शेअरिंग केअरिंग - 36 (...आणि ऑपरेशन च्या दाढेतून मी परत आलो.. भाग ५)
आणि तो दिवस उजाडला...
चौथ्या दिवशी सकाळी मी उठलो तेव्हा सकाळच्या राऊंड वरचे एक डॉक्टर मला चेक करायला आले होते. त्यांनीच मला उठवले. कसं वाटतंय विचारलं? मी म्हटलं - एकदम बरा आहे मी आता. काहीच दुखत नाही. - मग त्यांनी बरोबर माझ्या बेंबीवर अंगठा ठेवून मधल्या बोटाने सरळ रेषेत उजव्या बाजूला पोटात दाबले आणि लगेच मी 'दुखतंय' असं त्यांना सांगितलं. 'याचाच अर्थ appendix आहे ना. मग ऑपरेशन केलेलं कधीही चांगलं.' असं म्हणून ते निघाले. मलाही ते पटलं. इतक्यात माझ्या लक्षात आलं की माझं पोट अजूनही साफ झालेलं नाही आणि अंगाला खाज सुद्धा अधूनमधून येतच आहे. लगेच डॉक्टरांना मागे बोलावून मी हे सांगितले. त्यावर एक औषध द्यायला सांगतो असं म्हणून डॉक्टर गेले. त्या औषधाचे नाव ऐकल्यावर मला आठवले की - काल जेव्हा बेड मिळाले नाही म्हणून आम्ही परत घरी गेलो होतो, तेव्हा मी आमच्या ऑफिस च्या कन्सल्टंट डॉक्टरांना मेसेज वर कळवलं होतं की आता मला फक्त पोट साफ न होणे एवढी एकच अडचण राहिलेली आहे. तेव्हा त्यांनी हेच औषध मेसेज मध्ये कळवलेलं होतं.
किरण अजून माझ्या जवळच होता. डॉक्टर येवून गेल्यावर लगेच किरण ला मी घरी जायला सांगितले. त्याला ऑफिस ला पण जायचे होते. बिचारा रात्रभर अजिबात झोपलेला पण नव्हता. किरण गेल्यावर लगेच एक नर्स सलाईन चा ट्रे घेवून आली. आता मला नाही म्हणताच येणार नव्हते. मी गुपचूप सलाईन लावून घेतली. त्यानंतर साफ सफाई करायला एक ताई आल्या, त्यांच्या लक्षात आलं की मी अजून हॉस्पिटल मधून मला घालायला दिलेले कपडे घातलेच नाहीयेत. मग त्यांनी 'आधी कपडे बदलून घ्या, नाहीतर डॉक्टर आम्हाला ओरडतील' असं सांगितलं. त्यामुळे नाईलाजाने आता कपडे घालणे भागच होते. त्यानंतर सकाळचा नाष्टा आला. उपमा आणि दूध. मागचे दोन दिवस फक्त दही भातावरच असल्याने आता हा उपमा जास्तच गोड लागत होता. त्यानंतर काही वेळाने हॉस्पिटल चे कन्सल्टंट डॉक्टर, ज्यांच्याकडे आम्ही सुरुवातीला गेलो होतो आणि ज्यांनी ऑपरेशन करायला सुचवले होते, ते आले. त्यांनी 'कसं वाटतंय?' विचारलं. मी 'एकदम छान वाटतंय आता. फक्त दाबल्यावर थोडं दुखतंय' म्हटलं. त्यावर त्यांनी 'ऑपरेशन कर देते हैं' असं उत्तर दिलं आणि ते लगेच निघून गेले. आता ऑपरेशन होणारच आहे, याची मला पक्की खात्री झाल्यामुळे मी हॉस्पिटल मधला जो एकजण आमच्या ऑफिस सोबत मेडिकल सेटलमेंट चे काम पाहतो, त्याच्याशी बोलून त्याला डायरेक्ट सेटलमेंटची प्रोसेस करायला सांगितले. माझ्या ऑफिस मधल्या एका मित्राला कॉल करून त्याला सगळं सांगून माझ्या डायरेक्ट सेटलमेंट च्या फॉर्मवर आमच्या ऑफिस च्या कन्सल्टंट डॉक्टरांची सही घेवून तो फॉर्म माझ्या घरी पोचवायला सांगून ठेवले. ऑफिस मध्ये पण तसं कळवलं. डायरेक्ट सेटलमेंट ची प्रोसेस सुरू झाली.
आता मी पूर्णपणे ऑपरेशन करण्याची स्वतःची मानसिकता करून घेत होतो. काही मित्रांचे कॉल आले, ऑफिस मधल्या माझ्या डिपार्टमेंट मधून कॉल आले, त्यांनाही तसं कळवलं. दुपारी पुन्हा भरपूर जेवण आलं. मागचे दोन दिवस कमी जेवायचं आणि फक्त दही भात च खायचं असं शेड्युल होतं. रात्री इथं आल्यापासून मात्र सकाळचा नाश्ता आणि आता दुपारचे जेवण सगळंच भरपेट सुरू झालं होतं. पोट तर अजूनही साफ होत नव्हतं. मग या खाण्याने अजून काही त्रास तर होणार नाही ना? ही शंका व भीती मनात वाटतच होती. पण हॉस्पिटल मध्येच असल्याने जरा निर्धास्त होतो. सकाळी ते डॉक्टर पोट साफ होण्याचे औषध देतो असं सांगून गेले होते, त्यानंतर अजून तरी कुणीच कोणते औषध दिले नव्हते. दोन वेगवेगळ्या नर्स ना राऊंड वर आल्यावर याविषयी सांगण्याचे प्रयत्न करून झाले होते. एकीला तर हिंदी पण कळत नव्हती. 'ओन्ली इंग्लिश' असं ती म्हणत होती. कसंबसं तिला कळेल असं सांगितलं होतं. इथं आपल्या जागेवर जर एखादं कुणी कमी शिकलेलं, हिंदी व्यवस्थित न येणारं आणि इंग्लिश चा तर अजिबातच संबंध नसणारे कुणी पेशंट किंवा त्यांचे नातेवाईक आले, तर त्यांचे काय हाल होतील याचाच मी विचार करत होतो. शेवटी अजून एक दोनदा सांगितल्यावर कुणीतरी एका नर्स ने येवून 'ते औषध रात्री झोपताना प्यायला देणार' असं मला समजावलं. माझ्या मनात प्रश्न होता की - तोपर्यंत एवढं जेवतोय याचं पोटाने करायचं काय?
हॉस्पिटल मधल्या सोयी तर इतक्या भारी होत्या! रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर कितीतरी वेळा सांगितल्यावर डोक्याखाली घ्यायला एक उशी मिळाली होती. नर्स ला बोलावण्यासाठी जे बटण दिले होते, ते बिघडलेले होते. ते सकाळपासून जवळपास माझ्याजवळ येणाऱ्या प्रत्येक नर्स ला सांगून झाले होते. प्रत्येकजण मेंटेनन्स वाल्यांना सांगतो म्हणून जात होते. सलाईन संपल्यावर किंवा मध्येच काढायची असल्यावर यांना सांगायची काही सोयच नव्हती. एकदा साफ सफाई वाला त्याच वेळी तिथे आला, म्हणून त्याला सांगून नर्स ला बोलावलं. एकदा शेजारच्या पेशंट कडे नर्स आली होती, तिला हाक मारून सांगितलं. दोनदा शेजारच्या पेशंट चे बटण चालू होते, त्यांना बोलवायला सांगितले. एकदा तर माझेही लक्ष नव्हते तेव्हा सलाईन संपून अर्धी नळी रक्तानेच सलाईन भरली होती. पण एवढे होवूनही ते बटण काय शेवटपर्यंत दुरुस्त झालेच नाही. जेवताना एक वेगळीच गंमत. सकाळी नाश्त्या मध्ये उतप्पा आणि कलिंगड वगैरे फळांच्या काही फोडी होत्या. हे खायला काटे चमचा असता तर जरा जास्त सोयीचं राहिले असतं. पण त्यात फक्त साधा चमचा च होता. मी म्हटलं जावू द्या, काही फरक पडत नाही, चालवून घेवूया. मग दुपारच्या जेवणात डाळ, भात, दही असं सगळं छान होतं. पण सोबत दिलेला चमचा हा काटे चमचा होता. साधा चमचा दिलाच नव्हता. तरीही मी त्यातला डाळ भात हातानेच खाल्ला. पण दही कसं खाणार? म्हणून तसं च ठेवलं. ते डबा परत न्यायला आल्यावर त्यांना हे सांगितलं आणि तसेच ठेवलेलं दही दाखवलं, मग ते जावून चमचा घेवून आले. संध्याकाळच्या नाश्त्याला पुन्हा चमचाची तीच बोंब.
आतापर्यंत तरी उद्या ऑपरेशन होणार हे आम्ही सर्वांनी फिक्स धरले होते. त्यानुसार भेटायला येणाऱ्यांचे नियोजन करणेही सुरू झाले होते. भेटायची वेळ काय, त्यासाठीचा पास वगैरे सगळ्या चौकशा झालेल्या होत्या. निशा चे वडील आज सकाळी गावावरून मला भेटण्यासाठी निघालेले होते. आमचे पुढच्या आठवड्यात उटी, म्हैसूर ला जाण्याचे सगळे ट्रेन, फ्लाईट, रूम बुकिंग आधीच झालेले होते, ते आता सगळं रद्द करावे लागणार होते. तिकीट रद्द करण्याचे किती पैसे कट होणार आणि कधीपर्यंत मुदत आहे वगैरे सर्व गोष्टी मी आधीच चेक करून ठेवल्या होत्या. अजून एक आठवडा वेळ होता, त्यामुळे सर्जन डॉक्टरांशी बोलून ऑपरेशन नंतर लगेच एक आठवड्यात हा प्रवास केलेला चालेल का? हे विचारून मगच सगळे तिकीट रद्द करायचे ठरवले होते. डॉक्टर नाहीच म्हणणार हे माहीत होते, पण तरी एवढ्या दिवसांनी पहिल्यांदा कुटुंबासोबत केलेला हा प्लॅन रद्द करायची इच्छा होत नव्हती.
दुपारच्या जेवणानंतर पुन्हा मला सलाईन लावलेले होते. नाना जेवून माझ्याजवळ आलेले होते. मग एक तरुण डॉक्टर आली आणि मला तपासून माझी चौकशी केली. एवढी तरूण सर्जन नक्कीच नसावी असा मी अंदाज काढला. तिलाही मी मला आता काहीच होत नाही हे सांगितले. तिने सुद्धा पोटात तिला हवं तिकडं सगळीकडे दाबून पाहून खात्री करून घेतली आणि काहीच न बोलता ती निघून गेली. आम्ही आता ऑपरेशन ची मानसिकता केलेलीच होती, त्यामुळे आम्हीही काहीच बोललो नाही.
आणि मग थोड्या वेळात ज्यांची कालपासून आम्ही सगळे एवढ्या आतुरतेने वाट पाहात होतो ते मुख्य सर्जन मला पाहायला आले. त्यांचे नाव आम्हाला आधीच आमच्या ऑफिस च्या कन्सल्टंट डॉक्टरांनी माहिती काढून कळवलेले होते व डॉक्टर चांगले आहेत हेही सांगितलेले होते. त्यांचे नाव होते डॉ. राजीव जोशी. साठी उलटलेले, पण एकदम उत्साही सिनियर डॉक्टर. थोड्या वेळापूर्वी मला तपासून गेलेली तरूण डॉक्टर सुद्धा त्यांच्या सोबत होती. ती त्यांची असिस्टंट डॉक्टर आहे हे आम्हाला नंतर कळले. ते आत येतानाच खोलीत उत्साह घेवून आल्यासारखे वाटले. येत असतानाच त्यांनी दुरूनच माझे नाव घेवून मला हाक मारली आणि कशीय आता तब्येत? असं एकदम खणखणीत आणि उत्साही आवाजात विचारलं. मला प्रथमदर्शनीच आत्तापर्यंतच्या सर्व डॉक्टरांपेक्षा हे डॉक्टर वेगळे वाटले. मी जेव्हा सांगितले की - मी एकदम ठणठणीत आहे, मला आता काहीच होत नाही.- त्यावर ते एका दमात बोलले - "मग कशाला करायचे ऑपरेशन? तुला काहीच होत नसेल तर अजिबात करणार नाही आपण. फक्त तू admit झालाय म्हणून थोडेच आपण ऑपरेशन करणार आहोत? अजिबात घाबरु नकोस. गरज नसेल तर आपण ऑपरेशन करणार नाही." त्यांचं एका दमात एवढं सकारात्मक बोलणं ऐकल्यावर तर माझा उत्साह खूपच वाढला. कारण ते एकदम माझ्या मनातलं च बोलत होते. मग त्यांनी त्यांच्या पद्धतीने पोटात सगळीकडे तपासून पाहिले आणि त्यांच्या बाजूला उभी असलेल्या त्यांच्या असिस्टंट डॉक्टर ला बोलले की "काहीच जाणवत नाही, एकदम ओके वाटतंय सगळं." त्यावर ती पण बोलली की - हो सर, मलाही तसंच वाटतंय. - मग माझ्याकडे पाहून ते बोलले - सध्यातरी ऑपरेशन करायची काही गरज वाटत नाही. आपण काही गोळ्यांचा कोर्स देवू. त्यावर सगळं ठीक होईल. पुढे कधी गरज वाटली तर पाहू. - हे ऐकून खरंतर मला खूपच आनंद झाला होता. अगदी ऑपरेशनच्या टेबलवरून परत आल्यासारख्या भावना माझ्या मनात होत्या. पण तरीही मला शंका पण वाटत होती की एवढे इतर डॉक्टर बोलत होते, रिपोर्ट मध्ये पण आले होते, याचा अर्थ जर खरंच ऑपरेशन करायची गरज असेल आणि आपण ते आत्ता केले नाही, तर पुढे अचानक काही त्रास उद्भवू शकतो का? मी माझी ही शंका डॉक्टरांना विचारली आणि सोबतच माझा पुढच्या आठवड्यापासून दहा दिवसांसाठी असलेला सहकुटुंब सहलीचा प्लॅन सुद्धा सांगितला. त्यावर त्यांनी सांगितले की - तुला काहीच झालेले नाही, तू एकदम ठणठणीत आहेस. त्यामुळे असा काहीही विचार करू नकोस. तुला काहीही होणार नाही आणि झालं तर त्यावेळी बघू. त्याचा विचार आत्ताच करू नको. - मग रिपोर्ट मध्ये झालेल्या निदानाचे काय? यावर त्यांचे मत होते की- त्यावेळी आतड्यावर काही कारणांनी सूज आलेली असणार. त्यामुळे ती रिपोर्ट मध्ये दिसली. ती सूज जर ओसरली नसती, तर आपल्याला ऑपरेशन करावेच लागले असते. पण आता ती सूज ओसरलेली आहे, म्हणूनच तुझ्या वेदना पण गेलेल्या आहेत. थोडी फार सूज अजून असेल तर ती गोळ्यांनी कमी होईल. त्यामुळे घाबरायची अजिबात गरज नाही. तुझे सगळे प्लॅन तू आहे तसे चालू ठेव. - त्यांच्या या बोलण्याने माझ्या मनावरील सगळाच ताण एका मिनिटात निघून गेला आणि एकदम खूप मोठ्या काहीतरी संकटातून आपण इतक्या अनपेक्षितपणे अचानक बाहेर आल्याचा अनोखा आनंद मला जाणवत होता. आता माझे पोट विनाकारण कापले जाणार नव्हते, माझे सगळे ठरलेले प्लॅन नियोजनानुसार होणार होते, विनाकारण लाखभर रुपये खर्च करावे लागणार नव्हते.
लगेच सर्वांना फोन करून आम्ही तसे कळवायला सुरू केले. मनोज आज रात्री माझ्या सोबत येणार होता. त्यालाही कळवले. मग तोही भेटून परत गेला. प्रतिक सुद्धा भेट घेवून गेला. निशाचे वडील सकाळीच लवकर निघून दुपारपर्यंत येवून पोचले होते. त्याच हॉस्पिटलच्या सेक्युरिटी मध्ये असलेला संदेशचा मित्र भेटून गेला होता. त्यांनी जाताना आम्हाला सांगितले होते की डिस्चार्ज ची प्रोसेस लवकर सुरू करा, नाहीतर हे उद्या पण उशीर करतील आणि मग विनाकारण बिल वाढवून लावतील. त्यानुसार लगेच मनोज ने काऊंटर वर जावून तशी तयारी करायला सांगितले. माझ्या हाताची सलाईनची सुई अजून काढत नव्हते. पुन्हा इमर्जन्सी मध्ये लागू शकते म्हणून आम्ही डिस्चार्ज पर्यंत काढत नाही असं सांगत होते. त्यांचं नेहमीचं हे बरोबर असलं तरी माझ्याबाबत परिस्थिती वेगळी आहे. मला काही झालंच नाही, तर इमर्जन्सी कसली येणार? हे नर्स ला समजावून सांगून त्यांना ती काढायला लावली. पहिले हॉस्पिटलचे कपडे काढून माझे घरचे कपडे घातले आणि आता मी एकदम उत्साहात डिस्चार्ज ची वाट पाहायला लागलो. डिस्चार्ज सकाळी होणार होता. रात्री माझ्याजवळ कोणीच थांबायची गरज नाही, कारण आता मी एकदम ओके आहे. फक्त घरच्या ऐवजी इथं झोपतोय एवढंच. त्यामुळे उगाच माझ्या सोबत राहणाऱ्याची इथे गैरसोय करून घेण्याची काहीच गरज नाही. हे घरच्यांना पण समजावून सांगितले. मग आता नको असलेल्या गोष्टी घेवून एक बॅग नानांनी घरी नेली. उरलेले सामान आणि हॉस्पिटलच्या फायली सकाळी डिस्चार्ज ची सगळी प्रोसेस करून मी घरी घेवून गेलो. पेशंट स्वतःच सगळी डिस्चार्ज ची प्रोसिजर करतोय असं उदाहरण तिथं सर्वांना दुर्मिळ होतं, त्यामुळे काही क्षणिक गोंधळ होत होते. पण शेवटी सगळं व्यवस्थित पार पाडून मी एकदम जग जिंकल्याच्या उत्साहात चालत घरी गेलो.
आणि आता सध्या आम्ही नुकताच उटी, मैसूर, कूर्ग असा दहा दिवसांचा प्रवास ट्रेन, कॅब, बस, होडी, फ्लाईट अशा सर्व प्रकारच्या वाहनांनी मस्त एन्जॉय करून ९ एप्रिल ला परत आलो आहोत. सगळं एकदम व्यवस्थित आहे, तब्येत एकदम ठणठणीत आहे. काहीच वेगळी पथ्य नाहीत की कोणत्या गोळ्या औषधे नाहीत. जणू काय मला कधी काही झालेच नव्हते.
पण हा चार दिवसांचा प्रवास खूप काही शिकवणारा, विचार आणि चिंतन करायला लावणारा आणि विचारात आणि चिंतेत पाडणारा सुद्धा ठरला हे मात्र नक्की. पुढे कधी शक्य झालं च तर यानिमित्ताने आलेले विचार आणि चिंतन मांडण्याचा प्रयत्न नक्कीच करील.
या दिवसांत सर्वांत जास्त धावपळ आणि मदत झाली ती निशाची आणि किरण व लुंबिनी ची. अशी माणसं या वेळेत सोबत असणं ही गरज तर असतेच, पण आपली मोठी ताकद सुद्धा असते.
तुम्ही सर्वांनी सुद्धा दाखवलेल्या प्रेम, काळजी आणि आपुलकी साठी खूप खूप धन्यवाद.
- सचिन
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा