पर्व 3 - 'सेक्स'वर बोलू काही- भाग 13 - हस्तमैथुनाविषयी एक छुपे सार्वत्रिक सत्य व अतिहस्तमैथुनाचे (विशेषतः पुरुषांच्या) दुष्परिणाम

हस्तमैथुन करणे अगदी नॉर्मल आणि नैसर्गिक असते हे आपण आत्तापर्यंत पाहिले. खरंतर आपल्या मनात हस्तमैथुनाविषयी भिती आणि न्यूनगंड येण्याचे कारण बहुतेकदा हेच असते कि आपण जे करतोय ते इतर कोणीच करत नसावं असं आपल्याला वाटत असतं. कारण आपल्या आजूबाजूला इतर कोणीच याविषयी मोकळेपणाने बोलत नसतं. चुकून कुणी बोललंच, तर तेसुद्धा 'हस्तमैथुन करणे कसे चुकीचे आहे' याविषयीच बोलताना आपण ऐकत असतो. इतरवेळी फक्त मित्र-मैत्रिणींच्या लपूनछपून केलेल्या चावट गप्पांमधून याबद्दल आपल्यापर्यंत जे पोचत असतं, तेही अर्धवट आणि चुकीचंच जास्त असतं. अगदी 'हस्तमैथुन' हा शब्द सुद्धा आपल्याला यातील कशातूनच सहसा ऐकायला मिळत नाही. त्यामुळे आपणच काहीतरी जगावेगळं चुकीचं कृत्य करतोय असं आपल्याला वाटायला लागतं आणि त्यातून भिती व न्यूनगंड वाढत जातो. त्यासाठी याबाबतीतले एक छुपे सार्वत्रिक सत्य आपण सर्वांनी समजून घ्यायला हवे. ते म्हणजे- 
*'जगभरातील पुरुषांमध्ये काही अपवाद वगळता जवळपास सर्वच पुरूष वयात आल्यापासून हस्तमैथुन करत असतात. तर स्त्रियांमध्ये साधारण साठ टक्केपेक्षा जास्त स्त्रिया हस्तमैथुन करत असतात.'* ही आत्तापर्यंत जगभरातल्या अनेक सर्वेमधून पुढे आलेली आकडेवारी आहे. (यामध्ये स्त्रियांचे प्रमाण कमी असण्याचे कारण अर्थातच एकूणच स्त्रियांच्या जगण्यावर, विचारांवर आणि त्यातल्या त्यात लैंगिक बाबतीत तर टोकाची असणारी बंधनं हे आहे. अलीकडे मात्र स्त्रियांचे हे प्रमाण सुद्धा वाढत आहे.) पण अर्थातच हस्तमैथुनाविषयी मोकळेपणाने कबुली देण्याइतपत सामाजिक वातावरण आपल्याकडे अजून तयार झालेले नसल्याने "हो, मी हस्तमैथुन केले आणि करतो/करते" असं कबूल करणारे पुरुष व स्त्रिया दोन्ही खूप कमी असतात.
हे सत्य एकदा आपल्याला उमगले कि मग आपल्या मनातील भिती आणि न्यूनगंड दूर होऊन मोकळेपणा यायला मदत होते.
आता पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे- 'हस्तमैथुन किती वेळा करणे नॉर्मल असते?' हा प्रश्न सुद्धा आयुष्यात जवळपास सर्वांनाच कधीतरी पडलेला असतो. काहींना याचे 'योग्य' उत्तर लवकर मिळते, काहींना उशिरा तर काहींना शेवटपर्यंत याचे योग्य उत्तर मिळतच नाही. कोणीतरी बापू-बुवा ने सांगितलेलं असतं कि 'वर्षभरातून फार फार तर एक दोन वेळा हस्तमैथुन करणे योग्य असते.' तर कोणी गुरू-सद्गुरू सांगत असतात कि 'शक्य तेवढा कमीतकमी वेळ यामध्ये घालवायला हवा.' यामध्ये जास्त वेळ घालवणं किंवा जास्त वेळा करणं म्हणजे आयुष्याचा अनमोल वेळ वाया घालवणं असंही सांगणारे अनेकजण असतात. या सगळ्यातून अधिक दडपण, भिती वाटायला लागते आणि काही केल्या आपल्याला यावर नियंत्रण मिळवायला जमत नाहीये म्हणून निराशा यायला लागते व यातूनच स्वतःबद्दल किंवा स्वतःच्या या सवयीबद्दल अनेकदा न्यूनगंड सुद्धा मनात तयार व्हायला लागतात. त्यामुळे त्याही बाबतीत आज जरा स्पष्ट करून घेऊ.
पहिली गोष्ट म्हणजे हस्तमैथुन करणे ही अजिबात चुकीची गोष्ट नसल्याने व  ती निसर्गानेच करून दिलेली पर्यायी सोय असल्याने त्याचे कोणतेच दुष्परिणाम शरिरावर किंवा मनावर होत नाहीत. शिवाय हस्तमैथुन अमुक इतक्या वेळा करणे म्हणजे योग्य आणि अमुक इतक्या वेळा करणे म्हणजे अति किंवा अयोग्य असं काहीच नसतं. अगदी चार दिवसांतून एकदा हस्तमैथुन केले काय किंवा दिवसातून चार वेळा केले काय? त्याने काहीही वाईट परिणाम होत नाही. अति हस्तमैथुन केल्याने वीर्यक्षय होतो, वीर्य कमी होते किंवा विर्याचा साठा कमी होतो असे काही महाभाग सांगत असतात. पण लक्षात घ्या कि शरिरात वीर्याचा असा काही ठराविक साठवून ठेवलेला कोटा नसतो कि तो संपला म्हणजे आता शरीरातील वीर्य कमी झालं आणि त्याचा आता शरीरावर काहीतरी परिणाम होईल. शरीर हे जशी गरज पडेल तसं त्या त्या वेळी वीर्य तयार करत असतं. यासाठी दुसऱ्या महायुद्धात जर्मनीतील एका अधिकाऱ्याने वीस ज्यू तरुणांना रोज दिवसातून तीन वेळा हस्तमैथुन करण्याची सक्ती केल्याचे एक खूप मार्मिक उदाहरण डॉक्टर विठ्ठल प्रभूंनी नोंदवून ठेवलं आहे. अति हस्तमैथुन करून हे आपोआपच अशक्त होतील, मरतील किंवा काहीतरी आजार होतील असा यामागे हेतू होता. असं सलग एकवीस महिने चाललं. त्यानंतर युद्ध संपलं आणि या सर्व तरुणांना सोडून द्यावं लागलं. यातल्या एकालाही काही आजार झाले नाहीत. त्यांच्यातील ज्यांचे लग्न झाले त्यांना मुलं सुद्धा झाली. त्या अधिकाऱ्याच्या हस्तमैथुनाविषयीच्या या गैरसमजामुळे या वीस तरुणांना जीवदान मिळाले हे मात्र बरंच झालं. मला वाटतं हे उदाहरण अति हस्तमैथुनाविषयीची भिती घालवण्यासाठी पुरेसे ठरावे.
मुळात 'हस्तमैथुन किती करायला हवे?' यावर आपले शरीर स्वतःच नियंत्रण ठेवत असते. जेव्हा शरीर थकलेले असते तेव्हा प्रयत्न करूनही शिश्नात पुन्हा ताठरता येत नाही. हे एका दृष्टीने निसर्गाने ठेवलेले नियंत्रणच आहे. उलट जेव्हा मनात इच्छा असूनही आणि मेंदूकडून तसे वारंवार संदेश येऊनही हस्तमैथुन न करण्याचा अट्टाहास धरला जातो, तेव्हा अस्वस्थता जास्त वाढत असते.
एकूण काय तर- 'मनात कोणतीही भिती किंवा पापाची भावना न ठेवता मनसोक्त कितीही वेळा हस्तमैथुन केला तरीही त्यामुळे आरोग्यास काहीही अपाय होत नाही.'

हस्तमैथुनाविषयी अजून बऱ्याच गोष्टी पुढच्या लेखांतून समजून घेऊच.

- सचिन (8424041159)
ईमेल: srthite@yahoo.co.in

(आपल्या काहीही सूचना, प्रतिक्रिया किंवा अनुभव शेअर करायचे असतील तर व्हाट्सअप्प किंवा ईमेल वर नक्की कळवा.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध