शेअरिंग-केअरिंग - 31 - मासिक पाळी इज 'नॉट हॅपी टू ब्लीड'

मासिक पाळी ही काही आनंदाची गोष्ट नाही. त्यामुळे ती सेलिब्रेट करण्याची सुद्धा गोष्ट नाही असं माझं स्पष्ट मत आहे. मासिक पाळी ही सर्वच स्त्रियांना त्रासाचीच बाब असते आणि त्यामुळे 'हॅपी टू ब्लीड' म्हणणाऱ्या किती स्त्रिया/मुली स्वतः 'ब्लीड' करताना 'हॅपी' असतात हा एक सर्वेक्षणाचा मुद्दा असेल. माझ्या मते जे जसे आहे, ते तसे स्विकारण्यात यायला हवे. मासिक पाळी दरम्यान प्रत्येक स्त्रीला त्रास होतोच. काही स्त्रियांना तो अगदी असह्य असतो, अगदी पोट धरून रडणाऱ्या, विव्हळणाऱ्या ही मुली/स्त्रिया असतात; तर काही स्त्रियांना होणारा त्रास हा सहन करण्याजोगा असतो. अगदीच जास्त त्रासदायक नसतो. काही स्त्रियांना मासिक पाळी दरम्यान खूप जास्त रक्तस्त्राव होतो, तर काही स्त्रियांना तो कमी प्रमाणात होतो. काही स्त्रियांची मासिक पाळी ही चार दिवसांपेक्षा जास्त लांबणारी असते, तर काही स्त्रियांची चार दिवसांचीच असते. काही स्त्रियांची मासिक पाळी नियमित असते, त्यामुळे त्यांना बरोबर तशा अंदाजाने नियोजन करता येते व तयारीत राहता येते; तर काही स्त्रियांची मासिक पाळी ही इतकी अनियमित असते कि त्यांच्या मनात सतत टांगती तलवार व यामुळे सतत मानसिक ताण असतो. मुळातच मासिक पाळी येणे हेच स्त्रियांसाठी जास्त अडचणीचे, गैरसोयीचे व मनाविरुद्ध असणारे असते. यामुळे स्त्रियांना अनेक गोष्टींपासून लांब राहावे लागते. परंपरेने लादलेल्या सगळ्या चुकीच्या गोष्टी सोडून दिल्या, तरी सुद्धा स्वतःला होणारा त्रास, मूड स्विंग्ज व थकवा या सगळ्यामुळे उत्साहच न राहिल्याने अनेक गोष्टी करता येत नाहीत. कुठेतरी मित्र-मैत्रिणींत किंवा इतर ठिकाणी मस्त मज्जा करत असताना अचानक जर मासिक पाळी आल्याची जाणीव झाली, तर तिचा सगळा मूड तिथेच निघून जातो; कारण तिला ते सगळं सोडून पहिलं तिथून निघावं लागतं व कपडे चेंज करणे, पॅड लावणे या गोष्टी कराव्या लागतात. हे कुणालाच आनंददायी वाटू शकत नाही. आपण एखाद्या गोष्टीत जेव्हा पूर्ण रमलेले असतो, तेव्हा साधं कोणी मध्येच हाक मारलेली सुद्धा आपल्याला अनेकदा सहन होत नाही, तिथं अचानक पाळी आल्याची जाणीव झाल्यावर मात्र हे सगळं सोडून इच्छा नसताना मनाविरुद्ध तिथून उठून जावं लागणं आणि हे सगळे पाळीचे सोपस्कार करत बसणे हे वास्तविक पाहता कुणालाच न आवडणारेच असते. उलट अनेकदा ही पाळी मुलींना खूप चीड आणणारी असते. काही मुलींच्या चिडचिडेपणा मागे मासिक पाळीची अनियमितता व त्यामुळे सतत होणारे मूड स्विंग्ज हेसुद्धा कारण असते.

त्यामुळे एकीकडे मासिक पाळी ही अपवित्र गोष्ट नसून ती स्त्रियांना निसर्गाने मातृत्वासाठी दिलेली एक सोय आहे हे लक्षात घेत असतानाच उगाच तिला पावित्र्य वगैरे द्यायची पण काही गरज नाही. पाळीला पावित्र्याच्या संकल्पनांमध्ये अडकवून स्त्रियांच्या मनातील मूळ भावनांनाच नजरअंदाज केल्यासारखे होऊ शकते.

त्यामुळे मासिक पाळीला ती जशी आहे तशी पाहायला व स्विकारायला शिकायला हवं.

मासिक पाळीबाबत जनजागृती करायला हवी हे नक्कीच मान्य आहे व त्यासाठी आजच्या 'मासिक पाळी स्वच्छता दिन' सारख्या काही दिवसानिमित्ताने ते अधिक प्रमाणात करता येण्यासारखे आहे हेही खरेच आहे व मान्य ही आहे. त्यामुळे यानिमित्ताने प्रबोधन करणाऱ्या सर्वांचे कौतुक करावे तितके कमीच आहे. फक्त प्रबोधन करणे आणि याला सण-उत्सव किंवा वाढदिवसासारखे साजरे करणे आणि याच्या एकमेकांना शुभेच्छा देणे हे जरा अतीच झाले. आपण आनंददायी दिवस साजरे करतो, दुःख/ त्रास देणारे नाही. त्यामुळे या दिवशी शुभेच्छा चा मेसेज पाठवण्याऐवजी एखादा पाळी विषयी माहिती देणारा प्रबोधनाचा मेसेज पाठवणे हे जास्त संयुक्तिक ठरू शकेल असे वाटते.

*मासिक पाळी ही मुलांना जन्म देण्यासाठी अत्यावश्यक असल्याने तिला तुच्छतेने न लेखता तिच्याकडे आदराने पाहायला हवे.* 
त्याचवेळी 
*मासिक पाळी स्त्रियांसाठी प्रचंड त्रासदायक व त्यांना डिस्टर्ब करणारी असल्याने त्यावेळी तिला अधिक काळजीची व मानसिक आधाराची गरज असते हेही लक्षात घ्यायला हवे.*

मासिक पाळी ही आनंद देणारी गोष्ट नसली तरी ती या जगातील सर्व मानवजातीच्या जन्माचे कारण असल्याने तिच्याबाबत प्रत्येक मानवाने नेहमी कृतज्ञ राहावे अशी गोष्ट आहे हे लक्षात घ्यायला हवे.

आणि त्यामुळेच 
*मासिक पाळीतील त्रास सहन करून सुद्धा या जगाच्या निर्मितीची प्रक्रिया फक्त स्त्रियांमध्येच होऊ शकते आणि त्या अर्थाने साऱ्या जगाची निर्मिक असणारी ही मासिक पाळी आपल्याला लाभलीय या भावनेने स्त्रियांना सुद्धा स्वतःबाबत अभिमान वाटावा अशी ही गोष्ट आहे.*
म्हणजेच मासिक पाळी ही 'हॅपी टू ब्लीड' नसली तरी 'थँक्स टू ब्लीड' असं म्हणून सर्वांनीच तिच्याप्रती कृतज्ञ राहून त्यासाठी त्रास सहन करणाऱ्या स्त्रियांप्रति सुद्धा हीच कृतज्ञतेची भावना ठेवण्याची गरज आहे व त्यासाठी त्याकाळात लागेल ती मदत आपल्या आजूबाजूला असणाऱ्या स्त्रियांना करण्याची गरज आहे.

शेवटी आपण याला कितीही पावित्र्य, हॅपीनेस वगैरे संकल्पना मध्ये घालायचं म्हटलं तरी जेव्हा प्रत्यक्ष त्रास सहन करायची वेळ येते, तेव्हा या अभिमान, पावित्र्य वगैरे सगळ्या गोष्टी गळून पडतात. हे सत्य सुद्धा लक्षात ठेवूनच चालूयात. शेवटी म्हणतात ना- ज्याचं जळतं, त्यालाच कळतं. तसंच इथं सुद्धा- *'जिचं दुखतं, तिलाच ते कळत असतं'* याची किमान जाणीव सतत जागी ठेवत राहुयात. 

*'पावित्र्य आणि आनंददायी भावनांचे चित्र उभं करण्याच्या नादात स्त्रीच्या मूळ वेदनांचाच विसर पडायला नको'* यासाठी हा सगळा उपद्व्याप.

- सचिन (8424041159)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध