नाती जपताना - भाग १
आपले विचार आणि विचार करण्याची पद्धती आपल्या नात्यात आणि एकूणच आपल्या आयुष्यात अतिशय महत्त्वाचा रोल निभावत असतात. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या एखाद्या घटनेबाबत आपण कसा विचार करतोय, यावरून ती घटना आपल्या आयुष्यावर काय परिणाम करील हे ठरत असतं. यामध्ये प्रामुख्याने सकारात्मक आणि नकारात्मक विचार यांचा आपल्या आयुष्यावर, आपल्या नात्यांवर चांगला/वाईट परिणाम होत असतो. म्हणून आज त्याविषयी बोलुयात.
नकारात्मक विचार आपल्याला ठरवून मनात आणण्याची गरज नसते. ते आपसूक येतच असतात.
समोरच्याच्या चुका किंवा त्यांच्याबद्दल तक्रारी ठरवून विचार करून आठवायची गरज नसते. त्या स्वतःहूनच आपसूक आपल्याला जाणवत असतात.
एकूणच नकारात्मकता मनात आणण्यासाठी आपल्याला विशेष काहीच मेहनत घ्यावी लागत नाही; पण याउलट सकारात्मकता मात्र ठरवून आणावी लागते. त्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागते.
समोरच्याच्या चुका समजून घेण्यासाठी किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी आपल्याला ठरवून प्रयत्न करावे लागतात. त्यांच्याबद्दल असणाऱ्या आपल्या तक्रारी खरंच एवढ्या महत्त्वाच्या आहेत का? की त्या सहज दुर्लक्षित करण्याइतक्या किरकोळ आहेत? यावर सुद्धा आपल्याला वेळ घेवून विचार करावा लागतो.
अनेकदा समोरच्या माणसाच्या चुका या अगदीच क्षुल्लक किंवा सामान्य असतात, ज्या सहज दुर्लक्षित करण्यासारख्या असतात; पण आपणच त्याला जास्त महत्त्व देवून मोठं करत असतो. अनेकजण तर समोरच्याच्या चुकांकडेच बारकाईने लक्ष देवून असतात. एखादी जरी चूक घडली रे घडली, की लगेच त्यावरून तक्रारी करायला सुरू. बरं यामुळे ना तक्रारी करणाऱ्याला फायदा होत असतो, ना ज्याच्याबद्दल तक्रारी करतोय त्याला. उलट दोघांचेही अनेक प्रकारे नुकसानच होत असते आणि दोघांचे नाते सुद्धा बिघडत असते. पण याचा बारकाईने विचार फार कुणी करताना दिसत नाही.
ज्याच्याकडून चुका होणारच नाहीत असा माणूस अजून तरी कुठे जन्माला आलेला नाही आणि नाही पुढे येईल. माणूस हा चुकांचा पुतळा आहे असं म्हणतात ते यामुळेच. म्हणजे आपल्यासहित आपण ज्या माणसांसोबत राहतो, ती सर्व माणसे कधी ना कधी किंवा अनेकदा चुका करतच असतात. त्यांचे प्रमाण आणि प्रकार फक्त वेगवेगळे असतात एवढंच. आता यामध्ये अगदीच सहनच न होवू शकणारे टोकाचे प्रकार किंवा प्रमाण कुणाचे असेल तर एकवेळ ठीक. पण अर्थातच हे खूप ठिकाणी दिसत नाही. अनेक ठिकाणी चुकांचे प्रकार आणि प्रमाण सामान्य असतात, पण तरी त्यावरून जोडप्यांमध्ये, नात्यांमध्ये, मैत्रीमध्ये तणाव येत आणि वाढत असतात.
अशा वेळी 'मान्य करणे (acceptance)' आणि 'दुर्लक्ष करणे (ignorance)' हे दोन अतिशय प्रभावी उपाय असतात जे आपल्याला एकमेकांविषयी ची नकारात्मकता कमी करण्यास मदत करत असतात.
(क्रमशः)
(याविषयी पुढे continue बोलतच राहू. तोपर्यंत आपलेही यासंदर्भात अनुभव, मतं, प्रतिक्रिया, सूचना नक्की देत रहा.)
- सचिन (8424041159)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा