पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही - भाग 10 (लैंगिकता - 2)
लैंगिकता म्हणजे लिंगविषयक मानसिकता. स्त्री, पुरुष किंवा इतर लैंगिकतेच्या व्यक्तींचे लिंगविषयक विचार, भावना व वर्तन म्हणजे लैंगिकता होय. ही लैंगिकता बहुतांशी प्रत्येकाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत सोबत असते. लैंगिकतेविषयीचे आपले आचार-विचार हे आपले व्यक्तिमत्त्व ठरवत असतात. त्यामुळेच लैंगिकता ही आपल्या व्यक्तिमत्वाचा सुद्धा एक भाग असते.
मेंदूतील हार्मोन्स चे प्रमाण, स्वतःची व आजूबाजूची मानसिक, शारीरिक, सामाजिक व कौटुंबिक परिस्थिती यांसारख्या अनेक गोष्टी आपली लैंगिकता ठरण्यात किंवा ठरवण्यात कारणीभूत असतात किंवा मदत करत असतात. त्यानुसार लैंगिकतेचे अनेक वेगवेगळे प्रकार पडतात.
आपल्या आजूबाजूला स्त्री व पुरुष यांच्यासोबत व यांच्यामध्ये सुद्धा अनेक वेगवेगळ्या लैंगिकता असणाऱ्या व्यक्ती सुद्धा राहत असतात. स्त्रियांना पुरुषांविषयी व पुरुषांना स्त्रियांविषयी आकर्षण असेल तर अशा स्त्री पुरुषांना भिन्नलिंगी आकर्षण असणारे स्त्री - पुरुष (Heterosexual) म्हणतात. काही स्त्रियांना फक्त स्त्रियांविषयी व काही पुरुषांना फक्त पुरुषांविषयीच लैंगिक आकर्षण असते. त्यांना समलिंगी आकर्षण असणारे स्त्री व पुरुष (Homosexual) असे म्हणतात. यातील स्त्रियांना लेस्बियन तर पुरुषांना गे असेही म्हणतात. काही स्त्रिया व पुरुष यांना स्त्री व पुरुष दोघांविषयी लैंगिक आकर्षण असते, त्यांना उभयलिंगी आकर्षण असणारे स्त्री किंवा पुरुष (Bi-sexual) असे म्हणतात. तर काही स्त्रिया व पुरुष यांना कुणाविषयीच लैंगिक आकर्षण नसते त्यांना अलैंगिक (Asexual) स्त्री/पुरुष असे म्हणतात. काही व्यक्तींमध्ये शरीर स्त्रीचे असले तरी मेंदूमध्ये लैंगिक भावना मात्र पुरुषाच्या असतात किंवा शरीर पुरुषाचे असले तरी मेंदूमध्ये लैंगिक भावना मात्र स्त्रियांच्या असतात. त्यांना पारलिंगी (Transgender) किंवा तृतीयपंथी असे म्हणतात. यांपेक्षा वेगवेगळ्या सुद्धा भाव भावना असणाऱ्या, यांतील कोणत्याच लैंगिकते मध्ये पूर्णपणे न बसणारे असेही काही स्त्री पुरुष असतात. त्यांची सुद्धा लैंगिकता वेगवेगळी असते. अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या लैंगिकता असणाऱ्या व्यक्ती आपल्या आजूबाजूला असतात. या व्यक्तींची लैंगिकता तेवढीच नैसर्गिक असते जेवढी भिन्नलिंगी आकर्षण असणाऱ्या स्त्री-पुरुषांची असते. त्यामुळे त्यांच्या या लैंगिकतेसह आपण त्यांचा सन्मान करायला हवा. त्यांना आपल्याकडून त्यांच्या लैंगिकतेवरून काही त्रास दिला जाणार नाही याची काळजी घ्यायला हवी.
- सचिन थिटे (8424041159)
(तुमच्या शंका, सूचना, मते, प्रतिक्रिया, अनुभव नक्की शेअर करा.)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा