पर्व 3 - 'सेक्स'वर बोलू काही - भाग 15 - स्त्रिया व हस्तमैथुन & स्त्री-पुरुषांच्या हस्तमैथुनातील फरक
आत्तापर्यंतच्या लेखांत आपण 'हस्तमैथुन म्हणजे काय?', 'हस्तमैथुनाविषयीचे गैरसमज' व 'हस्तमैथुनाचे फायदे' याविषयी माहिती पाहिली. हस्तमैथुन म्हटलं कि सहसा फक्त पुरुषांच्या हस्तमैथुनाविषयीच जास्त चर्चा होते. कारण स्त्रिया सुद्धा हस्तमैथुन करू शकतात हे अजूनही इतकं समाजमान्य झालेलं नाही. त्यामुळे प्रत्यक्ष स्त्रिया सुद्धा याविषयी आपापसांतही फारसं बोलताना दिसत नाहीत. अर्थातच न बोलल्याने याविषयी अनेक गैरसमज सुद्धा पसरलेले असतात. तर आज जरा थोडं स्त्रियांच्या हस्तमैथुनाविषयीच अधिक समजून घेऊयात.
'स्त्रियासुद्धा हस्तमैथुन करतात', 'स्त्रियासुद्धा हस्तमैथुन करू शकतात' आणि 'स्त्रियांनी हस्तमैथुन करणे हे पुरुषांनी हस्तमैथुन करण्या इतकेच नॉर्मल असते' या बेसिक गोष्टी आधी आपण सुरुवातीलाच लक्षात घेऊयात. त्यामुळे आत्तापर्यंत जर आपल्यापर्यंत असं काही पोचलं असेल कि- 'स्त्रियांनी हस्तमैथुन करणे चुकीचे, अनैतिक किंवा चारित्र्यहीन असल्याचे लक्षण आहे' तर ते चुकीचे आहे. पुरुषसत्ताक व्यवस्थेने आणि मुळात लैंगिक संबंध व लैंगिक इच्छा यांनाच पाप समजणाऱ्या आणि यांपासून सर्वांनीच व विशेषतः स्त्रियांनी तर अधिक दूर राहावे अशा संकुचित विचारांना समाजात पेरून त्याला पावित्र्याचे अधिष्ठान देणाऱ्या महाभागांनी असल्या गोष्टी समाजात खोलवर रुजवलेल्या आहेत आणि आपला समाज अजूनही यातून बाहेर पडू शकलेला नाही हे कटू वास्तव आहे. स्त्रियांच्या हस्तमैथुनाविषयी वर दिलेल्या या तीन गोष्टी एकदा समजल्या व मान्य झाल्या कि मग आपल्याला पुढच्या टप्प्यावर जाता येते. पुढच्या टप्प्यावर मग 'स्त्रिया हस्तमैथुन कसे करतात?', 'स्त्रियांचे आणि पुरुषांचे हस्तमैथुन यात काय फरक असतो?' आणि 'स्त्रियांच्या हस्तमैथुनाविषयी असणारे गैरसमज' या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे.
स्त्री व पुरुष यांच्या लैंगिक अवयवांविषयी आपण मागच्या अनेक लेखांत सविस्तर माहिती पाहिलेली आहेच. पुरूष हस्तमैथुन करताना त्यांचे शिश्नदंड हाताच्या मुठीत धरून शिश्नमुंडावरील त्वचा मागे पुढे करतात किंवा शिश्नबंध, शिश्नमुंड यांना स्पर्श करून किंवा घर्षण घडवून आणून हस्तमैथुन करतात. तसे स्त्रिया त्यांच्या योनीमार्गाच्या वर असणाऱ्या शिश्निकेला स्पर्श करून व शिश्निकामुंड, शिश्निकाबंध, स्तनाग्रे, योनीमार्गाजवळ असणारे लघुभगोष्ठ यांना घर्षण घडवून आणून हस्तमैथुन करतात. हस्तमैथुनाच्या वेळी पुरुषांना शिश्नाच्या उद्दीपनाने ज्या कामसंवेदना प्राप्त होतात व कामआनंद मिळतो; तशी कामसंवेदना व कामआनंद स्त्रियांना शिश्निकेच्या व लघुभगोष्ठच्या उद्दीपनाने मिळतो.
कामभावनेतून पुरुषांच्या शिश्नाला जशी ताठरता येते, तशी स्त्रियांच्या योनीमार्गाला येत नाही. मात्र काही प्रमाणात फुगीरता शिश्निकेमध्ये काही वेळासाठी जाणवू शकते. पुरुषांमध्ये वीर्यमुक्ती होऊन हस्तमैथुनाचा शेवट होतो व त्यातून पुरुषांना कामतृप्ती मिळते. तसे स्त्रियांमध्ये कोणताही स्राव बाहेर येत नाही. अनेकदा कामतृप्तीच्या एका क्षणाला स्त्रियांच्या योनीमार्गात द्रव पदार्थ स्रवून ओलसरपणा येतो, त्याला 'कामसलील' असे म्हणतात. पण हे कामसलील प्रत्येक वेळी स्त्रवेलच असे नाही आणि कामसलील शिवाय सुद्धा स्त्रियांना कामतृप्ती मिळू शकते. पुरुषांना मात्र वीर्यमुक्तीतूनच कामतृप्ती प्राप्त होते, तसे स्त्रियांचे नाही.
पुरूषांच्या हस्तमैथुनाचे जसे शिश्न हातात धरून मागे पुढे करणे, बोटांनी शिश्नमुंड किंवा शिश्नबंध उद्दीपित करणे किंवा झोपून बिछान्याला किंवा उशीला घर्षण करणे असे वेगवेगळे प्रकार आहेत; तसेच स्त्रियांचे सुद्धा हस्तमैथुनाचे वेगवेगळे प्रकार आहेत. हाताने शिश्निकेवर सौम्य दाब देऊन तिचे मर्दन करणे, तिच्या आजूबाजूच्या त्वचेला स्पर्श करणे, खुर्चीवर बसून मांडीवर मांडी घालून पायांची हालचाल करणे, पायाच्या घोट्याने शिश्निका व लघुभगोष्ठ यांचे मर्दन करणे, शिश्निकेवर वाहत्या पाण्याचा फवारा सोडणे अशा अनेक प्रकारे स्त्रिया हस्तमैथुन करतात.
पुरुषांना जसे एकदा वीर्यमुक्ती झाली कि लगेच सहसा शिश्नदंडाला पुन्हा ताठरता येत नाही (कधीकधी एखाद्याला येऊ शकते, पण नेहमी येऊ शकत नाही), तसे स्त्रियांना मात्र एकापाठोपाठ अनेकदा पण कामतृप्तीचा अनुभव येऊ शकतो (प्रत्येक वेळी येईलच असे नाही).
पुरुष हस्तमैथुन करताना काय कल्पना करत असतील? आणि स्त्रिया काय कल्पना करत असतील? हा प्रश्नही अनेक स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या मनात असतोच. तर मुळातच स्त्री आणि पुरुष यांच्या लैंगिक आनंदाच्या कल्पनाच वेगवेगळ्या असल्याने त्यांच्या हस्तमैथुनावेळच्या कल्पना सुद्धा वेगवेगळ्याच असतात. पुरुषांना शिश्न-योनी संबंधांतूनच सर्वाधिक कामतृप्ती मिळत असते; पण स्त्रियांना मात्र शिश्न-योनी संबंधांपेक्षा हस्तमैथुन किंवा मुखमैथुन यातूनच सर्वाधिक कामतृप्ती मिळत असते. शिवाय स्त्रियांना जरी हस्तमैथुन किंवा मुखमैथुन यांतून जास्त कामतृप्ती मिळत असली तरी त्यांना त्याविषयी फारसे आकर्षण नसते. स्त्रियांना आपल्या आवडत्या पुरुषासोबत सहवास, संभाषण, स्पर्श, शृंगार, आलिंगन, चुंबन यांविषयी जास्त आकर्षण असते व यात जास्त आनंद मिळत असतो. त्यामुळे पुरूष हस्तमैथुन करताना मनात कुठल्याही स्रीसोबत शिश्न-योनी संबंधांच्या कल्पना करत असतात; तर स्त्रिया मात्र हस्तमैथुन करत असताना आवडत्या पुरुषासोबत सहवास, संभाषण, स्पर्श, आलिंगन, मिठी, चुंबन यांची कल्पना करत असतात. याचा अर्थ स्त्रियांना शिश्न-योनी संबंध आवडत नाहीत असा नाही. त्यामध्ये सुद्धा त्यांना आनंदच मिळतो; मात्र त्यासोबत भावनिक ओलावा, आदर, प्रेम, काळजी, विश्वास असणे त्यांच्यासाठी जास्त महत्वाचे असते. अनेकदा मागे कधी एखाद्या आपल्या आवडत्या पुरुषासोबत झालेल्या सहवास, स्पर्श, आलिंगन, चुंबन किंवा लैंगिक संबंध यातलं काहीही जे आनंददायी वाटलं असेल ते सुद्धा पुन्हा पुन्हा आठवून स्त्रियांना हस्तमैथुन करायला आवडू शकते.
मुळात पुरुषांना संभोगातच कामतृप्ती मिळत असल्याने हस्तमैथुनात पण तीच कल्पना केली जाते; तसे स्त्रियांना कामतृप्ती साठी संभोगाची गरज नसल्याने ती कल्पना केली जात नाही.
स्त्रियांच्या हस्तमैथुनाविषयी मोठा गैरसमज हा आहे कि स्त्रिया आपल्या योनीमार्गात बोटे घालून किंवा डिल्डो किंवा इतर शिश्न सदृश वस्तू किंवा पदार्थ योनीमार्गात घालून हस्तमैथुन करतात. ही खरंतर फक्त पुरुषी कल्पना आहे. स्त्रियांना मुळातच योनीमार्गात कामसंवेदना जास्त नसतात व त्या तुलनेत शिश्निकेमध्ये खूप जास्त कामसंवेदना असतात. त्यामुळे योनीमार्गापेक्षा शिश्निकेला स्पर्श करणे त्यांना जास्त कामआनंद देणारे असते. अर्थात शिश्निकेला सुद्धा जास्त घर्षण झाले तर वेदना होऊ शकतात, त्यामुळे हलक्या हाताने स्पर्श करणे गरजेचे असते.
एकूण स्त्रियांनी आणि पुरुषांनी एकमेकांच्या लैंगिक भावना व हस्तमैथुनातील फरक लक्षात घेऊन दोघांनीही एकमेकांच्या लैंगिक भावनांचा आदर करायला हवा व एकमेकांच्या हस्तमैथुन या नैसर्गिक पर्यायाचा सुद्धा स्विकार आणि आदरच करायला हवा.
- सचिन (8424041159)
ईमेल : srthite@yahoo.co.in
(आपल्या प्रतिक्रिया, मतं, अनुभव किंवा शंका, प्रश्न वरील नंबर वर व्हाट्सअप्प करून किंवा ईमेल द्वारे नक्की कळवा.)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा