पर्व 3 - 'सेक्स'वर बोलू काही - भाग 21 (गुदमैथुन - 1)

शिश्न-योनी मैथुन, हस्तमैथुन व मुखमैथुन यांच्याबरोबरच लैंगिक संबंधांचा अजून एक पर्याय म्हणजे गुदमैथुन. यामध्ये पुरुषाचे शिश्न स्त्रीच्या किंवा दुसऱ्या पुरुषाच्या गुदद्वारामध्ये घालून मागे पुढे केले जाते. गुदमैथुन हे मोठ्या प्रमाणात समलिंगी पुरुषां (गे) मध्ये केले जाते. पण त्याचवेळी भिन्नलिंगी स्त्री-पुरुष संबंधांमध्ये सुद्धा अनेकजण गुदमैथुन करत असतात. गुदमैथुनाविषयी खूपच जास्त नकारात्मकता आपल्या समाजात आहे. 'अनैसर्गिक लैंगिक संबंध' असे समजून कित्येक वर्षे कायद्याने गुदमैथुनावर बंदी सुद्धा होती. नुकतीच भारतात कायद्याने यावरची बंदी हटवली आहे. पण तरी मुळात जिथं स्वतःच्याच 'शी' च्या अवयवाविषयी आपल्या मनात मोठ्या प्रमाणात किळस असते, तिथे दुसऱ्याच्या 'शी'च्या अवयवाविषयीचे आकर्षण अनेकांच्या मनातही येऊ शकत नाही. शिवाय गुदमैथुन हे तुलनेने त्रासदायक असल्याने साहजिकच त्याविषयीची भिती सुद्धा अनेकांच्या मनात असते. असं असलं तरी अनेक स्त्री-पुरूष असे सुद्धा आहेत, ज्यांना गुदमैथुन करायला आवडते व त्यांना गुदद्वार हे फक्त 'शी' चा अवयव वाटत नसून त्याविषयी लैंगिक आकर्षण सुद्धा वाटत असते. हे अगदी नॉर्मल आहे. गुदमैथुन हे अजिबात अनैसर्गिक वगैरे असं काहीही नाही. सर्वच सेक्सचे प्रकार जे जे दोन जोडीदार स्वेच्छेने, आनंदाने व परस्पर संमतीने करतात ते सर्वच नैसर्गिक असतात हे आधी लक्षात घेऊयात. त्यामुळे ज्यांना कुणाला गुदमैथुन आवडत नसेल त्यांनी ते करू नये व ज्यांना आवडत असेल त्यांनी करावे. आणि यातील कुणीच एकमेकांना दोष देऊ नये, कमी लेखू नये, अपमान करू नये. गुदमैथुन करणे व आवडणे हे जेवढे नॉर्मल आहे, तेवढेच ते न आवडणे हेसुद्धा नॉर्मल आहे. त्यामुळे एखाद्याला आवडत नसेल तर त्यांच्यावर जबरदस्ती करता कामा नये, त्यांना त्यावरून हिणवू किंवा कमी लेखू नये. आपल्याला गुदमैथुन आवडत असेल तरी आपण त्याबद्दल मनात काही अपराधी भावना ठेवण्याचे कारण नाही व आवडत नसेल तरीही अपराधी भावना ठेवण्याचे कारण नाही. आणि अगदी असाच विचार आपण समोरच्याच्या बाबतीतही करणे अपेक्षित आहे.
गुदमैथुन हे फक्त शिश्नाच्याच आधारे केलं जातं असं नाही, तर डिल्डो, व्हायब्रेटर यांसारख्या वेगवेगळ्या सेक्स उपकरणांच्या (सेक्स टॉय) साहाय्याने सुद्धा केलं जाऊ शकतं. या नवनवीन सेक्स उपकरणांमुळे गुदमैथुन ही आता फक्त पुरूषांचीच मक्तेदारी किंवा दावेदारी राहिलेली नसून स्त्रिया सुद्धा गुदमैथुन करू शकतात. स्त्रियांसाठी कमरेला बांधायचे पट्टे सुद्धा मिळतात. त्यांच्या सहाय्याने स्त्रिया गुदमैथुन करू शकतात. या सेक्स उपकरणांविषयी पुढे आपण स्वतंत्रपणे अधिक सविस्तर बोलूच. शिश्नाऐवजी बोटाच्या साहाय्याने सुद्धा गुदमैथुन केले जाते. काहीजण एकमेकांच्या गुदद्वारामध्ये मुखमैथुन सुद्धा करतात.

आता सर्वप्रथम स्त्री-पुरुषांमधील गुदमैथुना बद्दल बोलूयात. स्त्री-पुरुषांमध्ये प्रामुख्याने पुरूष जोडीदार स्त्रीच्या गुदद्वारामध्ये शिश्न घालून गुदमैथुन करण्यास जास्त इच्छुक असतात. मात्र त्याचवेळी खूप कमी स्त्रिया यासाठी तयार असतात. यामध्ये गुदद्वाराविषयीची किळस ची भावना तर असतेच; पण त्याहून मोठ्या प्रमाणात त्यामध्ये होणाऱ्या त्रासाची भिती असते. गुदद्वारामध्ये योनीमार्गात असते तशी लवचिकता नसते. त्यामुळे शिश्न आत जाताना त्रास होतो. अनेकदा रक्तही निघतं, जखमही होऊ शकते. त्यामुळे स्त्रिया यासाठी शक्यतो तयार नसतात. शिश्नाऐवजी बोट घालून गुदमैथुन करण्याचा पर्याय सुद्धा याच कारणाने अनेक स्त्रियांना नको असतो. तरीही स्त्रियांवर जबरदस्तीने गुदमैथुन लादले जाण्याचे सुद्धा प्रकार अनेक विवाहित जोडप्यांमध्ये घडतात. काही स्त्रिया याला नकार देत या कारणावरून वेगळे होण्याचे सुद्धा निर्णय घेतात; पण सर्वच स्त्रियांमध्ये ही हिंमत किंवा तशी परिस्थिती नसल्याने त्यांना ही जबरदस्ती सहन करावी लागते. 
स्त्री-पुरूष जोडीमध्ये स्त्रीने पुरुषासोबत गुदमैथुन करणे हा ही प्रकार असतो. ज्यामध्ये वर सांगितल्याप्रमाणे काही सेक्स उपकरणे वापरून किंवा बोटाचा वापर करून स्त्रिया हे करतात. पण शक्यतो स्वतःहून काही सेक्स उपकरणे वापरून किंवा आपल्या हाताची बोटे पुरुषाच्या गुदद्वारामध्ये घालून गुदमैथुन करण्यात रस असणाऱ्या विवाहित स्त्रिया अगदीच कमी असतात. कारण त्यांना त्यातून विशेष काहीच लैंगिक आनंद मिळत नसतो. फक्त कधीतरी उत्सुकता म्हणून, थ्रिल म्हणून किंवा अनुभव घ्यायचा म्हणून 'करून बघुयात' अशा कारणाने काही स्त्रिया याचा विचार करू शकतात. त्यांना हे चालू शकणारा जोडीदार मिळाला तर तो अनुभवही घेता येऊ शकतो व त्यातून जर दोघांनाही हे आवडलं तर ते पुढे नियमित पण करू शकतात.
अर्थात सर्वच पुरुष गुदमैथुनाविषयी आग्रही असतात असे नाही. मुळात सर्वच भिन्नलिंगी आकर्षण असणाऱ्या पुरुषांना सुद्धा मुख्य लैंगिक आकर्षण हे योनीमैथुनाविषयीच असते व अनेकांच्या मनात गुदमैथुनाविषयी स्त्रियांप्रमाणेच किळस, भिती व नकारात्मक भावनाच असते; पण वर म्हटल्याप्रमाणे काही पुरुषांमध्येही थ्रिल म्हणून, उत्सुकता म्हणून किंवा अनुभव घेऊन पाहायचा म्हणून गुदमैथुन करायची इच्छा असते, असू शकते. अनेकदा पॉर्न व्हिडिओ पाहून सुद्धा काही मुला-मुलींमध्ये ही इच्छा तयार होत असते. अशा मुला-मुलींना गुदमैथुन आवडणारेच किंवा किमान गुदमैथुन चालू शकणारे जोडीदार मिळाले तर ते हे प्रयोग करून पाहू शकतात आणि दोघांनाही ते आवडलेच, तर पुढे नियमित सुद्धा करू शकतात. पण जर जोडीदाराला हे आवडणार नसेल तर मात्र अशा वेळी सतत आग्रह धरणे, भावनिक ब्लॅकमेल करणे, मानसिक त्रास देणे किंवा जबरदस्ती करणे हे सगळंच चुकीचं आहे हे लक्षात घ्यायला हवं. हे झालं भिन्नलिंगी आकर्षण असणाऱ्या स्त्री-पुरूष जोडीदारांतील गुदमैथुनाविषयी. 
यापुढे समलिंगी स्त्रिया व पुरूष यांच्यातील गुदमैथुनाविषयी सुद्धा पाहुयात व गुदमैथुन करताना येणाऱ्या अडचणी, त्यासाठी पाळावयाचे नियम व घ्यायची काळजी सुद्धा पुढच्या लेखांमध्ये पाहुयात.

- सचिन (8424041159)
(आपल्या प्रतिक्रिया, शंका, प्रश्न, अनुभव शेअर करावे वाटत असतील तर नक्की व्हाट्सअप्प करा.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध