पर्व 3 - 'सेक्स'वर बोलू काही - भाग 18 (हस्तमैथुना संदर्भातील प्रश्न आणि उत्तरे - 2)
*हस्तमैथुन साधारण किती वेळा करणे म्हणजे नॉर्मल? याचे काही प्रमाण आहे का? मला दोन दिवसांतून किंवा कधी दररोज इच्छा होत असते हे प्रमाण अति आहे का?*
- हस्तमैथुन किती दिवसांतून एकदा करावे किंवा एका दिवसात किती वेळा करावे याचे असे काहीच प्रमाण ठरलेले नसते. हे प्रमाण बदलते असते. कधी ते दोन तीन दिवसांतून एखाद्या वेळी तर कधी एकाच दिवसात दोन चार वेळा किंवा त्यापेक्षा जास्त वेळाही केले जाऊ शकते. हे सगळं त्या त्या वेळी उपलब्ध असणारी वेळ, सोयीची जागा, एकांत, आपला मूड, मनात येणारे विचार आणि शरीराची तशी तयारी असणे म्हणजे हार्मोन सिक्रेशन होणे व मुलांच्या बाबतीत शिश्नात ताठरता येणे यावर अवलंबून असते. आपल्या इच्छेनुसार प्रत्येक वेळी आपण हस्तमैथुन करूच शकू असंही काही नसतं. कारण त्यासाठी शरीर तयार असणं म्हणजे शिश्नात ताठरता येणं गरजेचं असतं आणि शिश्नाची ताठरता ही आपल्या मागणीनुसार येत नसून ती शरीरातील हार्मोन सिक्रेशन नुसार येत असते. स्त्रियांच्या बाबतीत जरी हस्तमैथुनासाठी अशा ताठरतेची गरज नसली तरी जोपर्यंत शरीरात हार्मोन्स सिक्रेट होत नाहीत तोपर्यंत हस्तमैथुनाचा आनंद घेताच येत नाही. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुमचे शरीर तयार असेल तेव्हाच तुम्ही हस्तमैथुन करू शकता. यात मग कमी जास्त असं काहीच नसतं.
वरील सर्व परिस्थिती सलग काही दिवस अनुकूल असेल तर सलग काही दिवस जास्त वेळा हस्तमैथुन केले जाऊ शकते आणि परिस्थिती जेव्हा तेवढी अनुकूल नसेल तेव्हा हस्तमैथुन कमी वेळा केले जाऊ शकते. या दोन्ही गोष्टी साहजिक आहेत. यात काळजी करण्याचे काहीच कारण नसते. फक्त यामुळे जर तुमच्या दैनंदिन कामांत किंवा अभ्यासात अडथळा येत असेल तर तुमची एकांताची वेळ कमी करून तुम्ही तुमचे दैनंदिन काम किंवा अभ्यास पूर्ण करू शकता. हस्तमैथुनाचे प्रमाण कमी करण्याचा सतत विचार करून ते कमी तर होणार नाहीच; पण त्यामुळे तुमचा मनःस्ताप वाढू शकतो. त्यामुळे त्याचा फार विचार न करता इतर जे महत्वाचं काम करणं गरजेचं आहे ते त्या त्या वेळी करून घेण्यावर भर ठेवावा.
(आपलेही काही प्रश्न, शंका असतील किंवा काही शेअर करायचे असेल तर नक्की व्हाट्सअप्प किंवा ईमेल करा.)
- सचिन (8424041159)
ईमेल:- srthite@yahoo.co.in
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा