शेअरिंग केअरिंग - 35 (... आणि ऑपरेशन च्या दाढेतून मी परत आलो..) भाग ४
तिसऱ्या दिवशी सकाळी उठलो तेव्हा तर मी अजून फीट होतो. रात्रभर झोप पण छान झालेली होती. आता फक्त एकच अडचण राहिलेली होती, ती म्हणजे पोट साफ होत नव्हतं आणि पोटात बोटाने appendix च्या जागेवर दाबलं तरच दुखत होतं. आम्ही सकाळी सगळ्यात आधी सर्व जवळचे मित्र आणि कार्यकर्ते जे जे मला भेटायला येणार होते, त्यांना तातडीने कळवायला सुरू केलं की आजचे ऑपरेशन आता उद्या होणार आहे आणि कालच्या ऐवजी आज रात्री मी admit होणार आहे.
मला आणि किरण ला गुढीपाडव्याची सुट्टी होती. पण निशाला सुट्टी नव्हती. त्यामुळे ऑफिस ला जायचं की नाही हे ठरवणं तिला अवघड जात होतं. मी सांगत होतो की - 'मला आता काहीच त्रास होत नाही, त्यामुळे तू जा ऑफिस ला'. पण तिची मनाची तयारी होत नव्हती. अजून रिपोर्ट आलेला नाही, त्यात काय येईल माहीत नाही. त्यामुळे तिला जावं की नाही हे कळत नव्हतं. शेवटी मग दुपारपर्यंत माझी अवस्था कशी आहे हे पाहून मग दुपारी हाफ डे ला जाईल असं तिनं ठरवलं. मग मी माझ्या ऑफिस च्या कन्सल्टंट डॉक्टरांशी आणि आमच्या गावाकडील फॅमिली डॉक्टरांशी पण बोलून घेतलं. दोघांचं ही म्हणणं होतं की रिपोर्ट येईपर्यंत थांबायला हवं. मगच ऑपरेशन चं ठरवायला हवं. आम्हालाही मग आम्ही काल admit झालो नाही ते बरंच झालं वाटलं.
आता आम्ही सगळे रिपोर्ट ची वाट पाहू लागलो. तोपर्यंत माझं जेवण म्हणजे फक्त दही भात च ठरलं होतं. पोट अजूनही साफ होत नव्हतं. अजूनही हसताना, काही उचलताना, झरु पोटावर बसल्यावर थोडं दुखतंय हे जाणवत होतं. पण ते तेवढंच होतं. बाकी वेळेत काहीच त्रास नव्हता. पोट साफ न झाल्यामुळे की सिटी स्कॅन मुळे माहीत नाही, पण आता अंगाला खाज यायला लागली होती.
दुपारी मी झोपल्यावर किरण हॉस्पिटल मध्ये जावून रिपोर्ट घेवून आला. मला उठायला थोडा उशीर झाला. तोपर्यंत निशा आलेली होती. रिपोर्ट मध्ये appendix चे निदान झालेले होते. त्यानुसार आज संध्याकाळी admit व्हायचं ठरलेलं होतं. मी रिपोर्ट डॉक्टरांना पाठवले. त्यांनी सुद्धा 'रिपोर्ट मध्ये आलंय म्हटल्यावर ऑपरेशन करून घेतलेलं बरं' असं सांगितलं. मला मात्र अजूनही वाटत होतं की रिपोर्ट मध्ये आलं असलं तरी मला तर ऑपरेशन करण्याइतके दुखत नाहीये. पण आता डॉक्टरच सांगतायत की 'appendix च्या बाबत रिस्क नको म्हणून' तर मग जावं तर लागणारच असं आम्ही ठरवलं. त्यानुसार आज रात्री पुन्हा साडे अकरा वाजता आम्ही हॉस्पिटल मध्ये जायला निघालो. निशा, नाना, किरण आणि मी. टॅक्सी करून आम्ही हॉस्पिटल ला गेलो. तिथे गेल्यावर समजलं की जनरल चे बेडच शिल्लक नाहीत. स्पेशल सिंगल रूम ची फक्त शिल्लक होती. पण तिचे रेट खूपच जास्त होते. आधीच मला हे ऑपरेशन च करायचं की नाही असं वाटत होतं. तिथं एवढ्या महागाची रूम कशाला घ्यायची? म्हणून आम्ही नाही म्हटलो. मग त्यांनी आमचे नंबर लिहून घेतले आणि जनरल चा बेड खाली झाला की लगेच तुम्हाला कळवू म्हटले. पुन्हा आज सुद्धा रात्री बारा ला आमची सवारी पुन्हा घरी निघाली. आता तर आम्हाला हे सगळं एक मजाक च चालल्यासारखं वाटत होतं. घरी गेल्यावर आम्ही सगळे याच विषयावर बोलत बसलेलो असतानाच एडमिशन काऊंटर वरून कॉल आला की बेड आता खाली झालाय, लगेच या. मग मी आणि किरण लगेच निघालो. असंही तिथं फक्त एकालाच माझ्या सोबत थांबता येणार होते, त्यामुळे निशा आणि नानांना यायला आम्ही नको म्हटलं. जाताना आम्ही चालतच गेलो. कारण आता तर मी एकदमच ओके होतो. उलट चालताना किरण सारखं म्हणायचा की 'बाबा हळू चाल. मलाच भीती वाटते तू एवढा फास्ट चालतोय त्याची.' तिथे पोचल्यावर एडमिशन ची प्रोसेस करून आम्ही admit होण्यासाठी दिलेल्या जनरल बेडकडे निघालो. त्याआधी त्या एडमिशन काऊंटर वर असणाऱ्या व्यक्तीशी बऱ्याच गप्पा झाल्या. त्याच्या कुटुंबातील बरेच सदस्य आमच्या ऑफिस मध्ये आजी/माजी कर्मचारी आहेत/होते हे कळलं. तिथे आम्ही advance तीस हजार रूपये भरले. (यावेळी तिथले upi ॲप नीट काम करत नाही म्हणून कॅश किंवा एटीएम ने पेमेंट करा असं त्यांनी सांगितलं. माझ्याकडे एवढी कॅश नव्हती आणि एटीएम मी सोबत आणलेले नव्हते. अशा वेळी किरण ने लगेच ज्या तत्परतेने त्याचे एटीएम पुढे करून पेमेंट केले तेसुद्धा मला खूपच भावूक करणारे होते.) उद्या ऑपरेशन च्या आधी एक तर पूर्ण रक्कम म्हणजे सव्वा लाख भरावे लागतील किंवा मग ऑफिस कडून mediclaim होणार असेल तर तसे पत्र ऑफिस कडून यावे लागेल त्याशिवाय ऑपरेशन साठी नाव घेणार नाही हे कळलं. हे ऐकून आता उद्याचा पूर्ण दिवस विना ऑपरेशन फक्त admit होवून सलाईन घेत बसावं लागणार हे चित्र आमच्या डोळ्यासमोर यायला लागलं. त्याने ही प्रोसेस लवकर व्हावी म्हणून एकाचा नंबर सुद्धा दिला. त्याला सकाळी नऊ नंतर कॉल करायला सांगितले. तिथून निघताना मी त्याला सहज विचारले की - 'तुम्हाला माझ्याकडे पाहून असं वाटते का की मला appendix असेल आणि उद्या माझं ऑपरेशन करायचं आहे म्हणून.' त्यावर तो म्हटला - 'अजिबात नाही. Appendix चे पेशंट आम्ही नेहमी पाहतो. ते इतके नॉर्मल कधीच नसतात. मला तर हेच कळत नाही की तुम्ही admit का होताय?' आम्ही म्हटलं 'आम्हालाही हाच प्रश्न पडलाय. पण आता डॉक्टर म्हणतायत आणि रिपोर्ट मध्ये सुद्धा आलंय. आमच्या कन्सल्टंट डॉक्टरांना पण विचारलं. त्यांचं ही म्हणणं आहे की रिपोर्ट मध्ये आलंय म्हटल्यावर ऑपरेशन केलेलं बेटर राहील. मग याच्या पुढे आपण अजून काय करणार? तरीही उद्या एकदा डॉक्टरांशी आम्ही आधी याविषयी बोलणारच आहोत.' त्यावर त्याने - उद्या ऑपरेशन च्या आधी तुमचं ऑपरेशन करणारे सर्जन डॉक्टर तुम्हाला तपासायला येतील, त्यावेळी तुम्ही त्यांना हे स्पष्ट सांगा.' असं सुचवलं.
आम्ही तिथून निघताना किरण ने मला पुन्हा आठवण करून दिली की - 'बाबा तू पेशंट आहेस ना, तर पेशंट सारखं वाग ना. तूच पुढे असतोय जास्त. आता तर मला वाटायला लागलंय की हे लोकं तुला सोडून मलाच admit करणार नक्की.'
असंच हसत गप्पा मारत आम्ही जनरल वार्ड च्या रिसेप्शन काऊंटर जवळ आलो. तिथल्या काऊंटर वरच्या सुंदर नर्स, डॉक्टर आणि रिसेप्शनिस्ट पाहून माझं उरलंसुरलं दुखणं पण पळून गेलं. पुढे त्यांच्याशी बोलताना कळलं की त्यांच्यातील जवळपास सर्व स्टाफ हा साऊथ इंडियन होता. त्यामुळे तोडकी मोडकी हिंदी काहीजणींना येत होती आणि काही तर ओन्ली इंग्लिश च म्हणत होत्या. नावाला एक डॉक्टर आणि काही अपवादात्मक स्टाफ मराठी बोलणारा होता. त्यांना आम्ही उद्या ऑपरेशन साठी admit व्हायला आल्याचं सांगितल्यावर त्यांनी मला विचारले - पेशंट कहाॅं है? मी म्हटलं - मैं ही हुं. मग त्यांनी डिटेल्स लिहून घेतले आणि मला आत बेडवर झोपायला सांगितले. तिथली visiting डॉक्टर असणारी मुलगी माझा प्राथमिक रिपोर्ट घ्यायला आली. तिला सगळं सांगताना मी जेव्हा म्हटलं की 'मला आत्ता काहीच होत नाहीये.' त्यावर ती बोलली की 'तुम्ही admit का होताय मग?' पुन्हा तिला सगळं सांगितल्यावर ती बोलली की - तुम्ही बेड बुक करून पुन्हा घरी जायला हवं होतं. सकाळी परत यायचं. - आम्हाला हे ऐकून भारीच वाटलं. पण हा पर्याय आम्हाला माहीतच नव्हता म्हटल्यावर मग ती रिसेप्शन वर बोलून कळवते म्हटली. आम्ही पण तिच्यासोबत गेलो. रिसेप्शन वाल्यांनी कुणाला तरी फोन लावला आणि ते म्हटले की - असं नाही करता येणार. आता थेट डिस्चार्ज झाल्यावरच पेशंट बाहेर पडेल. आमचा उत्साह पुन्हा मावळला.
तरीही त्या डॉक्टरांना मी पुन्हा म्हटलं की डॉक्टर मला खरंच ऑपरेशन करायची गरज आहे का? त्यावर 'हे तुम्हाला तुम्ही इथे पहिल्यांदा ज्या डॉक्टरांकडे कन्सल्ट केलंत, तेच सांगू शकतील. मी त्यांना आता फोन करणारच आहे, तेव्हा विचारून सांगते.' असं ती म्हटली. आम्हाला पुन्हा जरा उत्साह आला. ही डॉक्टर पण आम्हाला खूपच भली माणूस वाटायला लागली. तिने मग आमच्यासमोर च त्या डॉक्टरांना फोन लावला आणि सांगितले की - तुमचे पेशंट उद्या appendix च्या ऑपरेशन साठी आत्ता admit व्हायला आले आहेत, पण ते सध्या एकदम कंफर्ट आहेत. त्यांना काहीच त्रास होत नाही. - त्यावर ते काय बोलले माहीत नाही; पण फोनवर काही औषधे सांगायला लागले आणि या डॉक्टरांनी ते सगळं लिहून घेतलं. फोन ठेवल्यावर त्या म्हटल्या की - डॉक्टरांनी सांगितलय की admit करून घ्या आणि रूटीन प्रोसेस सुरू करा. (डॉक्टर फुल झोपेत होते हेही त्यांच्या बोलण्यातून कळलं.) - मग आता काय? असं मी विचारल्यावर आधी तर त्या बिचारीला माझी अवस्था आणि प्रश्न विचारण्याचा टोन पाहून हसू आवरेना. 'आता डॉक्टरांनी प्रोसेस सुरू करा असं सांगितलंय म्हटल्यावर आम्ही तरी पुढे काय करू शकणार?' असं म्हणून तिने तिची हतबलता व्यक्त केली. आता उद्या दुपारी मुख्य सर्जन तपासायला येतील, त्यावेळी तेच काय ते फायनल ठरवतील असं कळलं.
मग आता काय? 'आलेया भोगासी असावे सादर' या नियमाप्रमाणे आम्ही गपचीप पुन्हा आत जावून बसलो. पण आता उद्या ऑपरेशन तर नक्कीच होणार नाही याची खात्री आम्हाला पटली होती. मात्र तरीही विनाकारण रात्रभर आपल्याला सलाईन लावून ठेवणार हे मला अजून अडचणीचे वाटत होते. थोड्या वेळात खरंच सलाईन च्या सर्व साहित्याचा ट्रे घेवून एक नर्स आली. मी त्यांना विनवणीच्या सुरात म्हटलं - सिस्टर खरंच तुम्हाला वाटते का आत्ता सलाईन ची गरज आहे म्हणून? असंही तुम्ही उद्या तर ऑपरेशन करणारच नाही, मग उद्या दिवसभर ही प्रोसेस करा ना. आज रात्री तरी मला नीट झोपू द्या. - आणि त्यावर ती नर्स बिचारी खरंच परत सगळं मागे घेवून गेली. हे मला भारी वाटलं. म्हणजे आज रात्री पुरतं तरी आपण वाचलो असा फील आला. हे सगळं होईपर्यंत जवळपास रात्रीचे अडीच वाजून गेले असतील. जनरल वार्ड असल्यामुळे किरण ला झोपायला तिथे नीट जागा पण नव्हती. त्यामुळे मी त्याला आग्रह करत होतो की - आता तू घरी जा झोपायला. मला असंही आता सलाईन पण लावलेले नाही. त्यामुळे फक्त इथं झोपायचे आहे. तुला तर उद्या ऑफिस ला पण जायचंय तर तुझी झोप तरी व्हायला हवी. - पण तो काही ऐकत नव्हता. मी इथेच खुर्चीत मूवी पाहत बसतो असं तो म्हणत होता. मग थोडा वेळ आम्ही बोलत बसलो. खरंच ऑपरेशन करायला हवं की नको हे आम्हाला पण नीट कळत नव्हतं. अर्थात ते ठरवणं आता आमच्या हातात राहिलेलं नव्हतं हेही कळत होतं. पण कदाचित ऑपरेशन केलं तर पुन्हा कधी अचानक appendix चा त्रास होवून इमर्जन्सी वेळ येणार नाही याविषयी आपण निर्धास्त तरी राहू असंही वाटत होतं. शेवटी उद्या मुख्य सर्जन तपासायला येतील त्यावेळी ते जे काय म्हणतील ते आता फार आपलं डोकं न चालवता करून टाकायचं असं आम्ही ठरवलं आणि मी झोपलो.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा