पर्व 3 - 'सेक्स' वर बोलू काही - भाग 20 - मुखमैथुन
हस्तमैथुना प्रमाणेच मुखमैथुन व गुदमैथुन हे सुद्धा शिश्न-योनी संबंधांना पर्याय म्हणून वापरले जाणारे लैंगिक संबंधांचे प्रकार आहेत. अर्थात हस्तमैथुन व मुखमैथुन हे शिश्न-योनी संबंधांकरता एकमेकांना उत्तेजित करण्यासाठी व शिश्न-योनी संबंधांतील मजा अधिक वाढवण्यासाठी सुद्धा वापरले जाणारे पर्याय आहेत. समलिंगी संबंधांमध्ये मुखमैथुन व गुदमैथुन हेच पर्याय जास्त प्रमाणात वापरले जातात.
मुखमैथुन मध्ये शिश्न-मुख मैथुन व योनी-मुख मैथुन असे दोन प्रकार पडतात. शिश्न-मुख मैथुन मध्ये पुरूष जोडीदाराचे शिश्न स्त्री किंवा पुरूष जोडीदाराकडून तोंडामध्ये घेऊन शिश्नमुंडावरील त्वचा हाताने मागे पुढे केली जाते आणि शिश्नमुंडाचे चुषण केले जाते. शिश्नबंधावर ओठांनी दाब देणे, आपले तोंड मागे पुढे हलवत ओठांनी शिश्नाचे मर्दन करणे किंवा पुरूषानेच आपले शिश्न समोरच्या जोडीदाराच्या तोंडात मागे पुढे करणे अशा वेगवेगळ्या प्रकारे एकमेकांना उत्तेजित केले जाते. उत्तेजित झाल्यानंतर काहीजण ताठरता आलेले शिश्न स्त्री जोडीदाराच्या योनीमार्गात घालून शिश्न-योनी संबंध करतात; तर काहीजण पुरूषाची वीर्यमुक्ती होईपर्यंत मुख-मैथुन करतात व मग वीर्य समोरच्या जोडीदाराच्या तोंडात सोडतात किंवा शिश्न तोंडातून बाहेर काढून बाहेर सोडतात.
योनी-मुख मैथुन मध्ये पुरूष किंवा दुसऱ्या स्त्री जोडीदाराने आपल्या स्त्री जोडीदाराची शिश्निका, बाह्यभगोष्ट, लघुभगोष्ट यांना ओठांनी चुंबन करणे, जिभेने स्पर्श करणे, शिश्निकेचे जिभेने मर्दन करणे आदी प्रकारे स्त्री जोडीदाराला उत्तेजित केले जाते. काहीजण फक्त स्त्री उत्तेजित होईपर्यंतच योनी-मुख मैथुन करतात आणि स्त्री उत्तेजित झाल्यानंतर शिश्न-योनी संबंध करतात; तर काहीजण स्त्रीला पूर्ण कामपूर्ती मिळेपर्यंत योनी-मुख मैथुन करतात.
स्त्री व पुरूष किंवा दोन स्त्रिया किंवा दोन पुरूष जोडीदार एकाच वेळी दोघांनाही मुख-मैथुनाचा आनंद मिळावा यासाठी 69 या आसनाचा उपयोग करू शकतात. यामध्ये एका जोडीदाराने खाली पाठीवर उताणे झोपावे व दुसऱ्या जोडीदाराने त्याच्या विरुध्द दिशेने म्हणजे त्याच्या पायांच्या दिशेने आपले डोके करून वरून पालथे झोपावे. जेणेकरून दोघाही जोडीदारांचे लैंगिक अवयव एकमेकांच्या तोंडाजवळ येतील. आणि मग एकमेकांना एकाच वेळी मुखमैथुन करून दोघेही एकाच वेळी आनंद देऊ व घेऊही शकतात. हेच आसन पालथे व उताणे झोपण्याऐवजी बेडवर दोघांनीही एका कुशीवर झोपून सुद्धा करता येऊ शकते. अनेक स्त्री-पुरूषांचे 69 हे एक आवडते आसन असते.
आपले मुख (प्रामुख्याने ओठ) व जननेंद्रिय (शिश्न, शिश्निका व यांच्या आसपासचे भाग) या ठिकाणी संवेदनाक्षम मज्जातंतू जास्त प्रमाणात व्यापलेले असतात. त्यामुळे हे जास्त कामसंवेदना असणारे अवयव असतात. पण त्याचवेळी आपली जननेंद्रिये मूत्रसंस्थेशी सुद्धा संबंधित असतात. त्यामुळे त्याविषयीची नकारात्मक भावना किंवा किळसवाणी भावना आपल्या मनात जास्त असते. शिवाय लहानपणापासून झालेल्या संस्कारानुसार अनेकजण लैंगिक अवयवांना अश्लील, अपवित्र मानत असतात. त्यामुळे त्या अवयवांची स्वच्छता ठेवण्याकडे सुद्धा व्यवस्थित लक्ष दिले जात नाही. तिथल्या अस्वच्छतेमुळे त्या अवयवांविषयी अधिकच घृणा मनात तयार होते आणि मग अशा वेळी मुखमैथुनाची कल्पनाही सहन होत नाही. त्याकरता आधी या अवयवांविषयीची नकारात्मकता मनातून काढून टाकायला हवी. या अवयवांना सुद्धा शरीराच्या इतर अवयवांसारखेच समजून त्यांच्या स्वच्छतेकडे सुद्धा लक्ष द्यायला हवे. नियमित स्वच्छता ठेवली व मनातील नकारात्मकता काढून टाकली तरच मुखमैथुनाकडे सकारात्मक दृष्टीने बघता येऊ शकेल.
मुखमैथुन हे अनैसर्गिक आहे आणि त्यामुळे ते करू नये किंवा ते करणे म्हणजे विकृती आहे असे काहीजण सांगतात. त्यात काहीही अर्थ नाही. ज्यातून प्रजोत्पादन होते तेच लैंगिक संबंध फक्त नैसर्गिक आणि बाकीचे सगळे अनैसर्गिक असे काही नसते. माणसांमध्ये लैंगिक संबंध हे फक्त प्रजोत्पादनासाठी केले जात नाहीत, तर एकमेकांच्या लैंगिक आनंदासाठी ते जास्त प्रमाणात केले जातात. त्यामुळे दोघांनाही आनंद मिळेल अशी कोणतीही आसने व लैंगिक संबंधांचे प्रकार दोघांच्याही इच्छेने व संमतीने होत असतील तर त्यात काहीही चुकीचे मानायचे कारण नाही.
मुखमैथुन करताना काही गोष्टींची काळजी घेणे मात्र खूप गरजेचे आहे. पहिली गोष्ट म्हणजे लैंगिक अवयवांची स्वच्छता. जी नियमितपणे करायलाच हवी. दुसरं म्हणजे जर एखाद्याला एड्स किंवा इतर काही गुप्तरोग किंवा त्वचारोग असतील, त्वचेचे काही इन्फेक्शन झालेले असेल तर अशा वेळी मुखमैथुन करणे टाळावे. कारण अशा वेळी मुखमैथुनामधून हे आजार दुसऱ्या जोडीदारामध्ये संक्रमित होऊ शकतात. त्यामुळे जोडीदारांनी याविषयीची पारदर्शकता एकमेकांसोबत ठेवायला हवी. तिसरी गोष्ट म्हणजे योनी-मुख मैथुन करताना स्त्रीच्या योनीमार्गामध्ये तोंडाने हवा भरू नये. यामुळे स्त्रीच्या रक्तवाहिन्यांमध्ये हवेचे बुडबुडे गेल्याने रक्तवाहिन्या ब्लॉक होऊ शकतात. ज्याला एमबॉलिझम असे म्हणतात. हे ब्लॉकेज वाढले तर एखादा अवयव निकामी सुद्धा होऊ शकतो किंवा फुफ्फुस सुद्धा ब्लॉक होऊ शकते. यामध्ये हार्ट अटॅक ची सुद्धा शक्यता असते. त्यामुळे याकडे जास्त गांभिर्याने लक्ष द्यायला हवे. चौथं म्हणजे शिश्न-मुख मैथुन करताना शिश्न समोरच्या जोडीदाराच्या तोंडात जास्त आतपर्यंत घालू नये. त्याचा त्रास होऊ शकतो. वीर्यमुक्ती होताना वीर्य समोरच्या जोडीदाराच्या तोंडात सोडणे हे समोरच्या जोडीदाराला अनेकदा आवडणारे नसते. अशा वेळी शिश्न बाहेर काढून वीर्य बाहेर सोडावे.
वरील सर्व काळजी घेतल्यास मुखमैथुन अधिक आनंद देणारे ठरू शकते. वरील गोष्टी पाळल्या तर मुखमैथुनामुळे कोणतेही आजार होत नाहीत. वीर्य तोंडात गेल्याने किंवा पोटात गेल्यानेही कोणतेही आजार किंवा नुकसान होत नाही. पण अनेकांना ते किळसवाणे वाटू शकते. तसे असल्यास त्याचा आग्रह धरू नये.
कामोद्दीपित होण्यासाठी म्हणजे लैंगिक उत्तेजना वाढवण्यासाठी जेवढ्या जास्त ज्ञानेंद्रियांचा उपयोग केला जाईल, तेवढे लैंगिक उत्तेजन जास्त मिळते असे कामशास्त्र सांगते. मुखमैथुनामध्ये दृष्टी, चव, गंध व स्पर्श या ज्ञानेंद्रियांचा वापर होत असल्यामुळे यातून मोठ्या प्रमाणात काम उद्दीपन होऊ शकते. अनेक लैंगिकतज्ञ (Sexologist) स्त्री किंवा पुरूष जोडीदारांमधील लैंगिक अनिच्छेवर मुखमैथुन हा उपाय सुचवत असतात, ज्यातून आपल्या जोडीदाराला कामोत्तेजित करता येऊ शकते व मग शिश्न-योनी संबंधांचा आनंद घेता येऊ शकतो.
अनेकदा जेव्हा एका जोडीदाराला शिश्न-योनी संबंधांची अजिबात इच्छा नाही किंवा काही कारणांनी शक्य नाही किंवा सध्या मूड नाही; पण दुसऱ्या जोडीदाराला मात्र खूप इच्छा होतेय, अशा वेळी हस्तमैथुना बरोबरच मुखमैथुन हा पर्याय समोरच्या जोडीदाराला लैंगिक आनंद व कामतृप्ती देण्यासाठी जास्त प्रभावी ठरू शकतो. स्त्री-पुरूष, दोन पुरूष किंवा दोन स्त्रिया अशा कोणत्याही जोड्यांमध्ये दोन्हीही जोडीदारांना जर मुखमैथुन आवडणारे असेल तर अशा जोड्या एकमेकांना व स्वतःलाही भरपूर लैंगिक आनंद मिळवून देऊ व घेऊ शकतात. समलिंगी नसणाऱ्या स्त्री व पुरुषांना सुद्धा जेव्हा भिन्नलिंगी जोडीदाराकडून लैंगिक आनंद मिळवणे शक्य नसेल, तेव्हा ठरवून दोघांच्या इच्छेने दोन पुरूष किंवा दोन स्त्रिया एकमेकांना हस्तमैथुन व मुखमैथुन करून आनंद देऊ व घेऊ शकतात. त्यासाठी समलिंगीच असण्याची गरज नाही. फक्त आपले लैंगिक अवयव, लैंगिक इच्छा व लैंगिक आनंद याकडे पाहण्याची दृष्टी निर्मळ ठेवणे गरजेचे आहे.
- सचिन थिटे (8424041159)
(आपल्या काही शंका, प्रश्न, अनुभव, प्रतिक्रिया, मतं शेअर करायची असल्यास नक्की व्हाट्सअप्प करा.)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा