पर्व 3- 'सेक्स'वर बोलू काही - भाग 11 - हस्तमैथुन म्हणजे काय? स्त्रिया व पुरुष हस्तमैथुन कसे करतात?

काही दिवसांपूर्वी माझ्या एका ऑनलाइन सत्रामध्ये एका मुलीने मला प्रश्न विचारला - "हस्तमैथुन म्हणजे काय?" - खरं तर अनेकांना हा प्रश्न अगदीच बालिश वाटू शकेल. 'हस्तमैथुन म्हणजे काय?' हे कुणाला माहिती नसणे शक्यच नाही असे वाटू शकेल. पण अनेकांना हस्तमैथुन म्हणजे नेमके काय हे माहीत नसते हे खरं आहे. त्यासाठी प्रत्येकाने स्वतःच्याच आयुष्याकडे जरी मागे वळून पाहिले तरी लक्षात येईल कि आपल्याला स्वतःला सुद्धा हस्तमैथुन या शब्दाची ओळख किती उशिरा आणि कशा प्रकारे झालेली असते ते. 
      आपल्याकडे एकूणच लैंगिकता व लैंगिक संबंध आणि त्यासंबंधित सर्व विषय हे झाकून ठेवण्याचे आणि उघडपणे कधी न बोलण्याचे विषय असल्याने हस्तमैथुन सारख्या विषयावर योग्य वयात योग्य ती माहिती मिळणे ही खूप अवघड गोष्ट झालेली आहे. अनेक किशोरवयीन मुले-मुली अगदी नकळतपणे अनेकदा अंतःप्रेरणेने हस्तमैथुन करण्यास सुरूवात करत असतात; पण याला हस्तमैथुन म्हणतात हे मात्र तेव्हा त्यांना माहीत नसते. म्हणूनच हस्तमैथुन विषयी लिहिताना अगदी बेसिक माहिती पासूनच सुरू करायला हवं असं मला वाटतं.
हस्तमैथुन या शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे. या शब्दाची फोड केली असता हस्त म्हणजे हात आणि मैथुन म्हणजे लैंगिक आनंदासाठी केलेली कृती. हाताच्या साहाय्याने लैंगिक आनंदासाठी केलेली कृती म्हणजे हस्तमैथुन. स्त्रिया व पुरुष आपल्या हाताच्या साहाय्याने स्वतःच्या किंवा इतरांच्या लैंगिक अवयवांना स्पर्श करून जो लैंगिक आनंद मिळवतात त्याला हस्तमैथुन म्हणतात.
पुरुषांच्या मनात जेव्हा लैंगिक भावना येतात तेव्हा त्यांच्या शिश्नामध्ये ताठरता यायला सुरूवात होते (अर्थात प्रत्येक वेळी लिंगाला आलेली ताठरता ही लैंगिक भावनांमुळेच असेल असे नाही). त्यामुळे शिश्नदंड ताठ आणि काहीसा कडक बनतो. या ताठरता आलेल्या शिश्नदंडावरील त्वचा हाताने मागे पुढे करून शिश्नमुंड व शिश्नबंध या भागांना घर्षण घडवून आणतात व त्यामुळे शरीर उत्तेजित होऊन एका क्षणाला वृषणामध्ये तयार झालेले वीर्य शिश्नाद्वारे बाहेर पडते व पुरुषांना कामतृप्ती मिळते.
तसेच स्त्रियांच्या मनात जेव्हा लैंगिक भावना येतात तेव्हा स्त्रिया आपल्या शिश्निका, शिश्निकामुंड व योनीचे बृहत(बाह्य)पटल आणि स्तन व स्तनाग्रे यांना स्पर्श करतात. काही वेळ असेच घर्षण करत राहिले कि त्यांचे शरीर उत्तेजित होऊन त्यांना कामतृप्ती मिळते.
पुरुषांच्या व स्त्रियांच्या या क्रियेलाच हस्तमैथुन असे म्हणतात. हेच हस्तमैथुन जेव्हा इतर कुणाच्या हाताच्या साहाय्याने केले जाते तेव्हा त्याला 'परहस्तमैथुन' असे म्हणतात.

हस्तमैथुन हे फक्त हातानेच केले जाते असे नाही. त्याच्या वेगवेगळ्या पद्धती सुद्धा आहेत.

हस्तमैथुन विषयी अनेक शंका, प्रश्न, गैरसमज अनेकांच्या मनात असतात. हस्तमैथुन करावं कि करू नये? किती वेळा करावं? त्याचे दुष्परिणाम काय? या व अशा अनेक प्रश्नांविषयी पुढच्या काही लेखांमध्ये आपण बोलणार आहोत.

(तुमच्या मनात असे काही प्रश्न, शंका असतील तर नक्की माझ्यापर्यंत पोचवा. आपण त्या सर्वांवर इथे बोलण्याचा प्रयत्न करूयात.)

- सचिन (8424041159)
ईमेल:- srthite@yahoo.co.in

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध