शेअरिंग केअरिंग - 33 (...आणि ऑपरेशन च्या दाढेतून मी परत आलो..) भाग २

घरी आल्या आल्या लगेच मी झोपलो. पण थोड्याच वेळात पोटातील आग खूपच वाढली. रात्रभर झोप आली नाही. पोटाबरोबर पाठ, कंबर सुद्धा दुखायला लागली. पहाटे पहाटे वेदनाशामक अरिथरीन क्रीम लावली. तिच्यामुळे पाठ, कंबर इथल्या वेदना पूर्णच गायब झाल्या. पोटातील वेदना पण कमी झाल्या. मग थोडा वेळ कशीबशी बसूनच झोप घेतली. सकाळी उठून मात्र मग बाजूच्या मोठ्या खाजगी दवाखान्यात जायचा निर्णय घेतला. पोटदुखी पुन्हा थोडी वाढलेली होती. चालण्यासारखी अवस्था नव्हती. म्हणून निशा ने कॅब बुक केली. एक किलोमीटर पेक्षा कमी अंतर असलेल्या हॉस्पिटल पर्यंत जायला कॅब ने अडीचशे रुपये घेतले. निशा, मी व नाना (माझे वडील) हॉस्पिटल मध्ये गेलो. तिथे डॉक्टर यायला अजून पाऊण तास वेळ होता. तेवढा वेळ निशा ने मला स्ट्रेचर वर झोपण्याची परवानगी घेवून झोपवले. तिथे लगेच मला झोप लागली आणि अर्धा तास गाढ झोप झाल्यानंतर जेव्हा मी उठलो तेव्हा पोटदुखी एकदम पळून गेलेली होती. फक्त पोटात दाबले तर मात्र दुखत होते. आम्ही डॉक्टरांकडे गेलो. त्यांनी सर्व लक्षणे व हिस्ट्री विचारली. पोटात दाबून पाहिले. पोटात दाबल्यावर दुखत होते. सर्व गोष्टी पाहून appendix असावं असा अंदाज सांगितला. पण तरीही अंदाजे काही न करता आपण सिटी स्कॅन करूयात असं त्यांनी सांगितलं. मग सिटी स्कॅन करायला गेलो. आता मी बऱ्यापैकी फ्रेश झालेलो होतो. व्यवस्थित चालता येत होते. सिटी स्कॅन ला गेल्यावर आधी ब्लड टेस्ट कराव्या लागतील असं सांगितलं. त्यावर निशा ने त्याच हॉस्पिटल मध्ये डिसेंबर मध्ये आम्ही केलेल्या हेल्थ चेक अप ची फाईल दाखवली. त्यात ब्लड टेस्ट पण होत्या. पण तरी दोन महिन्याच्या आतल्या हव्यात असं त्यांचं म्हणणं. त्यावर 'एक तर महिना जास्त झालाय फक्त' असं निशा ने त्यांना जरा ठाम सांगितल्यावर त्यांनी कुणाशी तरी बोलून 'चालेल' असं सांगितलं आणि ते करायचं वाचलं.
मग मला सिटी स्कॅन करायला नेलं. ते इतकं भलं मोठं मशीन मी आयुष्यात पहिल्यांदा बघत होतो. मला स्ट्रेचर वर झोपवून हातात कथेट्रर (इंजेक्शन किंवा सलाईन सोडण्यासाठी शिरेत टोचून ठेवतात ती सुई) लावले गेले. मग त्या भल्या मोठ्या मशीन मध्ये मला घातले गेले आणि मशीन च्या आवाजाकडे लक्ष द्यायला सांगितले. 'दीर्घ श्वास घ्या, श्वास कोंडून धरा, श्वास सोडा' चे दोन तीन प्रयोग झाले. मग तिथल्या नर्स ने ग्लास मध्ये पाणी आणून माझ्या तोंडात ओतले आणि 'आता तुम्हाला जरा थोडं गरम झाल्यासारखं वाटेल, घाबरु नका' असं म्हणत हातात इंजेक्शन सोडलं. परत मला मशीन मध्ये घुसवण्यात आलं आणि आता खरंच सगळं अंग गरम झालं. त्या मशीनचे बहुतेक कॅमेरे वरून माझ्या पोटावर गोलाकार फिरत होते. बराच वेळ मशीनच्या वरील सूचना रिपीट करून झाल्यावर मग फायनली मला बाहेर काढले. काहीही म्हणा, पण आधी एवढे पैसे पाहून महाग वाटलेली ही टेस्ट अनुभवल्यावर मात्र वेगळं काहीतरी आणि पैसे वसूल वाटलं. बाहेर आल्यावर रिपोर्ट साठी विचारलं तर दुसऱ्या दिवशी रिपोर्ट मिळणार असे कळलं. मग पुन्हा डॉक्टरांना भेटायला गेलो. त्यांनी प्राथमिक सर्व लक्षणांवरून व सिटी स्कॅन केलेल्या डॉक्टरांशी बोलून - appendix च आहे. आपण लगेच ऑपरेशन करून टाकूयात. - असं सांगितलं. आम्ही म्हटलं - पण अजून रिपोर्ट तर आले नाहीत. त्यावर डॉक्टर बोलले की रिपोर्ट येईपर्यंत थांबायला नको. दुखत आहे तर आपण लगेच ऑपरेशन करून टाकू. आम्ही म्हटलं - आता नाही फार दुखत. रिपोर्ट आल्यावर पण चालू शकेल. त्यावर त्यांचं म्हणणं की - उद्या रिपोर्ट येणार आणि मग परवा ऑपरेशन करावं लागणार. एवढा वेळ घालवायची गरज नाही. तरी तुम्ही ठरवा. मग आम्ही गोंधळात पडलो. तरी - जरा घरी जावून घरची सोय लावून संध्याकाळी admit व्हायला परत येतो - असं म्हटलं आणि तिथून निघालो. निघताना या ऑपरेशन चा खर्च किती होईल हे विचारायला आम्ही रिसेप्शन ला गेलो. त्यांनी इस्टिमेट काऊंटर ला जायला सांगितले. तिथे जावून विचारल्यावर त्यांनी सांगितलेले रेट ऐकून आम्हाला धक्काच बसला. साध्या जनरल बेडचे तीन दिवसांचे पॅकेज होणार होते सव्वा लाख रूपये. बाकी पुढच्या क्लास चा तर विचारच करायला नको. ते रेट ऐकूनच माझे उरलेसुरले दुखणे पण पळून गेले होते.
पण तरी आता ॲपेंडिक्स हे असे दुखणे आहे की ते दुखायला लागले तर ऑपरेशन करण्याशिवाय पर्याय नसतो हे माहीत असल्याने अधिक काळजीत पडल्यासारखे झाले. अर्थात यातले बहुतांश पैसे ऑफिस कडून मिळतील याची खात्री होतीच; पण तरीही इतकं छोटं ऑपरेशन इतकं महाग असू शकतं याचाच विचार जास्त सतावत होता. माझ्या जागी जर कुणी इतर सामान्य व्यक्ती असता, ज्याला असं ऑफिस कडून काही मिळणार नसतं, तर त्याला हे कसं परवडू शकलं असतं? मग त्याने अशा चांगल्या सोयी सुविधा असणाऱ्या खाजगी दवाखान्यात जावूच नये का? फक्त सरकारी दवाखान्यात जावून तिथली परवड, हाल सहन करावे? याच विचारात आम्ही तिथून निघालो. निघताना ऑफिस मध्ये फोन करून घेतले. यातले बऱ्यापैकी पैसे ऑफिस कडून मिळू शकतील, तरी काही वरचे स्वतः भरावे लागतील असं लक्षात आलं.
येताना अगदी चालत घरी येण्याइतपत मी फीट होतो. माझ्यापेक्षा वाईट अवस्था उलट या धावपळीत निशा ची झालेली होती. मग साधारण दुपारी दोन च्या सुमारास आम्ही घरी आलो.
घरी आल्यावर आई नानांना ऑपरेशन बद्दल आणि इथल्या येणाऱ्या खर्चाबाबत पण सांगितले. मग घरातील वातावरण एकदम बदलून गेले. सगळेजण आता ऑपरेशन ची प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष तयारी करायला लागले. आपण पुण्यात किंवा गावाकडे जावून हे ऑपरेशन करायचे का? किंवा इथे दुसऱ्या कोणत्या हॉस्पिटल मध्ये चौकशी करायची का? अशा सगळ्या चर्चा सुरू झाल्या. मी ऑफिस मधून डायरेक्ट मेडीक्लेम करायचे की आधी स्वतः पैसे भरून मग नंतर बिले द्यायची ही चौकशी सुरू केली. आधीच मेडीक्लेम सांगितले तर बिलांचे आकडे कसे भरमसाट वाढतात याची मला माहिती व अनुभव सुद्धा होताच. त्यापेक्षा आधी आपण भरावेत आणि मग नंतर बिल द्यावे असे ठरवले. शिवाय पुण्यात, गावाकडे किंवा इतर कुठल्या ठिकाणी ऑपरेशन करायचे झाल्यास करावी लागणारी धावपळ, प्रवास, तिथली व्यवस्था, तिथल्या पुन्हा नव्याने प्रोसेस, कदाचित त्यांनी पुन्हा तपासण्या करायला सांगितल्या तर तो नाहक खर्च आणि वेळ आणि या सगळ्यात पुन्हा छोट्या झरा चे पण होवू शकणारे हाल अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही शेवटी संध्याकाळी याच हॉस्पिटल मध्ये admit होण्याचा निर्णय घेतला.

(.. पुढचे अनुभव मजेशीर आणि तसेच विचार करायला लावणारे पण आहेत..)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध