नातं तुझं माझं - 2

एक 'आदर्श' नवरा, एक 'आदर्श' बायको आणि त्या दोघांचं 'आदर्श' लग्न - अशी काही चीज या भूतलावर अस्तित्वात नाही. वर्तमानात तशी शक्यता नाही. भविष्यात तर नाहीच नाही.
दोन मनांचं मिलन..
दोन शरीरांचं मिलन..
दोन आत्म्यांचं मिलन..
..या साऱ्या संकल्पना अत्यंत उदात्त, पवित्र वगैरे. पण प्रत्यक्षात बहुदा यातलं काहीच घडत नाही. लग्न ही एक विचारपूर्वक शोधलेली 'संकल्पना' आहे. ठाकूनठोकून आकार देता येईल, आपल्या सोयीनुसार, स्वभावानुसार वाकवून, बदलून घेता येईल अशी एक 'व्यवस्था' म्हणजे लग्न.
प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांच्या 'स्पाऊज' पुस्तकात त्यांनी केलेली ही लग्नाची व्याख्या खरंच अंतर्मुख करणारी आहे. ही व्याख्या फक्त लग्न या एकाच नात्यापुरती मर्यादित राहत नाही, तर एकूणच आपल्या आयुष्यातील सर्व आदर्श संकल्पनांचा आपल्याला नव्याने विचार करायला लावते.
आपण नेहमीच उगाच काहीतरी आदर्श शोधण्याच्या नादात असतो. प्रत्येकाला आपल्या समोर आदर्श असं काहीतरी हवं असतं. आदर्श विचार, आदर्श विचारवंत, आदर्श साहित्यिक, आदर्श नेता, आदर्श अभिनेता आणि तसंच आदर्श नातं. खरंतर Nothing is Ideal. Every Ideal thing is just imaginary. म्हणजेच 'या जगात 'आदर्श' असं काहीच अस्तित्वात नसतं, ते फक्त काल्पनिक असतं' असं आम्ही विज्ञान शाखेत अनेकदा शिकलेलो असतो. पण तरीही प्रत्यक्ष आयुष्य जगताना मात्र हा नियम विसरून असेच आदर्श शोधत आम्ही जगत असतो. एकदा का एखाद्या व्यक्ती किंवा नात्याला आदर्श मानायला सुरूवात केली की मग आपलं सगळं जगणं-वागणं त्यांच्यासारखंच असलं पाहिजे यासाठीचे प्रयत्न सुरू होतात. हे इथपर्यंत असेल आणि समोरच्या आदर्श व्यक्ती किंवा नात्यांतील फक्त चांगल्या गोष्टी घेऊन त्या आपल्यात आणण्याचा प्रयत्न करत असू तर एकवेळ ठिक आहे; पण जेव्हा आपणच आपल्या आदर्श म्हणून मानलेल्या या व्यक्ती किंवा नात्यांना आपण आदर्शाच्या चौकटीत बांधायला सुरूवात करतो, तेव्हा मात्र आपला प्रवास चुकीच्या दिशेने व्हायला लागतो. मग आपल्या आदर्श असणाऱ्या व्यक्ती अशा वागूच शकत नाहीत, त्यांच्यात काही कमी असूच शकत नाही, त्यांचं कधी काही चुकूच शकत नाही, आपल्याला आदर्श असणाऱ्या त्यांच्या नात्यात काही प्रॉब्लेम असूच शकत नाहीत, त्यांचं सगळं म्हणजे कसं अगदी योग्यच असणार वगैरे वगैरे अशा चौकटी आपण त्यांच्याभोवती बांधत जातो आणि त्यांच्या माणूस म्हणून असणाऱ्या मर्यादाच या 'आदर्श'च्या चौकटीत मान्य करत नाही.
एखादं नातं हे त्यातल्या काही ठराविक गोष्टींसाठी आपल्याला आवडू शकतं. त्यांच्याकडून त्या गोष्टी आपण शिकायला हव्यात असंही आपल्याला वाटू शकतं. त्यात काहीच हरकत नाही. उलट ते आपल्या स्वतःसाठी व आपल्या नात्यासाठी सकारात्मक बदल करणारं असू शकेल तर अशा विचारांचा आणि त्यातून होणाऱ्या कृतीचा आनंद आणि स्वागतच आहे; पण म्हणून त्या काही आपल्याला आवडलेल्या गोष्टींमुळे त्यांच्या नात्याला 'आदर्श नातं' असं लेबल लावून त्यांना आदर्शाच्या चौकटीत बांधणं चुकीचं आणि आपल्यासाठी व त्यांच्यासाठी सुद्धा नुकसान करणारं असू शकतं. कारण अचानक अशा आपल्याला आदर्श वाटलेल्या नात्यातील दुसरी (दुखरी) बाजू जेव्हा आपल्या समोर येते, तेव्हा आपलाही हिरमोड होतो व आपण त्याचा दोष मात्र याच व्यक्तींना देऊ लागतो.
मधल्या काळात आमिर खान-किरण राव यांच्या वेगळे होण्याच्या निर्णयानंतर चाललेली चर्चा असेल किंवा सध्या जाणूनबुजून नागराज मंजुळेच्या वैवाहिक आयुष्याबद्दल केली जाणारी चर्चा असेल किंवा याशिवाय सुद्धा इतर कुणा जोडप्यांबद्दलच्या अशा स्वरूपाच्या चर्चा या सगळ्या याच 'आदर्श' च्या चौकटीतून त्या व्यक्ती किंवा त्यांची नाती यांकडे पाहण्याचे परिणाम आहेत. आदर्श म्हणजे अचूक, निर्दोष, चुकीची शक्यताच नाही असं सर्वोत्तम असणारं काही. या व्याख्येनुसार कोणतीच व्यक्ती संपूर्ण आदर्श असू शकत नाही; तसंच कोणतंच नातं सुद्धा संपूर्ण आदर्श असू शकत नाही. हे एकदा मान्य केलं की मग आपण समोरच्याच्या माणूस म्हणून असणाऱ्या चांगल्या व वाईट गुणांना पाहायला व मान्य करायला सुरू करू शकतो. मग आपण हे मान्य करू शकतो कि आपल्याला कितीही आदर्श वाटत असलेल्या एखाद्या जोडप्याच्या नात्यात सुद्धा प्रॉब्लेम असतात, असू शकतात आणि प्रॉब्लेम आहेत म्हणून ते दोषी ठरत नाहीत. शिवाय काही प्रॉब्लेम आहेत किंवा चुकीच्या गोष्टी आहेत म्हणून त्या व्यक्ती किंवा त्यांचे नाते हे पूर्णच टाकाऊ किंवा व्यर्थ ठरत नाही. 
व्यक्ती किंवा नाती यांच्याबाबत विचार करताना पूर्ण काळं किंवा पूर्ण पांढरं असं काही नसतं. तर त्याच्या मधल्या अनेक छटांमध्ये या व्यक्ती किंवा नाती जगत असतात हे आपण लक्षात घ्यायला हवे. एकदा हे लक्षात घेतले कि मग याच दृष्टीकोनातून कोणत्याही महामानवांच्या दैवतीकरणापासून आपण दूर राहू शकतो व त्यांच्या उदात्त विचारांना त्यांच्या माणूसपणाच्या चौकटीतून असणाऱ्या मर्यादेंसह मान्य करू शकतो. तसेच कुणाच्याही किंवा कोणत्याही नात्याकडे सुद्धा याच वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहायला लागलो तर आपल्याला त्यातलं नेमकं काय घ्यायचं, काय सोडायचं हे लक्षात येऊ शकतं व आपल्या आवडत्या जोड्यांचं त्यांच्या माणूसपणाच्या मर्यादांसह जगणं मान्य करता येऊ शकतं. शिवाय अशा कोणत्याही आदर्श कल्पनांशी आपल्या नात्याची तुलना करण्याचा अट्टाहास न करता आपल्या आयुष्यातील वास्तव स्विकारुन त्यानुसार आपल्या नात्याला अधिक सक्षम, बळकट बनवण्यासाठी दोघांनी प्रयत्न करत राहणे गरजेचे असते. शेवटी नातं लग्नाचं असो, मैत्रीचं असो, प्रेमाचं असो कि इतर. ते टिकवायचं असेल, फुलवायचं असेल तर अवास्तव अपेक्षा किंवा आग्रह न धरता प्रत्येक नात्याला त्याच्या त्याच्या गरजेनुसार ठाकूनठोकून बसवणे आणि त्यासाठी शक्य तिथे आपण स्वतःला सुद्धा सतत मोल्ड करत राहणे गरजेचे असते.

- #सचिन_थिटे (8424041159)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध