शेअरिंग केअरिंग - 34 (...आणि ऑपरेशन च्या दाढेतून मी परत आलो..) भाग ३

मग आता किमान आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना तरी हे माहिती असायला हवं म्हणून मी मेसेजवर कळवलं. त्याधीच ज्यांनी काही कारणासाठी स्वतःहून मला फोन केले होते, अशा काही मित्रांना आणि माझ्या ऑफिस मध्ये निशा कडून समजलेले होते. त्यांचे फोन सुरू होतेच. किरण आज रात्रीपासूनच माझ्या सोबत राहायला येतो म्हणत होता. त्याचे ऑफिस दादर ला. तो राहतो टिटवाळ्याला. त्यामुळे त्याला आम्ही नको म्हणत असतानाही 'मी घरी जावून परत येतोच' असा त्याचा आग्रह होता. तुषार पण माझ्या सोबत राहायला येतो म्हणत होता. नंदना घरी झरा जवळ राहायला येते म्हणत होती. दुसऱ्या दिवशी गुढीपाडव्याची सुट्टी असूनही प्रतिक मीरा रोड वरून येणार होता. 'मला हॉस्पिटल चा अनुभव असल्याने माझी मदत होईल, तुमची धावपळ कमी होईल' असं त्याला वाटत होतं. 'सुट्टीच्या दिवशी येण्यापेक्षा परवा ऑफिस सुरू झाल्यावर ये' असं आम्ही सांगत होतो. पण तो उद्याच येणार होता. मनोज, यश आणि अनेकजण उद्या सकाळी, दिवसभरात येणार आहेत असं कळलं. निशा ला तर हे सगळं पाहून भरून येत होतं. आपली हक्काची अशी किती माणसं ही वेळेवर लगेच उभी राहतायत याचं आम्हाला खूप नवल आणि एक वेगळा आनंद व अभिमान पण वाटत होता.
    काल हॉस्पिटलमध्ये इस्टिमेट काऊंटर वर असणाऱ्या ताईंनी आम्हाला सांगून ठेवलं होतं की जर तुम्ही संध्याकाळी admit होणार असाल तर शक्यतो रात्री अकरा नंतर या. म्हणजे थोडी प्रोसेस होईपर्यंत वेळ जाईल आणि तुम्हाला काऊंटर वर सांगून रात्री बारा नंतरचे admission दाखवता येईल. म्हणजे आजच्या एक दिवसाचा चार्ज तुम्हाला लागणार नाही. ती सूचना लक्षात ठेवून आम्ही रात्री अकरा नंतरच जायचे ठरवले होते. तोपर्यंत किरण पण आला होता. मग झरा ला आई नानांकडे सोपवून निशा, किरण आणि मी हॉस्पिटल मध्ये जायला निघालो. निशा ने सर्व बॅग व्यवस्थित भरून तयार ठेवलेलीच होती. आई, नाना आणि झरा पण खाली निरोप द्यायला आले होते. हे सगळं पाहून कुठेतरी लाँग जर्नी ला चाललो असल्याचा फील मला येत होता. नानांनी टॅक्सी बोलवून आणली आणि आम्ही तिघे निघालो. माझं सध्या तरी तसं फारसं काहीच दुखत नव्हतं. फक्त हसताना, खोकताना, वाकताना वगैरे पोटात एका जागेवर दुखायचं तेवढंच. त्यामुळे टॅक्सी तून जाताना माझ्या मनात एकच प्रश्न सतत येत होता की - माझे सध्या फार दुखत नाही, रिपोर्ट सुद्धा अजून आलेले नाहीत आणि आम्ही फक्त डॉक्टरांच्या सांगण्यानुसार ऑपरेशन करण्यासाठी भरती होतोय. - यावर बऱ्याच उलट्या सुलट्या सगळ्या बाजूंनी विचार करत आम्ही एकदम हसत खिदळत गप्पा मारतच चाललो होतो. हॉस्पिटल च्या गेटवर गेल्यावर 'आम्ही admit होण्यासाठी आलोय' असं सांगितलं तर सेक्युरिटी ने आधी आमच्याकडं पाहून - पेशंट कोण आहे? - असं विचारलं. मग माझ्याकडे बोट दाखवल्यावर काय झालंय? असं त्याने विचारलं. त्यावर मग - appendix आहे, उद्या ऑपरेशन करायचं आहे, आज डॉक्टरांनी admit व्हायला सांगितलं आहे - असं सविस्तर त्याला सांगितल्यावर त्याने इमर्जन्सी वार्ड मध्ये जायला सांगितलं. तिकडे जाताना मला निशा आणि किरण ने बजावून ठेवलं की - बाबा, जरा तरी पेशंट असल्यासारखं वाग. आपण इमर्जन्सी मध्ये चाललोय, तिथं वाटायला तरी पाहिजे की तू आजारी आहेस म्हणून. नाहीतर चुकून आमच्यातील एखाद्याला पेशंट म्हणून admit करायचे हे लोकं. - यावर हसत हसत च आम्ही इमर्जन्सी वार्ड मध्ये पोचलो. तिथे गेल्यावर पुन्हा सेम प्रश्न. - पेशंट कोण आहे? काय झालंय? आणि इथ कशाला आलाय?- त्यांना सगळं सांगून झाल्यावर मग त्यांनी admission काऊंटर ला फोन केला आणि तिथे जावूनच एडमिशन होईल असं सांगितलं. 'आम्हाला बारा नंतरची वेळ टाकून हवीय एडमिशन वर' असं मी सांगितल्यावर तिथल्या एका भल्या डॉक्टरांनी आम्हाला 'असं असेल तर तुम्ही बारा वाजताच जा. नाहीतर एक मिनिट जरी अलीकडे झाला, तरी उगाच तुम्हाला एक दिवसाचा चार्ज लागेल' - असं सांगितलं. मग एडमिशन साठी गेलेल्या निशा ला आम्ही परत मागे बोलवले. डॉक्टरांनी 'तोपर्यंत पेशंट ला तिथे बेडवर झोपवा' असे सांगितले. झोपावे लागेल अशी अवस्था तर माझी अजिबातच नव्हती. त्यामुळे किरण आणि मी बेडवर बसलो आणि निशा तिथेच खुर्चीत बसली. आमचं हसणं, खिदळणं चालूच होतं. बारा वाजता जेव्हा आम्ही तिथून जायला निघालो तेव्हा तिथे आलेली नर्स बाजूच्या डॉक्टरांना विचारत होती की - यातलं पेशंट नेमकं कोण आहे?
Admition काऊंटर ला जाताना मध्येच आमच्या कॉलनीतील बरेच जण बाहेर जमा झालेले दिसले. त्यातले अनेकजण ओळखीचे, मित्र होते. म्हणून त्यांच्याशी बोलायला थांबलो. कॉलनीतील एकाची डेथ झाल्याचे समजलं. काल रात्री दीड वाजता आम्ही नायर वरून घरी जाताना हेच मित्र आम्हाला कॉलनीत भेटले होते, त्यावेळी त्यांनी यांना admit केल्याचे आम्हाला सांगितले होते. ते आज गेले होते. मग त्यांनी माझ्या आजारपणाची चौकशी केल्यावर मी त्यांना सध्या माझी तब्येत बरी असून माझ्या मनातील शंका पण सांगितली. मग त्यांनी आमच्या ऑफिस च्या कन्सल्टंट डॉक्टरांशी आधी बोलून घेण्याचा आणि ते स्वतः या हॉस्पिटलच्या पॅनल वर आहेत अशी माहिती देवून त्यांच्याकडून उद्या सर्जन कोण असणार आहे वगैरे चौकशी करून घेण्याचा सल्ला दिला.
     मग आम्ही एडमिशन काऊंटर ला गेलो. तिथे गेल्यावर कळलं की डॉक्टरांनी आमचं नाव उद्याच्या ऑपरेशन च्या यादीत टाकलेलं च नाहीये. त्यांचं म्हणणं होतं की admit झाल्याशिवाय तुमचं नाव ऑपरेशन च्या यादीत घेत नाहीत. आज admit झालात तर कदाचित उद्या सकाळी पण तुमचं नाव घेवू शकतात, कारण उद्या ऑपरेशन चे पेशंट कमी आहेत. पण आमचा मूळ प्रश्न असा होता की ऑपरेशन करायची खरंच गरज आहे का? की रिपोर्ट येईपर्यंत थांबून मग ठरवायचं? तसं डॉक्टरांशी बोलून मग ठरवायचं होतं. पण डॉक्टरांशी आम्ही बोलू शकत नाहीत, आमच्याकडे त्यांचा नंबर पण नाही असे त्यांनी सांगितले. आम्हाला शंका होती की उद्या रिपोर्ट मध्ये जर appendix चे निदान झालेच नाही आणि त्याआधीच यांनी माझे ऑपरेशन केलेले असेल तर? कारण appendix चे ऑपरेशन करायला आलेला पेशंट इतका फीट तर नक्कीच नसतो हे मला चांगलं माहिती होतं. तो अक्षरशः पोट धरून लोळायचा बाकी असतो (जसा मी पहिल्या दिवशी होतो), पण माझी अवस्था तर आता एकदम नॉर्मल होती.
त्यावर मग निशा ने मघाच्या इमर्जन्सी मधल्या त्या भल्या डॉक्टरांना एकदा विचारून यायचे ठरवले. आम्ही दोघे तिथेच थांबलो. थोड्या वेळाने निशा आली तेव्हा ती म्हणाली की - डॉक्टरांचे म्हणणे आहे की तुम्हाला दुखत नसेल तर कशाला होता admit? आणि त्यांनी उद्याच्या व्हीझिटिंग डॉक्टरांची यादी चेक केली तर त्यांच्या लक्षात आले की उद्या गुढीपाडव्याची सरकारी सुट्टी असल्याने बाहेरचे सर्जन कुणी येणारच नाहीत. त्यामुळे असंही तुमचं ऑपरेशन उद्या तर होणारच नाही. शिवाय तुमचं काही दुखत पण नाही, तर मग कशाला उगाच admit होता? - हे ऐकून आम्हाला खूप भारी वाटलं. मला तर माझे ऑपरेशन किमान एक दिवस तरी पुढे ढकलल्याचा भारीच आनंद होत होता. त्यामुळे या उत्साहात सगळ्यात आधी मीच बॅगा उचलून जायला निघालो. निशा टॅक्सी शोधत होती, पण मी म्हटलं चालतच जावू. मग आम्ही चालत निघालो. वाटेत एक मेडिकल प्लस किराणा स्टोअर लागते, तिथे आम्ही आइस्क्रीम खायला थांबलो. आइस्क्रीम खाता खाता सहज तिथल्या सेक्युरीटी काकांना आम्ही आमच्या मनातील शंका विचारली की - आमच्याकडे पाहून आमच्यापैकी पेशंट कोण असेल असं तुम्हाला वाटतं बरं? - त्यावर त्यांनी किरण कडे बोट केले आणि आम्ही खदाखदा हसायला लागलो. आता तर हे ऑपरेशन म्हणजे आपली कुणीतरी मजाकच करतंय असं मला वाटायला लागलं होतं. तिथून घरी जाताना कॉलनीत पुन्हा ते मित्र भेटले आणि त्यांनी चौकशी केली. त्यांना सर्व हकीकत सांगून आम्ही घरी पोचलो. झरा झोपली होती. मला परत आलेले पाहून आई नाना ना पण आश्चर्य वाटले. त्यांनाही सगळी हकीकत सांगून आता आपल्याला उद्या रिपोर्ट आल्यानंतरच admit होण्याची आणि तोपर्यंत इतरही काही डॉक्टरांशी बोलण्याची संधी आहे असं सकारात्मकतेने आपण याकडे बघू असं ठरवलं.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध