*समाजस्वास्थ्य आणि लैंगिकता चळवळ*

समाजस्वास्थ्य हे मासिक र धों नी सुरू केले होते. त्यावेळची परिस्थिती पाहता हे खूप धाडसाचे पाऊल होते. असंख्य अडचणींना सामोरे जात अगदी स्वतःची नोकरीच नाही, तर संपूर्ण आयुष्य पणाला लावत रधोंनी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत लैंगिकता प्रबोधनाचे काम चालू ठेवले. अनन्य साधारण काम होते ते.

 रधोंनी शंभर वर्षांपूर्वी सुरू केलेले हे काम आजही तितक्याच गरजेचे वाटते. त्यातील संततिनियमन व त्यासाठीची गर्भनिरोधके याबाबतीत समाज पूर्णपणे नाही, तरी बऱ्यापैकी पुढे आला आहे असं नक्कीच म्हणता येईल; पण लैंगिक स्वातंत्र्य, वेगवेगळ्या लैंगिकता, समागम वैचित्र्य यांसारख्या अनेक गोष्टींबाबत आजही समाज म्हणून आपली फारशी प्रगती झाली आहे असे वाटत नाही. अजूनही अगदी स्वतःच्या लैंगिक अवयवांकडे सुद्धा इतर अवयवांसारखेच मोकळेपणाने पाहण्याची अनेकांची मानसिक तयारी होत नाही. आजही लैंगिकता या विषयावर 'तेरी भी चूप मेरी भी चूप' अशा प्रकारची चुप्पी धरून बसलेला समाज आपल्या आजूबाजूला दिसतोय. लैंगिकता, लैंगिक अवयव आणि लैंगिक संबंध यांविषयी आजही प्रचंड अज्ञान, गैरसमज, न्यूनगंड, टॅबू आणि विरोधाची भूमिका असल्याचे दिसते.
 त्यामुळे आजही लैंगिकता, लैंगिक अवयव, लैंगिक संबंध आणि लैंगिक स्वातंत्र्य या विषयावर सातत्याने बोलत, लिहीत, वाचत आणि चर्चा करत राहण्याची गरज आहे.
हे काम आजही तितके सोपे नाहीये. या कामाचे सपोर्टर दिवसेंदिवस वाढत आहेत हे नक्की. पण याला विरोध करणारे सुद्धा त्यापेक्षा जास्त वेगाने वाढत आहेत हेसुद्धा वास्तव आहे. अर्थात याचे कारणही तसेच आहे म्हणा. कारण लैंगिकता विषयक कार्य करणे किंवा या कार्याचे सपोर्टर बनणे हे सामाजिक दृष्ट्या अधिक अवघड आहे. उलटपक्षी या कामाचे विरोधक बनणे किंवा तटस्थ राहणे अनेकांना जास्त सोयीचे वाटते. म्हणूनच हे काम चालू राहावे असे वाटणाऱ्या तटस्थांची संख्या सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. मला असे अनेकजण भेटतात ज्यांना माझे लैंगिकता विषयक लिखाण आणि कार्यक्रमांतून बोलणे हे सगळे मान्य आणि आवडणारे असते. हे अधिक वाढावे असेही वाटत असते. पण या पोस्टला लाईक, कमेंट किंवा शेअर करणे किंवा पुस्तक खरेदी करून वाचायला घेणे किंवा याविषयी कुणाशी बोलणे या गोष्टींसाठी त्यांची हिंमत होत नाही. हे तटस्थ असणारे नागरिक जेव्हा हिंमत करून पुढे येवून सपोर्ट करायला सुरू करतील तेव्हा ही लैंगिकता शिक्षणाची आणि लैंगिक स्वातंत्र्याची चळवळ नक्कीच अधिक वेगाने वाढत जाईल यात शंका नाही. 

एक ना एक दिवस हे होईलच. तोपर्यंत आपण जे आहोत, जेवढे आहोत तेवढ्या संख्येनिशी आणि ताकदीनिशी काम करत राहू. लैंगिकता शिक्षण व लैंगिक स्वातंत्र्याची ही चळवळ अशीच पुढे चालू ठेवू.✊
- सचिन थिटे (8424041159)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध