पर्व 3 - 'सेक्स'वर बोलू काही- भाग 22 (समलिंगी (गे) पुरूषांचे गुदमैथुन)
भिन्नलिंगी आकर्षण असणाऱ्या स्त्रिया व पुरुष यांच्या गुदमैथुन विषयी आपण मागच्या लेखात पाहिलं. आता समलिंगी पुरुषांच्या गुदमैथुन विषयी जाणून घेऊयात.
समलिंगी पुरुषांनाच इंग्लिश मध्ये 'गे' (Gay) असे म्हणतात. एखाद्या पुरुषाला दुसऱ्या पुरुषांबद्दल लैंगिक आकर्षण असेल, तर त्याला समलिंगी पुरूष किंवा गे असे म्हणतात. अशा पुरूषांना स्त्रियांविषयी लैंगिक आकर्षण नगण्य असते. ज्या समलिंगी पुरूषांना स्त्रियांविषयी सुद्धा लैंगिक आकर्षण असते त्यांना उभयलिंगी पुरूष म्हणजेच बाय सेक्सुअल (Bi-sexual) असे म्हणतात. समलिंगी पुरुषांमध्ये लैंगिक संबंधांत जरी प्राधान्याने गुदमैथुन जास्त प्रमाणात करत असले तरी गुदमैथुन बरोबरच हस्तमैथुन, मुखमैथुन सुद्धा करत असतात. अनेकदा असा गैरसमज असतो कि समलिंगी पुरुषांमध्ये सेक्स करताना थेट गुदमैथुनच फक्त करतात. पण तसे नसते. जसे भिन्नलिंगी आकर्षण असणाऱ्या स्त्री-पुरुषांमध्ये प्रत्यक्ष शिश्न-योनी संबंधांच्या आधी आकर्षण, रोमान्स, मिठी, आलिंगन, चुंबन, शक्य झालंच तर हस्तमैथुन व मुखमैथुन सुद्धा केले जाते; अगदी तसेच समलिंगी पुरुषांमध्ये सुद्धा हे सर्व लैंगिक आनंद देणारे प्रकार केले जातात. मुळात स्त्री-पुरुषांना एकेमेकांविषयी ज्या भावना मनात येत असतात, अगदी तशाच भावना इथेही समलिंगी पुरुषांच्या मनात एकमेकांविषयी येत असतात. त्यामुळे लैंगिक संबंधांमध्ये एकमेकांना आनंद देण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती समलिंगी पुरूष सुद्धा वापरतात. यात अनेकांना हस्तमैथुन आवडत असते, अनेकांना मुखमैथुन जास्त आवडत असते, तर अनेकांना गुदमैथुन आवडत असते. कित्येक समलिंगी पुरूष तर प्रत्यक्षात गुदमैथुन करत सुद्धा नाहीत. ते फक्त मिठी, चुंबन, आपले शरीर एकमेकांवर घासणे, शिश्न एकमेकांच्या शरीरावर घासणे अशा पद्धतीचे फोरप्ले व एकमेकांचे हस्तमैथुन आणि मुखमैथुन करत असतात.
गुदमैथुन मध्ये टॉप आणि बॉटम असे दोन प्रकार असतात. ज्यांना पेनिट्रेटिंग व रिसिव्हिंग मोड असे सुद्धा म्हणतात. पेनिट्रेटिंग किंवा टॉप मोड म्हणजे आपले शिश्न समोरच्या पुरुषाच्या गुदद्वारामध्ये घालून सेक्स करणे व रिसिव्हिंग किंवा बॉटम मोड म्हणजे समोरच्या जोडीदाराचे शिश्न आपल्या गुदद्वारामध्ये घालून घेऊन सेक्स करणे. यामध्ये काहीजण नेहमीच टॉप मोड मध्ये राहायला आवडणारे असतात, तर काहीजण नेहमीच बॉटम मोड मध्ये राहायला आवडणारे असतात. म्हणजे आपल्या गुदद्वारामध्ये दुसऱ्या जोडीदाराचे शिश्न घालून सेक्स करण्यात त्यांना जास्त मजा येते. तर काहींना आपले शिश्न दुसऱ्या जोडीदाराच्या गुदद्वारामध्ये घालून (टॉप मोड) सेक्स करण्यात जास्त मजा वाटते. अशी एकमेकांना पूरक जोडी जर एकत्र असेल तर त्यांना एकमेकांसोबत लैंगिक संबंधांची जास्त मजा घेता येऊ शकते. पण नेमके एकाच प्रकारचे दोघेजण एकत्र असतील तर थोडे तानेबाने होण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळी दोघांनी परस्पर सामंजस्याने एकमेकांच्या लैंगिक आनंदाचा विचार करत आळीपाळीने टॉप-बॉटम पोझिशन मध्ये संबंध करायला हवेत. अर्थात गे मध्ये बहुतांशी पुरूष हे दोन्ही गोष्टी आवडणारे सुद्धा असतात. म्हणजेच आपले शिश्न समोरच्या जोडीदाराच्या गुदद्वारामध्ये घालून सेक्स करायला पण आवडते आणि समोरच्याचे शिश्न आपल्या गुदद्वारामध्ये घालून घेऊन सेक्स करायला पण आवडते असेही पुरूष असतात. अशा जोडीमध्ये दोघांनाही आळीपाळीने टॉप-बॉटम पोझिशन मध्ये एकमेकांना पुरेपूर आनंद देता-घेता येणे शक्य असते.
अर्थात पेनिट्रेटिंग (टॉप) मोड असो किंवा रिसिव्हिंग (बॉटम) मोड असो, दोघांनाही गुदमैथुन हे सुरुवातीच्या काळात त्रासदायकच असते. गुदद्वार योनीमार्गाप्रमाणे लवचिक नसल्याने ताठरता आलेले शिश्न सहजासहजी गुदद्वारामध्ये प्रवेश करू शकत नाही. त्यामुळे टॉप मोड मध्ये असणाऱ्या पुरुषाच्या शिश्नालाही व बॉटम मोड मध्ये असणाऱ्या पुरुषाच्या गुदद्वारालाही त्रास व वेदना होण्याची शक्यता असते. अनेकदा जखम सुद्धा होऊ शकते. या सर्व अडचणी व त्यावरचे उपाय पुढे स्वतंत्र लेखात पाहूच.
समलिंगी किंवा गे पुरुषांकडे बघण्याचा आपला सामाजिक दृष्टिकोन अजूनही खूपच नकारात्मक आहे. त्यांना सन्मानाने स्वीकारले जात नाही. त्यामुळे अनेकजण आपली ही ओळख लपवून ठेवतात व त्यामुळे त्यांना स्वतःला सुद्धा घुसमट सहन करत जगावे लागते व चुकून त्यांचे लग्न सामाजिक दडपणाखाली येऊन एखाद्या स्त्रीशी केले गेले, तर त्या स्त्री जोडीदाराची सुद्धा यात फसवणूक होते व तिच्याही आयुष्याचे नुकसान होते. त्याकरता आधी समलिंगी पुरुषांकडे बघण्याचा दृष्टिकोन आपण बदलायला हवा. ही लैंगिकता सुद्धा तितकीच नैसर्गिक असते, जितके भिन्नलिंगी स्त्री पुरुष असतात. हे आपण लक्षात घ्यायला हवे. 'गे पुरुष सतत फक्त सेक्स साठी आग्रही असतात, त्यांना फक्त सेक्स च हवा असतो' वगैरे गैरसमज अनेकांच्या मनात असतात. ते दूर करायला हवेत. भिन्नलिंगी आकर्षण असणाऱ्या पुरूषांच्या मनात स्त्रियांविषयी जशा भावना येतात व भिन्नलिंगी आकर्षण असणाऱ्या स्त्रियांच्या मनात जशा पुरुषांविषयी भावना येतात; तशाच समलिंगी आकर्षण असणाऱ्या पुरुषांच्या मनात इतर पुरुषांविषयी भावना येत असतात. समोर आलेल्या प्रत्येक स्त्रीबाबत पुरूष व पुरूषाबाबत स्त्रिया जसा सारखाच विचार करत नाहीत, तसेच गे पुरूष सुद्धा प्रत्येक पुरुषांबाबत सारखाच विचार करत नसतात. आपण एकदा ही लैंगिकता लक्षात घेऊन, व्यवस्थित समजून घेऊन ती मान्य केली, तर आपल्या लक्षात येते कि इतर सर्व भिन्नलिंगी स्त्री-पुरुषांप्रमाणेच समलिंगी किंवा गे पुरुषांचे सुद्धा भाव भावना असतात. ते वेगळे किंवा विचित्र असे काहीच नसतात.
-
#सचिन_थिटे (8424041159)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा