पर्व 3- 'सेक्स'वर बोलू काही- भाग 9 (लग्नानंतरचे लैंगिक असमाधान व पुरुषांची कामतृप्ती)
'लैंगिक असमाधान' व 'लैंगिक इच्छांचा जोडीदारावर होणारा अतिरेक' या दोन्ही समस्या गंभीर असून आजही अनेकजण या समस्यांना तोंड देत आहेत. आजकाल येणाऱ्या अनेक फोन व मेसेज मधून या समस्येबाबत व या समस्येतून जात असणाऱ्या बहुसंख्य स्त्री-पुरुषांबाबत अधिकच काळजी वाटायला लागलीय. 'नजरेआड सृष्टी' असं जे आपल्याकडे नेहमी म्हणतात ना, अगदी तसं या लैंगिक समस्यांच्या बाबतीत झालेलं आहे. आपण डोळे उघडून बघत नाही ना, तोपर्यंत सगळं 'मस्त चाललंय आमचं!' अशा स्टाईल मध्ये जगणं असतं सर्वांचं. पण डोळसपणे पाहायला गेलं तर जेव्हा कुठं बोलण्याची खात्रीपूर्वक जागा दिसेल, तेव्हा अनेकजण याविषयी आपल्या समस्या मांडत असतात. अर्थात अशा विषयावर कुणाशी बोलावं अशी खात्रीलायक माणसं सुद्धा खूप कमीच असतात आपल्या आजूबाजूला म्हणा. त्यामुळे सहसा याबाबतीत सगळ्यांची चुप्पीच असते. विषयच असा कि कुणाला सांगायची, बोलायची सोयच नसते. सांगितलं तरी ते समजून घेतील, गुपित ठेवतील व काही मदत करतील याची शक्यताही कमीच. अगदी आपल्या आई-वडिलांशी सुद्धा याविषयी बोलता येत नाही. तुलनेने पुरुषांची स्थिती पुरुषप्रधान व्यवस्थेमुळे जरा तरी बरी आहे; पण स्त्रियांना तर अगदी आपल्या जोडीदाराला सुद्धा आपल्या लैंगिक इच्छांविषयी मोकळेपणाने सांगता येत नाही किंवा लादल्या जाणाऱ्या सक्तीच्या संबंधांविषयी ठामपणे नकार ही देता येत नाही. इतर कुणाशीही त्यांना आपल्या या त्रासाविषयी बोलता येत नाही. त्यामुळे एकतर गपगुमान आपली इच्छा दाबून जगणं किंवा स्वतःला ओरबाडून, हिसकावून, जबरदस्तीने केल्या जाणाऱ्या समाजमान्य बलात्काराला 'नशीब' मानत सहन करत राहणं. एवढंच त्यांच्या हाती उरतं. यातल्या दुसऱ्या मुद्द्याविषयी आपण नंतर पुढे बोलूच. त्याआधी स्त्री-पुरुष दोघांचेही 'लैंगिक असमाधान' व त्यावर काय उपाय करता येऊ शकतात? या मुद्द्यावर बोलूयात.
इथं आणखी एक गोष्ट लक्षात घेऊयात कि लैंगिक इच्छा व ती पूर्ण न झाल्याने येणारे असमाधान हे फक्त लग्नानंतरच असतं असं नाही, तर लग्नाच्या बऱ्याच आधीपासूनच याची सुरुवात होते. लग्नाआधीची लैंगिक इच्छा, असमाधान व त्यावरचे उपाय यावर सुद्धा स्वतंत्रपणे भरपूर बोलता येईल. आज आपण लग्नानंतर स्त्री-पुरुषांमध्ये असणारे लैंगिक असमाधान या मुद्द्यापासून सुरुवात करूयात.
लैंगिक असमाधानाच्या मुद्द्यावर बोलताना आधी आपल्याला स्त्री व पुरुषांचे लैंगिक समाधान नेमके कशात असते, कसे होते हे पाहायला हवे. त्याकरता स्त्री व पुरुष यांच्या लैंगिक अवयवांविषयी आपण अगदी बारकाईने व सविस्तर माहिती मागच्या काही लेखांमध्ये पाहिलेली आहे. ते व्यवस्थित समजून घेऊन व त्या माहितीला समोर ठेवूनच आपण बोलूयात. या माहितीतून आपल्या आत्तापर्यंत हे लक्षात आलेले आहे कि पुरुषाच्या बाह्य लैंगिक अवयवांमध्ये शिश्नदंड, शिश्नमुंड, शिश्नबंध व वृषणकोश हे अवयव असतात; तर स्त्रीच्या बाह्य लैंगिक अवयवांमध्ये बाह्य/बृहतभगोष्ट, आंतर/लघुभगोष्ट, शिश्निका (त्यात शिश्निका मुंड व शिश्निका बंध), योनीमार्ग व मूत्रमार्ग हे अवयव असतात. तसेच स्त्री व पुरुष दोघांमध्येही अनुक्रमे शिश्निका व शिश्नाच्या वर जो भाग असतो त्याला जघनशैल असे म्हणतात.
आता कामपूर्ती होण्यामध्ये किंवा लैंगिक समाधान मिळण्यामध्ये या सर्व अवयवांचा कसा रोल असतो ते समजून घेऊयात.
पुरुषांमध्ये जेव्हा त्यांच्या मनात लैंगिक भावना येतात, तेव्हा त्यांच्या शिश्नदंडामध्ये ताठरता यायला सुरुवात होते. त्यानंतर शिश्नदंड व शिश्नदंडाच्या पुढच्या टोकाला असणारे शिश्नमुंड आणि शिश्नमुंडाच्या बुडाशी असणारे शिश्नबंध यांना केल्या गेलेल्या स्पर्शामुळे व घर्षणामुळे पुरुषांना कामआनंद मिळत असतो. याच वेळी या आनंदाच्या एका टप्प्यावर पुरुषाच्या वृषणांमध्ये तयार झालेल्या वीर्याला उत्तेजना मिळून ते पुरुषाच्या मूत्रमार्गातून बाहेर येते व पुरुषांची कामपूर्ती होते. म्हणजेच पुरूषांचे शिश्नदंड, शिश्नमुंड व शिश्नबंध हे पुरुषांना कामतृप्ती मिळवून देण्यात महत्वाचा रोल निभावतात. हस्तमैथुन करताना सुद्धा जेव्हा शिश्नदंडाची त्वचा स्वतःच्या हाताने मागे-पुढे केली जाते, तेव्हा या तिन्ही भागांना होणारा स्पर्श व घर्षण यामुळे पुरुषांना कामआनंद मिळतो व त्या आनंदाच्या एका क्षणी बाहेर येणाऱ्या वीर्यामुळे त्यांना कामतृप्ती मिळते. अर्थात शिश्न-योनी संबंधांतून मिळणारी कामतृप्ती ही हस्तमैथुनातून मिळणाऱ्या कामतृप्ती पेक्षा अधिक जास्त असते. याचे कारण योनीमार्गाच्या रचनेमध्ये आहे. योनीमार्ग हा साधारणतः हवा नसलेल्या फुग्यासारखा मांसल भाग असतो हे आपण मागे पाहिलेच. शिश्न-योनी संबंधांच्या वेळी जर स्त्री पूर्ण तयार असेल, तिच्याही मनात तेवढीच आनंदाची भावना असेल आणि पुरेसा फोरप्ले झाल्याने स्त्री उद्दीपित झालेली असेल तर स्त्रीचा योनीमार्ग हा शिश्नाला आत घेण्यासाठी काही प्रमाणात रुंदावला जातो व योनीमार्गामध्ये काही प्रमाणात द्रव पदार्थ सुद्धा तयार होतो, ज्याला कामसलील असे म्हणतात. हे कामसलील शिश्न आणि योनी यांच्यात होणारे घर्षण कमी करून ते अधिक सुखद बनवते. या कामसलीलामुळे पुरुषांच्या शिश्नाला होणारा योनीमार्गाचा स्पर्श हा पुरुषांना तर अत्युच्च आनंद देणारा असतोच; पण त्याचवेळी तो स्त्रियांना सुद्धा या संबंधांचा आंनद देणारा असतो. पण यासाठी आधी स्त्री स्वेच्छेने व आनंदाने तयार असणे आणि पुरुषाने तिला उद्दीपित करणे हे गरजेचे असते. स्त्री तयार नसेल, तिची इच्छा नसेल किंवा तिला उद्दीपित केलेले नसेल तर हे कामसलील तयार होत नाही व स्त्रीचा योनीमार्ग एकतर कोरडाच राहतो किंवा पुरेसा ओलावा तिथे तयार होत नाही. अशा वेळी झालेले शिश्न-योनी संबंध हे त्या स्त्रीला जास्त त्रासदायकच वाटू शकतात. अनेकदा यामुळे स्त्रीच्या योनीमार्गामध्ये झालेल्या घर्षणामुळे तिला त्या ठिकाणी इजा होण्याचीच शक्यता जास्त असते. अशा अवस्थेत झालेल्या शिश्न-योनी संबंधानंतर अनेकदा स्त्रीला त्या जागेवर बराच काळ आग होणे, काहीतरी चिरल्यासारखे वाटणे, वेदना होणे असंही होऊ शकतं. स्त्रीची इच्छा नसताना किंवा तिच्या मनात भिती असताना जेव्हा तिच्या मनाविरुद्ध तिच्यावर जबरदस्ती संबंध लादले जातात, त्यावेळी स्त्रीचा योनीमार्ग आपोआप आकुंचन पावत असतो. अशा वेळी जबरदस्तीने आत घातलेले शिश्न हे स्त्रीसाठी तर वेदनादायी असतेच, पण यातून पुरुषाला सुद्धा पुरेसा आनंद मिळू शकत नाही. जे पुरुष आत्तापर्यंत वर्षानुवर्षे आपल्या स्त्री जोडीदारासोबत हेच करत आले आहेत, ते कामतृप्तीच्या या अत्युच्च आनंदापासून नेहमी अनभिज्ञच राहिलेले असतात. शिवाय बऱ्याचदा अशा अवस्थेत केलेला सेक्स हा फक्त पुरूषांची तात्कालिक इच्छा पूर्ण करणारा असतो, पण त्यातून मिळणारा आनंद मात्र हरवलेला असतो. अर्थात अनेकदा दोघांच्या संमतीने आणि दोघांच्या आनंदाचा विचार करून केल्या जाणाऱ्या सेक्स मधून मिळणारा आनंद हा फक्त आपल्या इच्छापूर्ती पेक्षा अधिक जास्त असतो याची जाणीवच पुरुषांना व अनेकदा स्त्रियांना सुद्धा नसते. त्यामुळे आपण जे करतोय तोच लैंगिक आनंद आहे असं मानून पुरुष वागत असतात आणि स्त्रिया सुद्धा यावरच निभावून नेत असतात.
त्यामुळे पुरुषांनी लैंगिक संबंधांच्या बाबतीत स्त्रियांकडे पाहण्याचा स्वतःचा दृष्टिकोन बदलायला हवा. लैंगिक संबंध ही फक्त एकतर्फी करायची गोष्ट नसून ती दोघांनी मिळून आनंद घेण्याची गोष्ट आहे हे समजून घ्यायला हवे. शिवाय ती घाईघाईत उरकायची गोष्ट नसून हळुवारपणे आनंद घेत व एकमेकांना आनंद देत करायची कृती आहे हेही लक्षात घ्यायला हवे.
स्त्रियांना सुद्धा यामध्ये सहभागी करून घेण्यासाठी काय काय करता येईल? लैंगिक संबंधांत स्त्रियांना नेमकं काय हवं असतं? स्त्रियांची कामपूर्ती नेमकी कशात असते? या मुद्द्यांवर पुढच्या लेखात अधिक सविस्तर पाहू.
- सचिन (8424041159)
ईमेल: srthite@yahoo.co.in
(आपले याविषयीचे काही अनुभव, मतं, प्रतिक्रिया असतील, काही शेअर करायचं असेल तर वरील नंबर वर व्हाट्सअप्प करा किंवा ईमेल करा.)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा