नातं तुझं माझं - 1

नातं.. 
आपलं स्वतःचं स्वतःशी असणारं एक खास नातं.. तसंच दोघांचं परस्परांशी असणारं अनोखं नातं.. एकाचं दुसऱ्याशी असणारं एकतर्फी नातं.. कधी अनेकांचं कुणा एकाशी एकतर्फी असणारं नातं.. कधी एकाचं अनेकांशी असणारं नातं.. तर कधी अनेकांचं एकाशी असणारं नातं.. कधी अनेकांचं अनेकांशी असणारं एकत्रित नातं..
नातं मैत्रीचं.. नातं प्रेमाचं.. 
नातं आदराचं.. नातं मायेचं..
नातं हसवणारं.. तसं रडवणारं देखील..
काही नाती लळा लावणारी.. तर काही चटका देऊन जाणारी..
काही क्षणिक.. तर काही कायमची सोबत करणारी..
नातं मानवी.. तसं नातं निसर्गातील मानवाशिवाय इतर सजीव-निर्जीव सृष्टीशी सुद्धा..
काही नाती रक्ताची, तर काही प्रीतीची. काही सहज आयती मिळालेली तर काही विशेष कमावलेली.
नाती.. हवीहवीशी वाटणारी.. तशीच नकोशी वाटणारी सुद्धा.
कधी हे नातं आपल्या आवडीचं असतं.. तर कधी फक्त गरज म्हणून निभवावं लागतं..
आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात अशा अनेक नात्यांचा वाटा असतो.

नातं जगताना ते जपावं ही लागतं. ते जपण्यासाठी आपल्याला अनेकदा झुकतं घ्यावं लागतं. नात्यात जेव्हा इच्छेचा अट्टाहास होतो आणि आग्रहातून दुराग्रह जन्माला येतात तेव्हा नात्यातील तेढ वाढायला लागते. अशा वेळी आपले अट्टाहास आणि दुराग्रह वेळीच बाजूला केले नाहीत तर नाते बिनसते, बिघडते आणि अनेकदा तुटते सुद्धा.
ते बिनसू नये, बिघडू नये, तुटू नये यासाठी आपली इच्छा अट्टाहास मध्ये तर बदलत नाहीये ना यावर सतत लक्ष ठेवावे लागते. आपण आपल्या इच्छेखातर समोरच्या व्यक्तीच्या वैयक्तिक स्पेसमध्ये तर हस्तक्षेप करत नाही ना? आपली इच्छा समोरच्यावर लादत तर नाही ना? हे स्वतःलाच सतत विचारत राहावे लागते.
आपल्याला आपले नाते प्रिय असतेच. पण कधी त्याहून आपल्या नात्यातील ती व्यक्ती जास्त प्रिय असते. त्या प्रिय व्यक्तीची आपल्याला जास्त काळजी वाटत असते. त्यासाठी त्या व्यक्तीने तिच्या जगण्यात, वागण्यात आपल्याला हवे तसे काही बदल करावेत असे आपल्याला सतत वाटत असते. कधी ते बदल खरंच गरजेचे असतातही आणि त्यामुळे समोरच्या व्यक्तीला ते पटतात व त्यानुसार ती व्यक्ती बदलते सुद्धा. या गोष्टीचा, आपल्याला हवा तसा बदल आपण घडवून आणल्याचा आपल्याला आनंद होतो. पण कधी समोरच्या व्यक्तीत आपल्याला हवा असणारा बदल समोरच्या व्यक्तीला तेवढा महत्त्वाचा वाटत नाही किंवा महत्वाचा वाटला तरी तो करता येत नाही, तेव्हा आपण त्या गोष्टीसाठी अधिक आग्रही बनतो आणि ते बदल व्हायलाच हवेत असा सततचा अट्टाहास करत राहतो. यातून समोरची व्यक्ती त्रासू शकते याचा विचार आपण करत नाही. त्यामुळे पुढे यावरून घरात किंवा त्या नात्यातील या दोघांत सतत चिडचीड वाढत जाते. हे टाळण्यासाठी आपल्याला आधी हे स्विकारता यायला हवे कि समोरची व्यक्ती आपल्याला कितीही प्रिय असली तरी तिचे आयुष्य हे तिचेच वैयक्तिक आयुष्य असते. त्यावर आपली किंवा इतर कुणाचीच मालकी नसते. त्यामुळे जेवढ्या गोष्टी दोघांच्या संगनमताने शक्य आहेत तेवढ्या करणे आणि इतर ज्या ठिकाणी आपले एकमत होत नाही अशा गोष्टींविषयी फक्त आपले मत सांगून थांबावे. आपले हे मत समोरच्याने अंमलात आणयलाच हवे असा अट्टाहास करू नये.

नात्याची वीण अधिक घट्ट करण्यासाठी आपल्या मतांचे, इच्छांचे, आग्रहांचे समोरच्यावरचे लादलेपण कमी करावे लागते. हे नेहमी व्यस्त प्रमाणात चालणारे असते. लादलेपण जेवढे जास्त, तेवढी नात्याची वीण कमजोर आणि लादलेपण जेवढे कमी तेवढी नात्याची वीण अधिक घट्ट.

आपल्या आयुष्यातील प्रत्येक नात्यामध्ये अशा अनेक कंगोरे असणाऱ्या बाजू असतात. त्यातील शक्य तेवढ्या बाजू समजून घेत त्या उलगडत जाण्याचा प्रयत्न करूयात.
शेवटी प्रत्येक नात्याला चिरतरुण ठेवण्यासाठी सततची मशागत आवश्यक असतेच. मशागत नसेल तर ते नाते सुद्धा कोमेजून जायचीच शक्यता जास्त असते.

- सचिन (8424041159)
(आपल्या प्रतिक्रिया, मते, अनुभव नक्की व्हाट्सअप्प करा.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध