच्यावर सोडून द्यावी. त्यात काही मदत लागली तर नक्की करावी, पण जबरदस्ती करू नये.
9. प्रत्येक व्यक्ती ही एक स्वतंत्र स्वभाव व व्यक्तीमत्व असणारी असते. आपण आपल्या मताप्रमाणे समोरच्याचा पूर्ण स्वभाव किंवा व्यक्तीमत्व बदलू शकत नाही. फक्त त्यातील अगदीच चुकीच्या वाटणाऱ्या गोष्टींचे प्रकार व प्रमाण कमी करू शकतो.
या काही गोष्टी आपले नाते जपताना आणि एकमेकांना समजून घेताना नक्कीच आपल्याला उपयोगी पडू शकतात. याव्यतिरिक्त ही काही गोष्टी नक्कीच असू शकतात. यांतील जितक्या शक्य तितक्या आपण आपल्या नात्यात अंमलात आणून आपले नाते अधिक चांगले, हेल्दी करण्याचा प्रयत्न करू शकतो.

- सचिन (8424041159)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध