पर्व 3 - 'सेक्स'वर बोलू काही - भाग 17 (हस्तमैथुना संदर्भातील प्रश्न आणि उत्तरे - 1)

1. हस्तमैथुन जास्त वेळा करत असू तर त्यामुळे शिश्नाला काही इजा होऊ शकते का?
- आपण हस्तमैथुन कशा पद्धतीने करत आहोत यावर हे अवलंबून असते. म्हणजे हातामध्ये शिश्न धरून शिश्नमुंडावरील त्वचा मागे पुढे करून हस्तमैथुन करत असू तर यामध्ये शिश्नाला काही इजा संभवत नाही; पण अनेकदा आपण जमिनीवर पालथे झोपून हस्तमैथुन करतो. यामध्ये शिश्न जमिनीला घासले जाते. ताठरता आलेले शिश्न जास्त काळ असे जमिनीसोबत घासत राहिलो तर शिश्नाला दुखापत होण्याची शक्यता वाढते. शिश्नमुंड लाल होणे, शिश्नमुंड व शिश्नबंध या भागात आग होणे, प्रचंड जळजळ होणे इथपासून तर हे प्रमाण अगदीच जास्त असेल तर शिश्नाला सूज येऊ शकते, शिश्नबंध किंवा शिश्नमुंड यांना घासून घासून जखमा सुद्धा होऊ शकतात. 
हेच जर मऊ जागेवर म्हणजे गादीवर, उशीवर पालथे झोपून हस्तमैथुन केले तर हे त्रास होत नाहीत. फक्त सलग खूप जास्त वेळा याच पद्धतीने करत असू तर शिश्नाची जळजळ होऊ शकते. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हाताचा वापर करून हस्तमैथुन करत असलो तरी त्यातही प्रमाण खूप जास्त म्हणजे एकाच दिवसातून अनेकदा हस्तमैथुन करत असू तर शिश्नाची आग होऊ शकते, कधी शिश्नबंधा जवळचा भाग लाल होऊ शकतो, उन्हाळी लागल्याप्रमाणे काही काळ जळजळ होऊ शकते. पण ते नॉर्मल असते, काही काळ आराम पडला कि आपोआप बरं वाटू शकतं.
लघवी किंवा शौचास आलेली असताना किंवा पोट जास्त भरलेले असताना जर अशा पद्धतीने पालथे झोपून हस्तमैथुन करत असू, तर पोटाच्या आतड्यांवर सुद्धा ताण पडतो व त्यामुळे अनेकदा त्यानंतर काही काळ पोटदुखीचा त्रास सुद्धा होऊ शकतो.
पण यामध्ये कोणत्याही प्रकारे लिंग वाकडे होणे वगैरे प्रकार होत नाहीत. मुळात हस्तमैथुन किती वेळा करतो यापेक्षा ते कशा पद्धतीने करतो हे जास्त महत्वाचे असते. शिवाय किती वेळा हस्तमैथुन करणे म्हणजे 'जास्त'? याची काही एकच एक व्याख्या नसते. प्रत्येक व्यक्तीनुसार ती बदलू शकते. त्यामुळे आपल्याला जेव्हा त्रास होतोय असं जाणवतं, तेव्हा काही काळ गॅप घेणे आणि जेव्हा काहीही त्रास न होता फक्त आनंद मिळतोय तेव्हा मनसोक्त आनंद घेत हस्तमैथुन करणे हेच जास्त योग्य असते. 
शक्यतो हाताचा वापर करून आणि हलक्या हाताने शिश्नमुंडावरील त्वचा मागे पुढे करत हस्तमैथुन करण्याची सवय लावून घ्यावी. अर्थात पालथे झोपून स्वप्नरंजन करत हस्तमैथुन करण्यात सुद्धा एक वेगळीच मजा असते हे नक्कीच. फक्त अशा वेळी शक्यतो शिश्नाच्या खाली काहीतरी मऊ गोष्ट घ्यावी. लघवी किंवा शी आलेली असताना आणि पोट फुगलेले असताना शक्यतो पोटावर दाब देऊन हस्तमैथुन करणे टाळावे.
आपण अनेकदा व्यायाम करताना जेव्हा एकच स्टेप जास्त वेळा करतो किंवा एखाद्या दिवशी खूप जास्त व्यायाम होतो तेव्हा आपला तो अवयव किंवा आपले अंग काही काळ दुखते आणि आराम केल्यानंतर काही काळाने ते आपोआप बरे होते. अगदी तसेच शिश्न, शिश्नमुंड, शिश्नबंध या सगळ्यांचे सुद्धा असते. एखाद्या दिवशी खूप जास्त वेळा हस्तमैथुन केले तर त्यांच्यावर ताण येऊ शकतो किंवा एखाद्या वेळी चुकीच्या पद्धतीने ताण आला तर त्रासही होऊ शकतो. काही काळ त्यांना आराम दिला कि ते आपोआप बरे होतात. पण अगदीच जर एखाद्याला खूपच जास्त त्रास जाणवत असेल किंवा काही इन्फेक्शन होतंय असं वाटत असेल तर अशा वेळी डॉक्टरांना भेटून सल्ला नक्की घ्यायला हवा.
मागच्या काही लेखांत दिल्याप्रमाणे स्वछता व इतर गोष्टींची काळजी घेतली तर हस्तमैथुन केल्याने काहीही त्रास किंवा नुकसान होत नाही.

(आपलेही काही प्रश्न, शंका असतील किंवा काही शेअर करायचे असेल तर नक्की व्हाट्सअप्प किंवा ईमेल करा.)

- सचिन (8424041159)
ईमेल :- srthite@yahoo.co.in

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध