पर्व 3 - 'सेक्स'वर बोलू काही- (भाग 14) हस्तमैथुन करत नसाल तर सावधान!!! हस्तमैथुनाचे फायदे

लेखाचे शिर्षक वाचून अनेकजण दचकले असतील. कारण आपण आत्तापर्यंत याच्या अगदी उलट ऐकत आणि समजत आलेलो असतो. 'हस्तमैथुन करत असाल तर सावधान!!' या भितीतच आत्तापर्यंत आयुष्य जगत आलेलो असताना अचानक हे याच्या उलट कसं काय? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर हे अगदी खरं आहे. आत्तापर्यंत आपल्याला एका चुकीच्या भितीत इतकं गुरफटवून टाकलेलं आहे कि यातलं नेमकं सत्य काय हेसुद्धा आपल्याला कळू दिलेलं नसतं. आज आपण हीच दुसरी बाजू पाहणार आहोत.

हस्तमैथुन करणे ही मानवी कामविकासातील एक महत्वाची पायरी असते. खरंतर लग्न करण्याआधीची एक पूर्वअट म्हणूनच हस्तमैथुनाकडे पाहायला हवे. ज्या पुरुषाने लग्नाआधी एकदाही हस्तमैथुन केलेले नाही, त्याला लग्नानंतर लैंगिक संबंधांबाबत सुद्धा तक्रारी येण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. हस्तमैथुन करताना शिश्नमुंडावरील त्वचा हाताने मागे-पुढे केली जाते. तसेच लैंगिक संबंधांमध्ये सुद्धा शिश्न योनीमार्गात प्रवेश केल्यानंतर शिश्नाचे योनीमार्गाशी घर्षण होत असताना शिश्नमुंडावरील त्वचा मागे पुढे होणे गरजेचे असते. जर आधी एकदाही हस्तमैथुन केलेले नसेल किंवा क्वचितच केलेले असेल तर प्रत्यक्ष लैंगिक संबंधाच्या वेळी शिश्नमुंडावरील त्वचा एकतर मागे होत नाही किंवा खूप त्रासदायक होते व त्यामुळे वीर्यस्खलन होण्याआधीच शिश्न ढिले पडते. त्यामुळे अशा पुरुषांची लिंगाची ताठरता सुद्धा जास्त काळ टिकत नाही. मागच्या लेखात नमूद केल्याप्रमाणे जवळपास जगभरातील सगळेच पुरूष कमीअधिक प्रमाणात हस्तमैथुन करत असतात. यामध्ये हस्तमैथुन न करणारे उरलेले जे काही मोजके पुरूष असतात, त्यांना एक तर मुळातच कामेच्छा कमी असते किंवा हस्तमैथुनाची भिती मनात जास्त बसल्याने ते हस्तमैथुन करत नाहीत. अशा हस्तमैथुनाची सवयच नसणाऱ्या पुरुषांना लैंगिक संबंधाच्या वेळी सुद्धा वीर्यस्खलन होत नाही. त्यांना झोपेत असताना वीर्यस्खलन होऊ शकते; पण जागृतावस्थेत वीर्यस्खलन होत नाही. अशा पुरुषांना नैसर्गिकरित्या पितृत्व प्राप्त होण्यासाठी सुद्धा पुढे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. नियमित हस्तमैथुन केल्यामुळे शिश्नमुंडावरील त्वचा सैल राहते व प्रत्यक्ष संबंधांच्या वेळी योनीमार्गात शिश्न मागे पुढे करताना सहजता येते. तसेच लिंगाला ताठरता येण्यात सुद्धा अडचण येत नाही व ती तुलनेने अधिक काळ टिकून राहण्यास सुद्धा मदत होते.
हस्तमैथुन हा कामविकासाचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून याकडे पाहायला हवे. हस्तमैथुन करत असणे हे सेक्सविषयी आकर्षण असण्याचे व सेक्स करण्याची क्षमता असण्याचे एक साधे प्राथमिक द्योतक मानायला हरकत नाही. जे हस्तमैथुन करत नाहीत, त्या पुरुषांनी किंवा त्यांच्याशी लग्नाचा विचार करणाऱ्या मुलींनी अधिक काळजी घ्यायला हवी. त्याची कारणे समजून घ्यायला हवीत. हस्तमैथुनाची मनात भिती आहे म्हणून करत नाही कि मुळातच सेक्सविषयी इच्छाच कमी आहे कि इतर काही समस्या आहेत? हे जाणून घ्यायला हवे. खरंतर दोन्हीपैकी कोणतेही कारण असले तरी पुढे सेक्स करताना अडचणी येणार हे नक्कीच आहे; पण किमान फक्त भितीपोटी हस्तमैथुन करत नसेल तर ती भिती घालवून मग हस्तमैथुन करता येतंय का ते पाहायला हवं.
हस्तमैथुन हा जीवनातील संघर्ष, वैफल्य, मानसिक ताण यांना वाट मोकळी करून देणारा व शरीराचा आणि मनाचा थकवा घालवणारा एक हुकमी उपाय आहे. याचा ना स्वतःच्या शरिरावर किंवा मनावर काही वाईट परिणाम होतो, ना दुसऱ्याच्या शरिरावर किंवा मनावर. शिवाय यामध्ये इतर कुणाची गरजही नसते. लग्न होण्याची किंवा लग्नाचा जोडीदार सोबत असण्याची ही गरज नसते. आपल्याला हवं तेव्हा एकांतात हवा तेवढा आनंद आणि तोही मोफत घेता येण्याजोगी ही गोष्ट आहे.
मनातील नैसर्गिक कुतूहल आणि लैंगिक इच्छा भागवण्याची हस्तमैथुन ही एक अगदी साधी, सोपी व सहजसाध्य क्रिया आहे. हस्तमैथुन केल्याने मनातील लैंगिक भावनांचा निचरा होतो व मन आणि शरीर हलकं झाल्याचा आल्हाददायक फील येतो. इतर कुणावरही जबरदस्ती न करता व वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांकडे सुद्धा न जाता घरच्या घरी स्वतःच्या भावनांना मोकळीक करून देण्याचा हा उत्तम मार्ग आहे. हस्तमैथुनामुळे लैंगिक भावना वेळोवेळी शमवल्या जात असल्याने कुणावरही जबरदस्ती करण्याची इच्छा बळावत नाही व त्यामुळे बलात्काराच्या घटना सुद्धा कमी व्हायला मदत होते. शिवाय एच आय व्ही एड्स किंवा लैंगिक संबंधांतून पसरणाऱ्या इतर आजारांपासून सुद्धा दूर राहता येते. हस्तमैथुन करणारे पुरुष व स्त्रिया लैंगिक संबंधांमध्ये सुद्धा ऍक्टिव्ह असतात. शिवाय जरी आपल्या जोडीदाराकडून लैंगिक आनंद पुरेपूर मिळू शकला नाही किंवा जोडीदार काही काळ आपल्यापासून दूर आहे किंवा काही काळ लैंगिक संबंध ठेवता येणे शक्य नाही किंवा जोडीदाराची इच्छा नाही अशा सर्व वेळी जोडीदारावर सुद्धा सक्ती, जबरदस्ती न करता, चिडचिड न करता आपला आनंद आपला आपण मिळवून घेऊ शकतो. 'आपला (लैंगिक) आनंद आपल्याच हाती' हे सूत्र इथे एकदम परफेक्ट लागू होते.
टेस्ट ट्यूब बेबी हवी असणाऱ्या पुरुषांना किंवा वंध्यत्वाची समस्या असणाऱ्या किंवा इतर कोणत्याही कारणासाठी वीर्य तपासणीसाठी गेल्यावर सुद्धा पुरूषांना हस्तमैथुन करूनच वीर्याचा नमुना द्यावा लागतो. त्यासाठी आधी हस्तमैथुनाची सवय असणे गरजेचे असते. अनेकदा नियमित सवय असणाऱ्या पुरुषांना सुद्धा त्यावेळी हस्तमैथुन करून वीर्य देणे हे अंगातून घाम काढणारे असते. तिथे नियमित सवय नसणाऱ्यांची तर काय हालत होईल?
यावरून एक लक्षात आले असेल कि हस्तमैथुन करणाऱ्यांना त्याचा काहीच तोटा किंवा अपाय नाही; पण हस्तमैथुन न करणाऱ्यांना मात्र त्याचे अनेक तोटे होऊ शकतात. त्यामुळे 'हस्तमैथुन करत नसाल तर सावधान!' हा इशारा सर्वांनीच गांभीर्याने घ्यायला हवा.

- सचिन (8424041159)
ईमेल: srthite@yahoo.co.in

(आपल्या प्रतिक्रिया, अनुभव किंवा मतं शेअर करायची असतील तर वरील नंबर वर व्हाट्सअप्प करून किंवा ईमेल द्वारे जरूर कळवा.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध