'सेक्स' वर बोलू काही - पर्व 4 (भाग 2 - मुक्त लैंगिकते विषयी बोलताना...)
लैंगिकतेच्या मुद्द्यावर अजूनही जिथे सगळीकडे चुप्पी चे वातावरण आहे, तिथे मुक्त लैंगिकते बाबत परिस्थिती अधिक बिकट असणे साहजिकच आहे. आपल्या समाजात जिथे अजूनही लैंगिकता व लैंगिक संबंध यांविषयी मोकळेपणाने बोलण्याचे वातावरण नाही, तिथे मुक्त लैंगिकतेविषयी बोलणे, विचार करणे किंवा चर्चा करणे ही जरा दूरचीच गोष्ट वाटूच शकते. पण खरंतर हे लक्षात घ्यायला हवं की मुक्त लैंगिकतेचा मुद्दा आज नव्यानेच पुढे येतोय असं अजिबात नाहीये.
आपल्या अनेक प्राचीन शिल्प व दस्तऐवजांवरून तर आपली प्राचीन संस्कृती ही लैंगिकतेच्या बाबतीत अधिक मुक्त होती हे लक्षात येते. या शिल्पांमध्ये वेगवेगळ्या लैंगिकतेच्या व्यक्तींचे लैंगिक संबंध व सामूहिक लैंगिक संबंध यांचे सुद्धा दाखले आपल्याला मिळतात आणि याविषयी उघडपणे शिल्प कोरण्या इतका मोकळेपणा त्या काळात होता हेसुद्धा यावरून समजते. कामजीवनावर ग्रंथ लिहिणारा वात्स्यायन सुद्धा आपल्या प्राचीन संस्कृतीत होवून गेला व त्यामध्ये लैंगिक संबंध करताना करावयाच्या वेगवेगळ्या आसनांविषयी लिहिताना किंवा त्या आसनांचे चित्र काढताना त्याला कोणी अडवले नाही किंवा त्याच्या ग्रंथावर कुठे बंदी आणली गेली नाही. याचाच अर्थ त्याकाळात वेगवेगळ्या लैंगिकता व त्यांचे लैंगिक संबंध यांविषयीचा तेवढा मोकळेपणा समाजात होता. पण पुढे विवाहसंस्था उदयास आल्यानंतर लैंगिकतेच्या चौकट्या तयार झाल्या आणि त्या चौकटी दिवसेंदिवस अधिकच अरुंद आणि घट्ट होत गेल्या. तरीही जवळपास शंभर वर्षांपूर्वी रघुनाथ धोंडो कर्वे यांनी लैंगिकतेच्या या चौकटींना हादरा देवून पुन्हा एकदा मुक्त लैंगिकतेचा आग्रह धरला होता आणि या चौकटींना बळकटी देणाऱ्या विवाहसंस्थेवर सुद्धा त्यांनी जोरदार प्रहार केला होता. दुर्दैवाने र धों नंतर हे काम व ही संकल्पना पुढे नेण्यासाठी तेवढे जोमाने काम होवू शकले नाही. अर्थात हे मोठे धाडसाचे काम होते आणि कदाचित तेवढे धाडस पुन्हा कुणी दाखवू शकले नाही. त्यामुळे ही संकल्पना पुन्हा मागे पडली.
आता र धों नंतर सुद्धा खूप मोठा काळ उलटून गेलाय. पण अजूनही आपण मुक्त लैंगिकते विषयी मोकळेपणाने बोलायला तयार नाही अशी परिस्थिती आहे. मात्र गेल्या काही वर्षांतील यासंबंधी काम व त्यातून येत गेलेल्या अनुभवातून याविषयी बोलण्याची गरज आता तीव्रपणे जाणवत आहे आणि म्हणूनच आता यापुढील लिखाणात खुलेपणाने लैंगिकतेवर बोलण्याचा व यावर चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न असणार आहे.
अर्थात असल्या कोणत्याही चर्चा वगैरे करण्याचे उपद्व्याप न करता एकापेक्षा जास्त जोडीदारासोबत लैंगिक संबंध ठेवलेले आणि ठेवत असलेले असे अनेकजण असतीलच. त्यांना असला काही उपद्व्याप करत बसण्याची गरजही वाटत नसणार. पण याचा अर्थ असा अनुभव घेतलेले किंवा घेत असलेले सगळेच स्त्री-पुरूष मुक्त लैंगिकता मानणारे किंवा त्याला पाठिंबा देणारे असतीलच असं नाही. त्याउलट मुक्त लैंगिकता ही संकल्पना मान्य असणारे किंवा त्याविषयी बोलणारे, लिहिणारे, वाचणारे, मांडणारे सगळेच काय अशा लैंगिक संबंधांचा अनुभव असणारे असतीलच किंवा असतातच असंही काही नाही हेसुद्धा लक्षात घ्यायला हवे. किंबहुना यातल्या अनेकजणांनी तर एकदाही लैंगिक संबंधांचा अनुभव घेतलेला नसू शकतो.
एकूण काय तर मुक्त लैंगिकता ही संकल्पना समजून घेणारे, मान्य करणारे व तिला पाठिंबा देणारे किंवा तिचा पुरस्कार करणारे, प्रसार करणारे सगळेच स्त्री - पुरुष हे असे मुक्त लैंगिक संबंध ठेवत असावेत असा अर्थ काढायची गरज नाही किंवा ते तसे बोलतात किंवा मान्य करतात म्हणून लगेच त्यांनी तसे संबंध ठेवायलाच हवेत असाही आग्रह किंवा समज ठेवण्याची काहीही गरज नाही.
म्हणूनच मुक्त लैंगिकतेविषयी बोलायला सुरूवात करताना आधी आपल्याला - मुक्त लैंगिकता म्हणजे नेमके काय? याची खरंच गरज आहे का? असेल तर का आहे? आणि या मार्गावर चालता येणे शक्य आहे का? ते सोपे आहे का? यात येणाऱ्या अडचणी काय? त्यावर उपाय काय? यात आपली नेमकी भूमिका काय असावी? आपल्याला मुक्त लैंगिकता मान्य असणं म्हणजे नेमकं काय? आपण मुक्त लैंगिकतेला पाठिंबा द्यायचा म्हणजे नेमकं काय करायचं? आपण यात स्वतःला कुठल्या टप्प्यावर ठेवायचं?
या आणि अशा बऱ्याच मुद्द्यांवर आपण पुढे उहापोह करणार आहोत.
- सचिन (8424041159)
(तुम्हाला सुद्धा याविषयी काही बोलायचे असेल, आपले मत, अनुभव किंवा सूचना सांगायच्या असतील तर नक्की वरील नंबर वर व्हॉट्सॲप करा.)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा