पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 1 - अग्गंबाई अरेच्या आणि पुढे...)
आत्तापर्यंत 'ती, तो आणि लैंगिक संबंध', 'मुक्त लैंगिकतेच्या दिशेने', 'सेक्स वर बोलू काही' या काही लेखमालांचे लेखन झाले. त्यातूनच आपले 'अग्गंबाई! अरेच्या!!' हे पुस्तक सुद्धा तयार झाले. अर्थात अग्गंबाई अरेच्या पुस्तकात मुक्त लैंगिकतेच्या दिशेने फार मांडणी केलेली नसून जास्त भर हा लैंगिक संबंध व लैंगिक अवयव यांविषयी प्राथमिक किमान आवश्यक असणारी माहिती पोचवणे आणि यांविषयी असणाऱ्या अनेक गैरसमजांपैकी शक्य तितके गैरसमज दूर करणे हा मुख्य उद्देश ठेवून लिहिले आहे. आता हे पुस्तक जवळपास आपल्या सर्वांच्या हातात पोहचलेही असेल. हे पुस्तक तयार होइपर्यंत मी फेसबुक पेज वर आणि ब्लॉग वर केलेले लेखन व पुस्तकाच्या निमित्ताने थेट पुस्तकात लिहिलेले काही लेख असे मिळून 'अग्गंबाई अरेच्या' तयार झाले. यात अर्थात अजून बरंच काही लिहिणे बाकी आहे. पुस्तक येईपर्यंत आधीच्या लेखांसंदर्भात वाचकांच्या आलेल्या अनेक प्रतिक्रिया आणि पुस्तक पोचल्यावर ते वाचून आलेल्या अनेक प्रतिक्रिया आणि त्यातून समोर आलेले विषय. असं बरंच काही अजून लिहायचं आहे.
या पुस्तकातील लेखन हे वयात आलेल्या मुला-मुलींपसून पुढे सर्वच वयोगटातील स्त्री-पुरुषांना लागू होणारे असे आहे. या पुस्तकात लैंगिकता व लैंगिक संबंध यांविषयी प्राथमिक माहिती देणे आणि समाजात असणारे समज-गैरसमज शक्य तितके दूर करणे हा प्रमुख हेतू असल्यामुळेच त्यात लैंगिक अवयव, लैंगिक स्वच्छता, व्हर्जिनिटी, हस्तमैथुन, गर्भनिरोधके, पॉर्न, वेगवेगळ्या लैंगिकता व त्यांचे लैंगिक संबंध यांसारख्या विषयांबद्दल अधिक माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या समाजात आजही लैंगिकता व लैंगिक संबंध यांविषयी मोकळेपणाने बोलले जात नाही. या बोलले न गेल्यामुळे अनेक स्त्री-पुरुषांमध्ये लैंगिक असमाधान, लैंगिक जबरदस्ती व विवाहांतर्गत बलात्कार यांसारख्या समस्या वाढताना दिसतात. यासाठीच स्त्री - पुरुषांच्या लैंगिक इच्छा-अनिच्छा व दोघांची कामपूर्ती आणि जोडीदाराकडून असणाऱ्या वेगवेगळ्या अपेक्षा यांविषयी सुद्धा यामध्ये बोलले गेले आहे.
आपल्या अग्गंबाई! अरेच्या!! या पुस्तकाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी डॉ. प्रदिप पाटील, मंगला सामंत आणि डॉ. शंतनु अभ्यंकर यांनी केलेली भाषणे ही पुन्हा पुन्हा ऐकावीत अशीच आहेत. त्यांनी दिलेल्या प्रोत्साहन व सदिच्छा यांमुळे माझाही आत्मविश्वास अधिक वाढला. पुस्तकाच्या शेवटी मलपृष्ठावर ज्यांनी लैंगिकता, लिंग समभाव, स्त्री - पुरुष नाते यांविषयी त्यांच्या 'लग्नाविना', 'विवाह - भ्रमातून भानावर', 'लैंगिक धर्म', 'स्त्री - पर्व' अशा अनेक पुस्तकांतून लेखन केले, त्या मंगला सामंत यांचे भाष्य खूपच बोलके झाले आहे. या पुस्तकासाठी प्रसिद्ध स्त्री आरोग्य तज्ञ आणि लैंगिकता या विषयासंदर्भात सतत लेखन आणि प्रबोधन करणारे व त्यांच्या लेखनातून आणि आमच्या प्रत्यक्ष संवादातून मला नेहमीच प्रेरणा, प्रोत्साहन आणि मार्गदर्शन करणारे डॉ. शंतनु अभ्यंकर यांनी लिहिलेली प्रस्तावना सुद्धा अतिशय प्रभावी झालेली आहे.
तरीही अग्गंबाई! अरेच्या!! या पुस्तकात केलेली मांडणी ही प्राथमिक स्तरावर केलेली मांडणी असल्याने याच्या पुढच्या टप्प्यावर लैंगिकता व लैंगिक संबंध यांविषयी मोकळे वातावरण तयार व्हावे, मुक्त लैंगिकतेकडे निकोप दृष्टीने पाहिले जावे आणि समाजातील अनेकांच्या मनात धुमसत असलेले लैंगिक असमाधान, लैंगिक अतृप्ती आणि त्यातून होणारे अनेक दुष्परिणाम कमी व्हावेत या दृष्टीने यापुढे अधिक लेखन होणे गरजेचे आहे.
रघुनाथ धोंडो कर्वे म्हणजेच र.धों. यांनी जवळपास शंभर वर्षांपूर्वी लैंगिकता, लैंगिक संबंध व संततिनियमन याविषयी समाजात जागरूकता निर्माण करणे आणि समाजातील याविषयीचे कोंडलेपण कमी करून यात मोकळेपणा आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले होते. पण आज त्यांनतर शंभर वर्षे उलटूनही लैंगिकता व लैंगिक संबंध यांविषयी परिस्थिती मध्ये फार फरक पडल्यासारखे दिसत नाही. या पुस्तकाच्या शेवटी र धों च्या विचारांचा घेतलेला धांडोळा हा एका अर्थाने या पुढच्या लिखाणाची दिशा ठरवणाराच आहे. व्यभिचार, विवाहबाह्य संबंध, समागम वैचित्र्य या संकल्पना तर पूर्वीसारख्या आजही महत्त्वाच्या आहेतच; पण बदलत्या काळानुसार त्यात आलेल्या अनेक नवनवीन संकल्पना जसे की नो स्ट्रिंग्ज अटॅच्ड, कॅज्युअल सेक्स, ओपन रिलेशनशिप, मल्टी-पार्टनर रिलेशनशिप, को-पॅरेंटिंग व LGBTQA यांसारख्या वेगवेगळ्या लैंगिकता या सगळ्याच दृष्टीने बोलणे लिहिणे गरजेचे आहे. आधीप्रमाणेच वाचकांच्या प्रतिक्रिया, प्रश्न, शेअरिंग यामधून अधिक विषय वाढतील व कधी कधी बदलतील सुद्धा.
आता आड पडदा न ठेवता मोकळेपणाने या गोष्टी समोर आणून त्यावर चर्चा घडवून आणणे, मत मतांतरे येणे हेसुद्धा गरजेचे आहे. अर्थात यातील सर्वच मुद्दे सर्वांनाच पचतील, पटतील किंवा रुचतील असे नाही. पण ते कुणीतरी मांडणे गरजेचेच आहे. प्रकाशन कार्यक्रमाच्या मनोगतात आपल्या पुस्तकातील चित्र काढणारा चित्रकार तुळशीदास शिंदे जसं म्हटला होता की 'एकदा अग्गंबाई अरेच्या चा डोस सर्वांना सूट झाला की मग पुढचा बूस्टर डोस सुद्धा द्यायला हरकत नाही'. तसाच हा काहींसाठी बूस्टर डोस ठरू शकेल. त्यामुळे काहीजण हे वाचण्याचे टाळतील, काहीजण विरोध करतील तर काहीजण यात सोबत तर राहतीलच, पण ते मला अजून पुढच्या टप्प्यावर जाण्यासाठी मदतही करतील.
काहीही असो. मुक्त लैंगिकतेच्या दिशेने स्पष्ट मांडणीचा प्रवास तर सुरू होतोय. आणि र धों चे वारसदार व्हायचे तर विरोधाची तमा करून चालणार नाही.
तर मग तयार होवूयात सगळेच. लैंगिकतेच्या जगतातील पुढील वाटचालीसाठी. अर्थात आपण सगळे मिळूनच ही वाट चालणार आहोत. त्यामुळे तुमची साथ तेवढीच महत्त्वाची असणार आहे.
- सचिन (8424041159)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा