शेअरिंग केअरिंग - 32 (.. आणि ऑपरेशन च्या दाढेतून मी परत आलो..)
२० मार्च रोजी (सोमवारी) दुपारच्या जेवणानंतर माझ्या पोटात हलकीशी गडबड जाणवायला लागली. कदाचित दुपारी खाल्लेल्या अंडा मसाल्यामुळे होत असावे असे वाटले. संध्याकाळी ऑफिस मधून घरी येताना ही गडबड पोटदुखी सारखी वाटू लागली. कदाचित मागील दोन दिवसांतील दगदग, प्रवास, झोप नाही, खाणं पिणं व्यवस्थित नाही म्हणून ॲसिडीटी झाली असावी असं वाटलं. या सर्व गोष्टी नेहमी परिचयाच्या होत्या. त्यामुळे 'घरी जावून आराम केला, एक मस्त झोप घेतली आणि आज रात्रीचे जेवण हलके घेतले की सगळं बरं होणार' या विचारात घरी पोचलो. घरी जाईपर्यंत हे प्रमाण जरा अधिक वाढले होते. मागील दोन दिवसांतील वरील सर्व गोष्टींमुळे पित्त झालेले दिसतंय आणि आता जरा उलटी झाली, पोट साफ झाले की हे पित्त बाहेर पडेल आणि मग (नेहमीप्रमाणेच) आराम पडेल असं वाटलं. पोट काय साफ झाले नाही, पण उलट्या झाल्या. तरीही फरक काहीच वाटेना. उलट पोटातील जळजळ अधिक वाढत चालली. आता हे नेहमीच्या अनुभवा पलीकडे जायला लागलं. एव्हाना निशा घरी आलेली होती. तिने पाहिलं तर अंग थोडंसं तापलेलं होतं. मी झोपायचा प्रयत्न करत होतो. पण झोप येत नव्हती. अशात एक महत्त्वाची ऑनलाईन मीटिंग होती. तिला जॉईन झालो. कदाचित त्यामध्ये हे दुखणं थोडं विसरून जाईल असं वाटलं. पण पुन्हा उलट्या झाल्या. पोट मात्र अजूनही साफ होत नव्हते. थोड्या वेळातच आता ही पोटदुखी मला असह्य व्हायला लागली. मग मला नुकतेच केलेले हेल्थ चेक अप आठवले. त्यात सांगितलेली appendix ची शक्यता आठवली. मी लगेच appendix ची लक्षणे शोधून काढली. त्यात दिलेली जवळपास सर्व लक्षणं मला दिसत होती. आधी दवाखान्यातील कामाचा अनुभव असल्याने आपल्याला हे फार वाढायच्या आत हॉस्पिटल मध्ये जायला हवं असं मला वाटायला लागलं होतं. तोपर्यंत घरगुती उपाय चालूच होते. घरी आल्या आल्या आईने सोडा आणि भरपूर ओवा खावू घातलेला होता. नाही नाही म्हणेपर्यंत निशा ने इनो चा ग्लास तोंडात ओतलेला होता. लिंबू आणि काय काय घालून केलेला काढा पिवून झालेला होता. पण यातल्या कशालाच ही पोटदुखी बधत नव्हती.
मग आजूबाजूच्या खाजगी डॉक्टरांचा ऑनलाईन शोध सुरू झाला. खरंतर अशा कोणत्या अनोळखी खाजगी डॉक्टरांकडे जाण्याची मला प्रचंड भीती वाटते. (याविषयी जमलं तर स्वतंत्र लिहील.) पण आता वेळच अशी आली होती की ही रिस्क घेण्याशिवाय काही पर्याय दिसत नव्हता. इच्छा नसताना काही पर्याय शोधले. त्यातील जवळपास सर्व दवाखाने रात्री १० ते ११ या दरम्यान बंद होणारे दिसत होते. दहा तर वाजलेलेच होते. लगेच निघण्याची गरज होती. पण तशी हिम्मत आणि ताकद नव्हती. मग शेवटी रात्री ११ नंतर एका मैत्रिणीशी बोलून बाजूलाच असलेल्या ती काम करत असलेल्या सरकारी दवाखान्यात जायचे ठरवले.
माझी चालण्याची पण फार स्थिती नव्हती. पण इतक्या जवळ कोणती टॅक्सी सुद्धा यायला तयार होणार नाही म्हणून मी आणि निशा चालतच निघालो. तिथे पोचल्यावर मैत्रिणीने सांगितल्याप्रमाणे इमर्जन्सी वार्ड ला गेलो तर तिथे भली मोठी रांग. ती पाहून मी तिथे जवळच खुर्ची पाहून समोरच्या टेबलावर डोके टेकून बसलो. तिथल्या वॉर्डन ला विनंती करून पण ती आत सोडेना आणि त्या मैत्रिणीचा फोन पण घेईना. नेमकी याच वेळी ही मैत्रीण पण तिच्या गावी गेलेली होती. तरी तिथून एवढ्या रात्री फोनवर ती आमच्या सोबत होती हा मोठा आधार होता. तिने मग दुसऱ्या डॉक्टरांना फोन करून बाजूच्या वॉर्ड मध्ये आम्हाला जायला सांगितले. तिथे गेल्यावर किमान गर्दी नाही हे पाहून आम्हाला जरा हायसे वाटले. मग मैत्रिणीने नाव सांगितलेल्या डॉक्टरांना भेटलो. त्यांनी आधी निशा ला केस पेपर आणायला पाठवले. ते घेवून आल्यावर मग परत इंजेक्शन आणायला पाठवले. एवढ्यात बरी गोष्ट फक्त एकच होती की त्यांनी किमान मला एका बेडवर झोपायला जागा दिली. निशा इंजेक्शन घेवून आल्यावर तिथले एक डॉक्टर मला तपासायला आले. त्यांनी काय होतंय वगैरे चौकशी करत करत पोटात बोटांनी दाबून दाबून तपासून घेतले. त्यांच्या त्या दोन बोटं पोटात खुपसून जोरजोरात दाबण्याने माझे मूळ दुखणे बाजूलाच, पण हेच नवीन दुखणं सुरू होईल की काय असं वाटायचं. बरं असं एक नाही तर तीन डॉक्टरांनी रिपीट केले. आता तर मला खात्रीच पटली की हे जिथे दुखतंय का म्हणून तपासायला एवढं दाबतायत, तिथं आता दुखत नसलं तरी यानंतर मात्र दुखायला लागण्याची शक्यता दाट आहे.
मग एका नर्सने माझ्या हातात कॅथेटर घालून त्यातून ते इंजेक्शन दिले. थोडा वेळ आराम करायला सांगितला. काहीच फरक पडेना म्हटल्यावर मग आम्हाला एक्स रे करून यायला सांगितले. एक्स रे सेंटर दवाखान्याच्या दुसऱ्या टोकाला. एवढं लांब चालत जाणं मला खूपच कठीण दिसत होतं. मग शेवटी बाजूला एक जुनी चाकाची, बिना ब्रेक आणि हॅण्डल ची खुर्ची निशा ला दिसली. त्यावर तिने मला बसवलं आणि कसंबसं ढकलत तिथपर्यंत घेवून गेली. तिथे गेल्यावर कळलं की ते सेंटर आता बंद झालंय आणि त्यांनी पुन्हा दुसऱ्या टोकाला जायला सांगितले. ते ऐकून मी तर तिथेच पोट धरून बसलो. मग शेवटी माझी अवस्था पाहून तिथल्या एका भल्या कर्मचाऱ्याला दया आली आणि त्याने आत यायला सांगितले. एक्स रे काढून परत डॉक्टरांकडे गेलो. त्यांनी ते पाहून हे तर नॉर्मल आहे, यात काहीच नाही असे सांगितले. मग माझ्या शी च्या जागेतून बोट घालून तपासले गेले. डॉक्टरांच्या मते सगळं नॉर्मल होतं. पण माझ्या तर पोटातील दुखणं काय थांबत नव्हतं. मी डॉक्टरांना म्हटलं कदाचित उलट्या केल्यावर ॲसिडीटी असेल तर कमी होईल. उलट्या करून झाल्यावर जरा कमी झाल्यासारखं जाणवलं. मग याचा अर्थ ॲसिडीटी च असावी म्हणून डॉक्टरांनी काही गोळ्या व औषधे लिहून दिली आणि घरी जायला सांगितले. काही त्रास झालाच तर परत या असं सांगून त्यांनी आम्हाला निरोप दिला. रात्री दीड वाजता आम्ही चालत घरी आलो.
(.... गोष्ट अजून संपत नाही)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा