पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही - भाग 9 (लैंगिकता - 1)

समलैंगिक, उभयलैंगिक किंवा पारलैंगिक असणे ही कमतरता किंवा प्रॉब्लेम नसून तितकेच नैसर्गिक आहे, जितके भिन्नलैंगिक असणे नैसर्गिक असते. ही गोष्ट आज एकविसाव्या शतकात सुद्धा समजून घेतली जात नाही, ही आपल्या समाजाची शोकांतिका आहे. मान्य आहे की भिन्नलैंगिक व्यक्तींची संख्या सध्या समाजात इतर लैंगिकतेच्या व्यक्तींपेक्षा जास्त प्रमाणात दिसत आहे. अर्थात - प्रत्यक्षात स्वतःची खरी लैंगिकता जाहीर करणाऱ्यांची संख्या आणि लपून छपून, समाजाच्या/ कुटुंबाच्या भीतीपोटी/दबावापोटी आपली खरी लैंगिकता लपवून भिन्नलिंगी असल्याचे दाखवणारी संख्या - यातील तफावत प्रचंड प्रमाणात असण्याची शक्यता गृहीत धरता वरील प्रमाण कितपत जास्त असू शकेल? हा संशोधनाचा मुद्दा आहे. पण समजा जरी तात्पुरते हे मान्य केले, की भिन्नलिंगी व्यक्तींच्या तुलनेत इतर लैंगिकता असणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण अल्प असेल, तरी ते 'आहे!' हे सत्य नाकारून कसे चालेल? कोणतेही सत्य अल्प प्रमाणात असले म्हणून ते असत्य होवू शकते का? किंवा त्याला कोणी नाकारू शकते का? आणि त्याच्याकडे डोळेझाक केली म्हणून किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले म्हणून कोणतेही सत्य लपते का? नष्ट होते का? किंवा त्याची किंमत कमी होते का?

आपल्या स्वतःच्या खऱ्याखुऱ्या असणाऱ्या लैंगिकतेला जेव्हा कुणी उघडपणे मांडू शकत नाही, सांगू शकत नाही, तेव्हा त्यांची काय अवस्था होत असेल? याची जरा जरी कल्पना करून पाहिली तरी यातील दाहकता आपल्या लक्षात येवू शकेल. अशी कितीतरी असंख्य गुदमरणारी मने आपल्या आजूबाजूला आहेत याची आपल्याला सुतराम कल्पना सुद्धा नसते. आपल्या आतला आवाज दाबून ठेवत फक्त बाहेरच्या जगाला अपेक्षित असणारं जीवन जगत राहणं ही गोष्ट सोपी नाही. पण तरी सुद्धा असं घुसमटीचं आयुष्य जगणारी माणसं असंख्य आहेत, हे सत्य आहे आणि याची कारणे सुद्धा अनेक आहेत.
याची वेगवेगळी कारणे, त्यावरचे उपाय आणि यातील आपली स्वतःची वेगवेगळ्या टप्प्यांवरील भूमिका काय असावी? या सर्व मुद्द्यांवर आपण पुढे सविस्तर बोलूच; पण त्याआधी अगदी बेसिक पासून सुरूवात करू.. पुढच्या लेखापासून... आणि मग हळूहळू वरच्या गंभीर आणि महत्त्वाच्या मुद्द्याकडे येवू...
(तोपर्यंत, तुम्हीही सांगा - तुम्हाला या मुद्द्यांना धरून काय वाटतं? तुमचे सजेशन्स, सूचना, मतं, प्रश्न आणि अगदी सहज शेअरिंग सुद्धा नक्की करा. खालील नंबर वर..)
- सचिन थिटे (8424041159)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध