पर्व 3- 'सेक्स'वर बोलू काही- भाग 10 - स्त्रियांच्या कामेच्छा व कामतृप्ती

मागच्या लेखात पुरुषांच्या लैंगिक आंनद व कामतृप्ती बाबत आपण पाहिलं. त्यामध्ये महत्वाचा रोल असणाऱ्या शिश्न, शिश्नदंड, शिश्नमुंड व शिश्नबंध यांच्याबद्दल सुद्धा माहिती घेतली. आता स्त्रियांच्या कामेच्छा व कामआनंद किंवा कामतृप्ती याबाबत या लेखात समजून घेऊयात. 
स्त्रियांना नेमका कशाने जास्त आनंद मिळतो? यावर आजपर्यंत समाजात बऱ्यापैकी गूढच आहे. त्यामुळेच याविषयी अनेक गैरसमज सुद्धा पसरलेले असतात. त्यापैकी काही म्हणजे- 'स्त्री सेक्स मध्ये कधीच खुश होऊ शकत नाही.' 'स्त्रियांची सेक्स भावना ही पुरुषांच्या कित्येक पटीने जास्त असते, त्यामुळे एक पुरुष कधीच स्त्रीला सेक्सचा पुरेपूर आनंद देऊ शकत नाही.' अशा प्रकारच्या अनेक गैरसमजांमुळेच 'पुरुषाने कितीही प्रयत्न केला तरी स्त्री नेहमीच अतृप्तच राहते आणि राहणार' असा एक ढोबळ समज दृढ झाला आहे. आणि मग त्यामुळे स्त्रियांच्या आनंदाकडे, त्यांच्या कामतृप्तीकडे फारसे प्राधान्याने कधी पाहिलेच जात नाही. 'स्त्रियासुद्धा सेक्स मुळे तृप्त होऊ शकतात' हेच अनेक पुरुषांच्या कधी मनातही येत नसल्याने त्याविषयीचे प्रयत्न करणे दूरच राहते. शिवाय स्त्रियांवर सुद्धा पिढ्यानपिढ्या जे संस्कार केले आहेत, त्यातून- स्त्रियांनी कधीच सेक्स विषयी स्वतःहून मागणी करायची नाही, नवऱ्याकडून जो काय मिळेल त्या आनंदातच समाधान मानत राहायचे. इतर कुणाकडून तर सोडाच; पण अगदी स्वतःच्या नवऱ्याकडून सुद्धा स्वतः होऊन कधी सेक्सची अपेक्षा व आग्रह करायचा नाही.- असे समज दृढ झाले आहेत.
सेक्सविषयी अतिरिक्त मागणी करणारी स्त्री म्हणजे 'चारित्र्यहीन स्त्री'. असंच आत्तापर्यंत आपण समाजात रुजवत आलेलो असल्याने स्त्रियांचा सुद्धा कल हा सेक्स विषयी स्वतःहून पुढाकार घेण्याचा किंवा सेक्सविषयी आग्रह धरण्याचा राहिला नाही.
आत्तापर्यंत सेक्स विषयी झालेले लेखन हे सुद्धा बऱ्यापैकी पुरुषांच्याच अँगल ने जास्त झाले.  या सगळ्यांतून अजून एक गोष्ट पुढे आली किंवा आवर्जून आणली गेली कि- 'स्त्रियांना फार सेक्समध्ये इंटरेस्ट नसतो किंवा स्त्रियांना सेक्स बद्दल फारशी ओढ नसते'. यामुळे ज्या स्त्रियांना मनातून खूप इच्छा असते, त्यासुद्धा समाजभयापोटी आपली ही इच्छा दाबून ठेवतात व त्यामुळे हा समज आणखीच दृढ होत जातो.
यात मुळात गल्लत जी होते ती सेक्स म्हणजे 'फक्त शिश्न-योनी संबंध' असे समजल्यामुळे. सेक्स म्हणजे फक्त शिश्न-योनी संबंध नसून त्याच्या मागे व पुढे बरंच काही असतं हे नीट समजून घेतलं तरच स्त्रियांच्या सेक्सविषयीच्या भावना व अपेक्षा दोन्ही व्यवस्थित समजून घेता येतील.
        बहुतांश स्त्रियांना शिश्न-योनी संबंधाबद्दल फारसे आकर्षण नसेलही व त्यातून त्यांना पुरेशी कामतृप्ती सुद्धा होत नाही हे अगदी खरं आहे. 'स्त्रियांची सेक्समधील कामतृप्ती नेमके कशी होते?' हे आपण मागे काही लेखांमध्ये विस्तृतपणे पाहिलेलेच आहे. पण याचा अर्थ स्त्रियांना कामेच्छा च नसते असा होत नाही. फक्त पुरुषांची कामेच्छा आणि स्त्रियांची कामेच्छा वेगळी असते एवढाच याचा अर्थ असतो.
पुरुषांना सेक्समध्ये तुलनेने शिश्न-योनी संबंधातूनच सर्वांत जास्त आनंद मिळत असतो आणि त्यातच त्यांची सर्वाधिक कामतृप्ती असते; त्यामुळे त्यांना साहजिकच त्याविषयीची ओढ जास्त असते. तसे स्त्रियांना शिश्न-योनी संबंधांपेक्षा शारीरिक स्पर्श, मिठी, चुंबन, हस्तमैथुन व मुखमैथुन यांतून जास्त आनंद मिळत असतो व त्यातून त्यांची कामतृप्ती सर्वांत जास्त होत असते. म्हणूनच स्त्रियांना पुरुषांबद्दल शारीरिक आकर्षणासोबत प्रेम, आदर, विश्वास, जिव्हाळा या गोष्टींचे जास्त आकर्षण असते. स्त्रीच्या कामतृप्ती साठी महत्वाचे असणारे स्त्रीच्या शरीराचे भाग आपण मागच्या काही लेखांत सविस्तर पाहिलेच आहेत. तरीही इथे फक्त त्यांचा उल्लेख पुन्हा एकदा करतो. शिश्निका, शिश्निकामुंड, बाह्यभगोष्ठ, आंतरभगोष्ठ, योनीमार्गातील सुरुवातीचा भाग आणि याचबरोबर स्तन, स्तनाग्रे, जघनशैल, कानाजवळचा मानेचा भाग व एकूणच शरीरस्पर्श आणि चुंबन, आलिंगन हे सर्व स्त्रियांना उत्तेजित करणारे व स्त्रियांच्या कामपूर्ती मध्ये महत्वाचा रोल असणारे अवयव व कृती आहेत.

सेक्स ही फक्त एक 'क्रिया' नसून ती एक 'कला' सुद्धा आहे हे लक्षात घेऊन ती शिकण्याचा प्रयत्न करायला हवा. सेक्स ही एक आनंद देण्याची व घेण्याची कला आहे. हे दोघांनी समजून घ्यायला हवे. यामध्ये पुरुषांनी आधी स्त्रियांना सेक्समध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी स्त्रीला अधिक रिलॅक्स, कम्फर्ट, सुरक्षित, मोकळं वाटेल अशी सुरुवात करायला हवी. स्त्रियांसाठी सेक्स ही फक्त घाईघाईने उरकण्याची गोष्ट नसून ती हळुवारपणे एकमेकांना उत्तेजित करत पुढे जाण्याची गोष्ट असते. ही स्त्रियांची भावना जर पुरुषांना ओळखता आली आणि त्यानुसार सेक्सच्या आधीचा रोमान्स, फोरप्ले आणि हळुवारपणे एकमेकांना उत्तेजित करत शिश्न-योनी संबंधांकडे जाण्याची कला साधता आली तर नक्कीच त्या स्त्रीला सुद्धा कामपूर्तीचा आनंद घेता येईल. शिवाय स्त्री मनापासून सेक्ससाठी तयार असेल व उत्तेजित असेल तर त्या पुरुषाला सुद्धा त्यातून अधिक कामपूर्ती मिळू शकेल. 
अर्थात यामध्ये त्या दोघा स्त्री-पुरुष जोडीदारांची कामेच्छा, त्यातील आवड/नावड, त्यांच्या स्वतःच्या कल्पना यांची सांगड व्यवस्थित बसणे गरजेचे आहे. नाहीतर कधी एखाद्या पुरुषाच्या हळुवारपणाने एखादी स्त्री उत्तेजित होण्याऐवजी कंटाळून झोपी जायची. किंवा एखाद्या स्त्रीला मुखमैथुन ही कल्पनाच सहन न होणारी असू शकेल. यासाठी आपल्या सेक्स लाईफमध्ये कोणतेही प्रयोग करण्याआधी दोघा जोडीदारांना एकमेकांची लैंगिक आवड नावड माहिती असणे खूप गरजेचे असते. त्यासाठी शक्य तेवढा एकमेकांशी सेक्सविषयी संवाद करायचा प्रयत्न करायला हवा. आपल्याला काय आवडतं व काय नाही आवडत हे जोडीदाराला विश्वासात घेऊन सांगायला हवे व त्याचवेळी आपल्या जोडीदाराला काय आवडते व काय आवडत नाही हे जोडीदाराला सुद्धा विचारून घ्यायला हवे. त्यानुसार एकमेकांना आनंद मिळेल असे वेगवेगळे प्रयोग दोघांनीही पुढाकार घेऊन एकमेकांसाठी एकमेकांच्या संगनमताने करायला हवेत.
एकूण काय तर - 'स्त्रियांना कामेच्छा कमी असते' असं समजायचं अजिबात कारण नाही आणि त्याचबरोबर 'स्त्रियांना कामतृप्ती सुद्धा मिळू शकते'; फक्त त्याचे मार्ग हे पुरुषांच्या कामतृप्ती च्या मार्गांपेक्षा वेगळे आहेत हे आपण लक्षात घेऊयात.

'स्त्रिया आणि सेक्स' याविषयी पिढ्यानपिढ्या जाणीवपूर्वक पसरवल्या गेलेल्या अनेक चुकीच्या समजांमुळे आजही अनेक स्त्रिया मोकळेपणाने आपल्या लैंगिक इच्छा व्यक्त करू शकत नाहीयेत व अनेक स्त्रिया आजही लैंगिक संबंधांच्या बाबतीत उदासीन आयुष्य जगतात हे आजचं विदारक सत्य आहे. हे सत्य मान्य करत असताना आता तरी जाणीवपूर्वक  जाहीररीत्या स्त्रियांच्या कामेच्छा व कामपूर्ती यांविषयीची आत्तापर्यंत केली गेलेली बोटचेपी मांडणी सुद्धा बदलायला हवी आणि नव्याने स्त्रियांच्या कामेच्छा विषयी स्पष्टपणे लिहायला, बोलायला हवे. तेव्हाच खऱ्या अर्थाने 'स्त्रिया आणि सेक्स' याविषयी समाजात रूढ झालेल्या चुकीच्या संकल्पनांना छेद देऊन नव्या, अधिक वास्तव संकल्पना पुढे आणता येतील.

- सचिन (8424041159)
ईमेल: srthite@yahoo.co.in

(आपल्या प्रतिक्रिया, अनुभव, मतं शेअर करायचे असतील, तर वरील व्हाट्सअप्प नंबर वर किंवा ईमेल वर जरूर शेअर करा.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध