र. धों. ना आदरांजली

आज र. धों. चा स्मृतीदिन.
आजपासून जवळपास शंभर वर्षांपूर्वी र. धों.नी लैंगिकतेविषयी प्रबोधनाची चळवळ सुरू केली. संतती नियमन, गर्भनिरोधक पर्याय, लैंगिक संबंधांबाबतचा खुलेपणा, वेगवेगळ्या लैंगिकता, लैंगिक आरोग्य आणि नग्नता अशा अनेक दुर्लक्षित विषयांवर त्यांनी खूप मेहनतपूर्वक अभ्यासू आणि धाडसी मांडणी केली. लैंगिकतेविषयी बोलणे, लिहिणे हे आजच्या काळात सुद्धा सोपे नाही. ते काम आजपासून शंभर वर्षांपूर्वी त्यांनी केले, यातच त्यांच्या कार्याची उंची दिसून येते.
लैंगिकतेसोबतच इतरही अनेक विषयांवर त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकवाद आणि चिकित्सक अंगाने लेखन केले. पण तरीही विशेषकरून लैंगिकता या एकाच विषयाला वाहून घेवून त्यांनी आयुष्यभर काम केले हे विशेष दिसते.
लैंगिकतेविषयी खुलेपणाने भूमिका घेणे सोपे नव्हते. त्यासाठी त्यांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागले. नोकरी सोडावी लागली, अन्य वृत्तपत्र/साप्ताहिक/मासिके लैंगिकतेविषयीचे लेख छापायला तयार नाहीत म्हणून शेवटी स्वतःचे मासिक काढावे लागले. मासिकासाठी देणगीदार, प्रकाशक सहजासहजी मिळाले नाहीत. मासिकातून नफा तर सोडाच, पण अनेकदा स्वतःच्याच खिशातून पैसे घालावे लागले. अनेक खटल्यांना आणि कोर्ट कचेऱ्यांना तोंड द्यावे लागले. त्यातून येणारा दंड भरावा लागला. आधीच आर्थिक परिस्थिती बिकट. त्यात पत्नीचे म्हणजेच मालतीताईंचे आजारपण सुरू झाले. या सगळ्या गोष्टींना तोंड देणे आणि तरीही हे लैंगिकतेचे काम शेवटपर्यंत तेवढ्याच जिद्दीने आणि उलट अधिक चिकाटीने करत राहणे हे सोपे नव्हते.
यात अर्थातच मालती ताईंचा वाटा सुद्धा खूप मोठा आहे. त्या फक्त र. धों च्या पाठीशी उभ्या राहिल्या नाहीत, तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी कामात सहभाग घेतला. जोडीदाराच्या खंबीर साथीशिवाय एवढी मोठी लढाई शक्यच नसते.
ही लढाई र. धों. नी तर त्यांच्या जोडीदारासोबत मिळून त्यांच्या परीने, त्यांच्या शक्यतांनुसार लढली आणि जिंकली सुद्धा. आता वेळ आपली आहे.
आपण आपला लैंगिकते कडे बघण्याचा दृष्टिकोन खुला करू शकलोय का? स्वतःच्या मनातील लैंगिक बंधने काढू शकलोय का? शील - अश्लील याविषयीच्या आपल्या संकल्पना विस्तारू शकलोय का? लैंगिक संबंधांकडे पाहण्याचा खुलेपणा आपल्या नजरेत आणू शकलोय का? आपल्या स्वतःच्या लैंगिक अवयवांकडे पाहू आणि लक्ष देवू लागलोय का? इतर सर्व लैंगिकतेच्या व्यक्तींकडे समान आदराने पाहू लागलोय का?
आणि याच्या पुढच्या टप्प्यावर आपल्या आणि आपल्या जोडीदाराच्या लैंगिक स्वातंत्र्य, लैंगिक आवडी नावडी आणि लैंगिक इच्छा/अनिच्छा यांचा स्वीकार आणि सन्मान करायला शिकलोय का? त्याचबरोबर समागम वैचित्र्य, मुक्त लैंगिकता या गोष्टींकडे खुल्या नजरेने पाहू शकतोय का?
हे सगळे प्रश्न आपण स्वतःला विचारणे आणि याची स्वतःसाठी ची उत्तरे स्वतःच शोधणे आणि जिथे आहोत तिथून या दिशेने पुढे जाण्याचा प्रयत्न करणे हीच आजच्या दिवशी र. धों. ना वाहिलेली खरी आदरांजली ठरू शकेल असे वाटते.

*र. धों. होणे सोपे नाही. पण त्यांच्या मार्गाचा वाटसरू होणे शक्य आहे.* त्यासाठी मनात पिढ्यानपिढ्या करकचून बांधून ठेवलेल्या बंदिस्त संकल्पना जाणीवपूर्वक तोडून बाहेर येण्याचा प्रयत्न करूया.
- सचिन (8424041159)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध