पर्व 3 - 'सेक्स'वर बोलू काही - भाग 19 (हस्तमैथुना संदर्भातील प्रश्न आणि उत्तरे - 3, 4, 5)
3. हस्तमैथुन केल्यानंतर मला काही काळ अशक्तपणा आल्यासारखे जाणवते. हे कशामुळे होत असेल? जास्त हस्तमैथुन केल्यामुळे खरंच अशक्तपणा येतो का?
- हस्तमैथुन केल्यामुळे कधीही कुणालाही अशक्तपणा येत नाही, येऊ शकत नाही. उलट हस्तमैथुन केल्यामुळे एक रिलॅक्सेशनची भावना मनात येते. शरीरातील हार्मोन सिक्रेशन मुळे शरीरात सुद्धा एक सुखद अनुभव तरळू लागतो. शरीर थंडगार पडल्यासारखा सुखद अनुभव काहींना येतो. अशा वेळी मेंदूतून स्रवणारे हार्मोन्स सुखद भावना सर्व शरीरभर पसरवतात व सर्व शरीर हलके हलके झाल्यासारखे काही क्षण जाणवतं. सर्वच वयाच्या स्त्री-पुरुषांना हे अनुभवास येऊ शकतं. ही सुखद अनुभूती असते; पण आपल्या मनात हस्तमैथुन विषयी भिती किंवा नकारात्मक भावना असेल तर या सर्व अनुभवांकडे नकारात्मक पाहिलं जाऊ शकतं व त्यामुळे हलकं हलकं वाटणारं शरीर अशक्तपणा मुळेच वाटतंय कि काय? असा समज होऊ शकतो. प्रत्यक्षात तसं काहीही नसतं. हस्तमैथुन केल्यानंतर रक्तातील हिमोग्लोबिन कमी झालं किंवा वजन कमी झालं अशी कोणतीही उदाहरणे प्रत्यक्षात नाहीत.
त्यामुळे कोणत्याही वयातील मुलं-मुली, स्त्री-पुरुष कुणालाही हस्तमैथुन केल्याने अशक्तपणा वगैरे येत नाही हे पक्के लक्षात घेऊयात. हस्तमैथुन ही अतिशय नैसर्गिक, आनंददायी आणि प्रत्येक वेळी शक्य नसणाऱ्या सेक्सला पर्यायी असणारी कृती आहे. तिच्याकडे सकारात्मक नजरेनेच पाहायला शिका. कुणाही बाबा बुवाची किंवा थोतांड असणारी पुस्तके वाचून घाबरून जाऊ नका.
*प्रश्न 4 - हस्तमैथुन बंद केल्यावर माझी एकाग्रता वाढेल का? ब्रह्मचर्य पालनाचा उपयोग होतो का?*
- 'मुळात हस्तमैथुन केल्यामुळे एकाग्रता कमी होते' असं कुणी म्हणत असेल तर तेच चूक आहे. एकाग्रता ही हस्तमैथुन केल्या न केल्याने नाही, तर अभ्यासाच्या किंवा इतर महत्वाच्या कामाच्या वेळी दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचा विचार सतत मनात येण्यामुळे कमी होते. मग तो विचार भुकेचा असू शकतो, कुणाबद्दल रागाचा, संतापाचा, चिडचिडीचा, प्रेमाचा, जलसीचा असू शकतो किंवा इतर कुठलाही ज्यामुळे तुमचे अभ्यासावर किंवा त्या कामावर लक्ष लागत नाही.
त्यातील एक म्हणजे हस्तमैथुनाचा विचार असं असू शकतं. त्यामुळे त्याकडे इतर गोष्टींसारखेच पाहायला हवे. इथं अजून एक महत्त्वाचं हे लक्षात घ्यायला हवं कि कुणीही कधीही हस्तमैथुन करण्याचा विचार करत बसत नाही. तर लैंगिक संबंधांविषयीच्या मनात येणाऱ्या विचारांवर व इच्छेवर मोकळं होण्याचा मार्ग म्हणजे हस्तमैथुन आहे. त्यामुळे एकतर लैंगिक संबंधांविषयी मनात येणारे विचार किंवा हस्तमैथुन न करण्याविषयी किंवा हस्तमैथुन बंद करायला हवे याविषयी किंवा हस्तमैथुन करून आपण काहीतरी चुकीचे करतोय का? याचा काही वाईट परिणाम तर होणार नाही ना? अशा प्रकारच्या विचारांनी आपलं अभ्यास किंवा इतर महत्वाच्या कामातील लक्ष उडू शकतं. मग यावर उपाय काय असू शकतो? तर हस्तमैथुना विषयी भिती बाळगणे, नकारात्मक विचार करणे बंद करणे व ज्या ज्या वेळी अभ्यास करत असताना किंवा महत्वाचे काम करत असताना लैंगिक इच्छा मनात येत असतील त्या त्या वेळी मन दुसरीकडे वळवणे. अभ्यासाची जागा बदलणे, पद्धत बदलणे, विषय बदलणे किंवा वारंवार असं होत असेल तर एकांताची वेळ कमी करून इतर कुणासोबत अभ्यास करणे आणि मुळात मनात अवेळी येणाऱ्या नको असणाऱ्या विचारांवर फार विचार न करणे, ते मनातल्या मनात अजून रंगवत न बसणे व त्यांना तिथेच सोडून देऊन आपल्या समोरील अभ्यास व कामाकडे लक्ष देता येणे हा सर्वात जालीम उपाय आहे. सरावाने हे नक्कीच जमू शकते.
एकूण काय, तर यामध्ये हस्तमैथुनाचा काहीही संबंध नसताना उगीचच हस्तमैथुनास बदनाम केले जाते. जिथे हस्तमैथुनाचा संबंधच नाही, तिथे हस्तमैथुन बंद केले म्हणून एकाग्रता वाढण्याचाही प्रश्नच येत नाही. मुळात हस्तमैथुन ही मनातील लैंगिक इच्छांचा निचरा करण्याची तात्पुरती का होईना एक संधी आहे. तीसुद्धा बंद करायचा प्रयत्न केला तर या लैंगिक इच्छा मनात अशाच कोंडून राहतील. आता या लैंगिक इच्छाच मनात यायचं बंद करणे किंवा त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे म्हणजे ब्रह्मचर्य. जे साहजिकच अनैसर्गिक आहे आणि त्याचे परिणाम जास्त विपरीत असू शकतात. लैंगिक इच्छा मनात यायचं बंद करणे हे कुणालाच शक्य नसते. मनात अजिबात लैंगिक इच्छाच येत नाहीत असं म्हणणारे एक तर खोटे बोलत असतात किंवा त्यांच्यामध्ये लैंगिक समस्या असू शकतात किंवा निसर्गतःच ते अलैंगिक (Asexual) गटातील असू शकतात. मनात येणाऱ्या लैंगिक इच्छांचे प्रमाण खूप जास्त असेल व त्याचा आपल्या अभ्यास किंवा कामावर परिणाम होत असेल तर त्यासाठी मागच्या प्रश्नाच्या उत्तरात दिल्याप्रमाणे आपल्याला एकांताची वेळ कमी करता येऊ शकते किंवा वर सांगितल्याप्रमाणे ठरवून दुसरीकडे मन वळवणे, पद्धत बदलणे, कुणाला सोबत घेऊन काम करणे असे उपाय करता येऊ शकतात. एवढं करूनही लैंगिक इच्छा आपल्या कामाच्या आड येत असतील आणि त्यामुळे दैनंदिन आयुष्य विस्कळीत होतंय असं वाटत असेल तर लैंगिक तज्ज्ञांना भेटून त्यांच्याकडून सल्ला व औषधोपचार घेता येऊ शकतात.
*प्रश्न 5 - लग्नानंतर हस्तमैथुन करणे चुकीचे आहे का?*
- हस्तमैथुन ही फक्त लग्न होईपर्यंतच करण्याची गोष्ट असून लग्नानंतर हक्काची बायको सेक्स साठी मिळाल्यावर मग हस्तमैथुन का करायचे? असं काहीजणांना विशेषतः पुरुषांना वाटत असतं. लग्न झालं म्हणजे कुणीतरी हक्काचं आणि आपल्याला हवं तेव्हा सेक्स करू देणारं माणूस मिळालं अशीच ही भावना असते. पण लग्न झालं म्हणजे प्रत्येक वेळी पुरुषाला हवं तेव्हा सेक्स करण्यासाठी स्त्री तयार असेलच किंवा स्त्रीला हवं तेव्हा पुरुष तयार असेलच असं नाही. अनेकदा एकाची इच्छा असते तर दुसऱ्याची नसते. अशा वेळी एकमेकांवर जबरदस्ती न करता एकमेकांच्या इच्छा व अनिच्छेचा आदर करणे गरजेचे असते. लग्नानंतर घटस्फोटित, विधवा/विधुर, जोडीदारा सोबत राहत नसलेले असे अनेक स्त्री-पुरुष असतात. अशा सर्व परिस्थितीत आपली स्वतःची लैंगिक इच्छा शमवण्यासाठी हस्तमैथुन हा एक उत्तम पर्याय आहे. शिवाय अनेकदा स्त्रियांना शिश्न-योनी संबंधांतून पुरेसा लैंगिक आनंद मिळत नाही, तेव्हाही त्या हस्तमैथुन करून तो आनंद मिळवू शकतात.
त्यामुळे हस्तमैथुन ही लग्न झालेले असो/नसो किंवा लैंगिक जोडीदार असो/नसो तरी स्त्री-पुरूष दोघांनाही करता येणारी बाब आहे. याला वयाचे ही बंधन नाही, तसे लग्नाचे सुद्धा नाही.
- सचिन (8424041159)
(आपले काही अनुभव, मत, प्रश्न शेअर करावेसे वाटते असतील तर नक्की व्हाट्सअप्प करा.)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा